वैद्या (कु.) अपर्णा महांगडे यांची कु. सुप्रिया जठार यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
१. ‘वैद्या (कु.) अपर्णाताईचा स्वभाव शांत असून ती संयमी वृत्तीची आहे.
२. कितीही धावपळ असली, तरी ताई सर्वकाही स्थिर राहून करते.
३. मनापासून सेवा करणे
अपर्णाताई रुग्ण साधकांना तपासण्याची सेवा मनापासून करते. तिला अनेक रुग्ण साधकांना तपासायचे असले, तरी ती घाई करत नाही. ती प्रत्येकाला आवश्यक तेवढा वेळ देते.
४. प्रेमभाव
अ. ताई इतरांना समजून घेते आणि त्यांच्याशी प्रेमाने बोलते. एकदा एका साधकाची चिडचिड होत होती, तरी ताई त्या साधकाला प्रेमाने समजावून सांगत होती.
आ. एखाद्या रुग्ण साधकाने त्याला सांगितलेले पथ्य पाळले नसेल, तर ‘त्यामागे काय कारण होते ?’, हे ताई जाणून घेते आणि त्यावर उपायही सांगते.
इ. एकदा ताईला अनेक रुग्ण साधकांना तपासायचे होते. तेव्हा एका वयस्कर साधकांनी ‘माझा रक्तदाब मोजून देऊ शकते का ?’, असे ताईला विचारले. तेव्हा ताई व्यस्त असूनही तिने ‘अन्य कोणते वैद्य साधक ही सेवा करू शकतात ?’, हे पाहून त्या साधकांना तसा निरोप दिला. त्यानंतर तिने तसा त्यांचा पाठपुरावाही घेतला.
५. सेवा करतांना सतत देवाच्या अनुसंधानात असणे
प्रत्येक रुग्ण साधकाला तपासण्यापूर्वी ताई भावपूर्ण प्रार्थना करते. ‘ती रुग्ण साधकांना तपासत असतांना सतत देवाच्या अनुसंधानात असते’, असे मला वाटते. ‘जणूकाही ताईच्या रूपात साक्षात् धन्वन्तरि देवताच साधकांवर उपचार करत आहे’, असे मला वाटते.
६. आलेल्या अनुभूती
६ अ. मी अपर्णाताईकडे तपासणीसाठी गेले असतांना माझा भाव आपोआप जागृत झाला.
६ आ. आजाराचे मूळ कारण ओळखणे : एकदा मला थकवा आला असतांना मी ताईकडे गेले होते. त्या वेळी माझ्या मनात पुष्कळ नकारात्मक विचार येत होते. ताईने ‘आजाराचे स्वरूप शारीरिक आहे कि मानसिक आहे ?’ हे अचूक ओळखले आणि आजाराचे मूळ कारण थकवा नसून मनातील नकारात्मक विचार आहेत, हे जाणले. तिने मला औषध दिले, तसेच नकारात्मकता जाण्यासाठी समादेशही केला.
६ इ. अपर्णाताईच्या माध्यमातून धन्वन्तरि देवतेचे चैतन्य मिळत असल्याचे जाणवणे : एकदा अपर्णाताई माझी नाडी तपासत होती. तेव्हा मला ताईच्या मागे धन्वन्तरि देवता उभी असल्याचे जाणवले. ताईच्या हातातून ‘माझ्या शरिरात चैतन्य पसरत असून माझ्या शरिरातील रोग नष्ट होत आहेत’, असे मला वाटले. नाडी तपासणी पूर्ण झाल्यावर मला हलके आणि ताजेतवाने वाटू लागले.
‘हे गुरुमाऊली, आपल्या कृपेमुळेच धन्वन्तरि देवतेचे चैतन्य प्रदान करणार्या वैद्या आम्हा साधकांना मिळाल्या. आपण लक्षात आणून दिलेली आणि लिहून घेतलेली ही शब्दसुमने आपल्या चरणी कृतज्ञताभावाने अर्पण करते.’
‘इदं न मम !’
– कु. सुप्रिया सतीश जठार, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२८.२.२०२४)
|