मलप्पुरम्, कोळीकोड आणि त्रिशूर जिल्ह्यांमध्ये चेतावणी
नवी देहली – राज्याच्या आरोग्य विभागाने राज्यातील ३ जिल्ह्यांमध्ये ‘वेस्ट नाइल’ नावाचा ताप पसरत असल्याची चेतावणी दिली आहे. राज्यातील मलप्पुरम्, कोळीकोड आणि त्रिशूर जिल्ह्यांमध्ये या तापाचे रुग्ण आढळल्याची माहिती देण्यात आली आहे, तसेच या तापापासून बचाव करण्यासाठीचे दिशानिर्देशही प्रसारित करण्यात आले आहेत. विभागाने राज्यातील सर्व स्थानिक प्रशासनांना जागरूकता कार्यक्रम राबवण्याचे निर्देशही दिले आहेत.
आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी या विषाणूची लक्षणे कुणामध्ये आढळल्यास त्वरित आरोग्य विभागात सूचित करण्याचे जनतेला आवाहन केले आहे. हा विषाणू डेंग्यूसारखा असून यामुळे घाबरण्याची आवश्यकता नाही. अजूनपर्यंत ५ प्रकरणे समोर आली असून त्यांतील ४ जण बरेही झाले आहेत.
काय आहे ‘वेस्ट नाईल’ ताप ?
हा आजार डासामुळे प्रसृत होतो. याची मुख्य लक्षणे ही डोकेदुखी, ताप, स्नायूंचे दुखणे, चक्कर येणे आदी आहेत. या आजारावर कोणतेही औषध नसल्याने त्याला अटोक्यात आणणेच हितावह आहे. वेळेत उपचार न केल्यास व्यक्तीच्या मेंदूवर विपरीत परिणाम होऊन तिचा मृत्यूही होऊ शकतो.