सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ‘नोकरी करायची असेल, तर कुणाची तरी करण्यापेक्षा देवाची करा !’ हा तेजस्वी विचार वाचून साधकाची झालेली विचारप्रक्रिया !

‘दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रतिदिन सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार प्रसिद्ध व्हायचे. त्यांचे विचार वाचून माझ्या मनाची झालेली विचारप्रक्रिया आणि मला जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध झालेले तेजस्वी विचार

अ. ‘नोकरीत थोडासा पगार मिळावा; म्हणून ७ – ८ घंटे काम करावे लागते, तर सर्वज्ञ, सर्वव्यापी आणि सर्व सामर्थ्यवान ईश्वराच्या प्राप्तीसाठी आयुष्य द्यायला नको का ?’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (संदर्भ : दैनिक ‘सनातन प्रभात’ ७.६.२०२२)

आ. ‘वैयक्तिक जीवनासाठी अधिक पैसे मिळतात; म्हणून सर्व जण आनंदाने अधिक वेळ (ओव्हरटाईम) काम करतात; पण राष्ट्र आणि धर्म यांच्यासाठी १ घंटा सेवा करायला कुणीही सिद्ध नसतो !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (संदर्भ : दैनिक ‘सनातन प्रभात’ १२.७.२०२२)

इ. ‘नोकरी करायची असेल, तर कुणाची तरी करण्यापेक्षा देवाची करा. देव नोकरीबद्दल थोडेसे काहीतरी देण्यापेक्षा सर्वकाही देईल !’- (परात्पर गुरु) डॉ. आठवले (संदर्भ : दैनिक ‘सनातन प्रभात’ ३०.७.२०२२)

श्री. यशवंत कणगलेकर

२. दैनिक ‘सनातन प्रभात’ मधील परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे विचार आठवून झालेली विचारप्रक्रिया !

२ अ. वयाची ७५ वर्षे पूर्ण झाल्यावर परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या तेजस्वी विचारांचे स्मरण होणे : माझ्या ७५ व्या वर्षपूर्तीनिमित्त रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात ‘ऐंद्री शांती’ विधी करण्यात आला. हा विधी आश्रमात करण्यामागे आमचा उद्देश होता की, ‘आमचे काही नातेवाईक या विधीसाठी उपस्थित रहातील आणि त्यांना सनातनचे कार्य जवळून पहाता येईल. त्यामुळे त्यांचे सनातन संस्थेविषयीचे अपसमज दूर होतील आणि त्यांना साधना करण्याची प्रेरणा मिळेल.’ माझ्या ‘ऐंद्री शांती’ विधीसाठी आलेल्या अनेक नातेवाइकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्या वेळी मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या तेजस्वी विचारांचे स्मरण झाले.

२ आ. वयाच्या ५० व्या वर्षापासून सनातन संस्थेच्या माध्यमातून धर्मप्रसार करणे, म्हणजे देवाची नोकरी करणे : माझ्या ७५ वर्षांच्या आयुष्यातील पहिली २५ वर्षे बालपणात आणि शिक्षण घेण्यात गेली. पुढील २५ ते ५० वर्षे शासकीय आणि खासगी नोकरी करण्यात गेली, तर वयाच्या ५० ते ७५ वर्षांच्या कालावधीत भगवंताने मला सनातन संस्थेच्या माध्यमातून साधना अन् धर्मप्रसार करण्याची संधी दिली. ही शेवटची २५ वर्षे, म्हणजे ‘देवाची नोकरी’ होती.

२ इ. देवाची नोकरी करण्यासाठी व्यावहारिक नोकरी सोडल्यानंतरही कुणाचे आर्थिक साहाय्य किंवा ऋण घ्यावे न लागणे : जीवनातील २५ वर्षे पूर्ण कुटुंबासहित साधना आणि धर्मप्रसार करता येणे, हे केवळ ईश्वरी कृपेने शक्य झाले. माझ्या जीवनातील हा कालखंड अधिक आनंदाचा होता. नातेवाइकांनी ‘माझा नोकरी सोडून साधना करण्याचा निर्णय मूर्खपणाचा आहे’, असे सांगितले. ‘मी त्यांच्यासमोर आर्थिक साहाय्यासाठी हात पसरीन’, अशी त्यांना भीती वाटली असावी; पण गेली २५ वर्षे कोणतेही उत्पन्न नसतांना मला कुणापुढे हात पसरावे लागले नाहीत कि ऋणही घ्यावे लागले नाही.

२ ई. श्रीमद्भगवद्गीतेतील श्लोकाचे स्मरण होणे आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा विचार अनुभवता येणे

अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते ।
तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम् ।। – श्रीमद्भगवद्गीता, अध्याय ९, श्लोक २२

अर्थ : जे अनन्य प्रेमी भक्त मज परमेश्वराला निरंतर चिंतन करत निष्काम भावाने भजतात, त्या नित्य माझे चिंतन करणार्‍या माणसांचा योगक्षेम मी स्वतः त्यांना प्राप्त करून देतो.

श्रीमद्भगवद्गीतेतील भगवंताचे आश्वासन भगवंतानेच खरे करून दाखवले. त्यामुळे माझी ईश्वरावर श्रद्धा दृढ झाली आणि मला ‘नोकरी करावी तर देवाची’ हा प.पू. गुरुदेवांचा विचार अनुभवता आला.

शासकीय किंवा खासगी नोकरी आणि देवाची नोकरी करतांना जाणवलेला भेद !

‘भगवंताने मला आणि माझ्या कुटुंबियांना जशी साधना अन् धर्मप्रसार करण्याची संधी दिली, तशी संधी समाजातील सर्व जिवांना मिळो’, हीच ईश्वरचरणी भावपूर्ण प्रार्थना !’

– कृतज्ञतापूर्वक श्री गुरुचरणी,

श्री. यशवंत कणगलेकर (वय ७५ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२४.१.२०२४)