Sam Pitroda : (म्हणे) ‘भारतात पूर्वेकडील लोक चिनी दिसतात, दक्षिणेकडील आफ्रिकन !’  – इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा

इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांचे भारतियांविषयी वर्णद्वेषी विधान !

इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा

नवी देहली – इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी वारसा कराच्या वादग्रस्त विधानानंतर भारताच्या विविधतेविषयी अवमानकारक विधान केले. पित्रोदा म्हणाले की, भारतात पूर्वेकडील लोक चिनी दिसतात आणि दक्षिणेकडील लोक आफ्रिकन दिसतात. सॅम पित्रोदा यांनी ‘द स्टेट्समन’ या इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत भारतातील विविधतेविषयी बोलतांना हे विधान केले. पित्रोदा म्हणाले, ‘प्रत्येक जण भारतात थोडी तडजोड करतो.’ सॅम पित्रोदा यांनी यापूर्वीही अशी अनेक वादग्रस्त विधाने केली आहेत.

पित्रोदा यांनी केलेली तुलना चुकीची आणि अस्वीकार्य ! – काँग्रेस

सॅम पित्रोदा यांचे विधान प्रसिद्ध झाल्यानंतर काही वेळातच काँग्रेसने त्यापासून अंतर राखले आहे. पित्रोदा यांनी भारताच्या विविधतेची केलेली ही व्याख्या मान्य नसल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. काँग्रेस नेते जयराम म्हणाले, ‘‘भारतातील लोकांविषयी सॅम पित्रोदा यांनी केलेली तुलना चुकीची आणि अस्वीकार्य आहे.’’ (एवढे सांगून काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांचे हात झटकणे पुरेसे नाही, अशांवर पक्ष काय कारवाई करणार ? – संपादक)

भारतियांची तुलना चिनी-आफ्रिकनशी करणे संतापजनक ! – नरेंद्र मोदी

सॅम पित्रोदा यांचे हे विधान समोर आले तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी तेलंगाणातील वारंगलमध्ये सभेला संबोधित करत होते. सॅम पित्रोदा यांनी भारतियांची तुलना चिनी-आफ्रिकनशी केल्याने ते संतापले. पंतप्रधान म्हणाले, ‘राजकुमारांच्या फिलॉसॉफरने (राहुल गांधी यांचे मार्गदर्शक असणारे सॅम पित्रोदा यांनी) वर्णाच्या आधारे देशवासियांचा अपमान केला. राजकुमारांना याचे उत्तर द्यावे लागेल.’ मोदी म्हणाले, ‘माझ्या देशातील लोकांची गुणवत्ता त्यांच्या त्वचेच्या रंगावरून ठरवली जाईल का? व्यक्तीच्या रंगावरून खेळ खेळण्याचा अधिकार यांना कोणी दिला? राज्यघटना डोक्यावर घेऊन नाचणारे लोक माझ्या देशाचा अपमान करीत आहेत.’’

संपादकीय भूमिका

काँग्रेसची धोरणे आणि दिशा ठरवणार्‍या मंडळींपैकी सॅम पित्रोदा हे एक समजले जातात. अशांची मानसिकता जर वर्णद्वेषी आणि संकुचित असेल, तर अन्यांचा विचारही न केलेला बरा !