हिंदुस्थानच्या विरोधात अमेरिकी प्रसारमाध्यमांचा थयथयाट !

हिंदूंचा आत्मविश्वास नष्ट करून त्यांच्यात फूट पाडण्यासाठी केला जाणारा प्रयत्न हिंदूंनी संघटित होऊन हाणून पाडला पाहिजे !

‘सी.एन्.एन्.’ हे अमेरिकेतील प्रसारमाध्यम आहे. नुकतेच ‘सी.एन्.एन्.’ने एका लेखाद्वारे ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पक्ष या निवडणुकीत यशस्वी झाला, तर धर्मनिरपेक्ष भारत हिंदु राष्ट्रात परिवर्तित होईल’, असा दावा केला आहे. अशा प्रकारचा लेख लिहिण्यामागची मानसिकता सहज लक्षात येण्यासारखी आहे. भारत हा देश सध्या जगातील सर्व क्षेत्रांत प्रगती करत चालला आहे. त्यामुळे जगातील श्रीमंत राष्ट्रांना भारताचा हा विकास आणि ही प्रगती डोळ्यांत खुपते आहे. त्यामुळे त्यांचा हा थयथयाट चालू आहे, तसेच मुसलमान धर्माचा कैवार घेऊन हिंदूंची जगात कोंडी करण्याचा हा कुटील डाव आहे. जगातील इस्लामिक राष्ट्रांना हिंदुस्थानच्या विरोधात भडकावण्याचे काम चालले आहे. ‘हिंदुस्थानातील मुसलमानांनी जिहाद पुकारावा आणि त्याला जगातील अन्य इस्लामिक राष्ट्रांनी समर्थन द्यावे, असा दुष्ट हेतू अशा प्रकारचा लेख लिहिण्यामागे असावा’, असा संशय निर्माण होतो.

आज जगात इस्लामिक आतंकवाद एक मोठी समस्या होऊन बसला आहे. या पार्श्वभूमीवर अशा प्रकारचा लेख लिहिणे, म्हणजे आगीत तेल ओतण्यासारखे आहे. ‘हिंदुस्थानचे सार्वभौमत्व धोक्यात यावे, हिंदुस्थानात यादवी निर्माण व्हावी, असा कुटील हेतू या लेखाच्या लिखाणामागे आहे का ?’, असा प्रश्न कुणाच्याही मनात स्वाभाविकपणे निर्माण होईल.

वीर सावरकर उवाच

हिंदुस्थानच्या उद्धारार्थ हिंदूंनीच घाम गाळला आहे, लढा दिला आहे, सर्वस्वाचा त्याग केला आहे. असे असल्यामुळे ज्या राज्यात हिंदुहिताचे आणि हिंदु संस्कृतीचे संवर्धन अन् संरक्षण होईल तेच खरे स्वराज्य ! – श्री. दुर्गेश जयवंत परुळकर

१. अनुमाने १०० वर्षांपूर्वी ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने मुसलमानधार्जिणा लेख लिहिणे

श्री. दुर्गेश परुळकर

‘हिंदुस्थानातील मुसलमानांना चेतवण्यासाठीच हा लेख लिहिला गेला असावा’, असे वाटण्यामागचे कारण, म्हणजे अनुमाने १०० वर्षांपूर्वी ‘न्यूयॉर्क टाइम्स’ या अमेरिकेतील वृत्तपत्राने २२ जुलै १९२४ च्या अंकात ‘अर्थार हव्टर’ नावाच्या एका लेखकाचा हिंदुस्थानविषयक लेख प्रकाशित केला होता. त्या लेखात या लेखकाने लिहिले होते, ‘मुसलमान लोक हिंदुस्थानच्या एकंदर लोकसंख्येच्या पंचमांश (२० टक्के) आहेत. ते हिंदूंपेक्षा अधिक बळकट आहेत. इंग्रज लोक हिंदुस्थानातून निघून गेले, तर हेच मुसलमान हिंदुस्थानचे शासक होतील.’ या लेखातील अनेक उतारे मोठमोठ्या ठळक अक्षरांत मुसलमानांनी छापून ती पत्रके हिंदुस्थानच्या विविध प्रांतात वाटून त्याचे समर्थनही केले होते.

२. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ‘न्यूयॉर्क टाइम्स’च्या लेखाचा घेतलेला समाचार

या विधानाचा समाचार घेतांना स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी म्हटले, ‘या मताचा अनेक अनभिज्ञ हिंदु तरुणांवर परिणाम होऊन त्यांच्या अंगी नसलेला दुर्बळपणा शिरण्याचा संभव असल्यामुळे आणि विशेषतः मुसलमान गुंडांची अशिक्षितच नव्हे, तर सुशिक्षित मुसलमान गुंडांची ही गुंडगिरी आपण आहोतच, तसे बळकट या नसत्या शेखीने अधिक चढेल. असे झाल्याने या दुष्ट असत्य आणि तेजोहीन करणार्‍या विधानाचा तीव्र निषेध करणे आवश्यक होत आहे.’

३. हिंदूंच्या अस्तित्वासाठी स्वसामर्थ्य वाढवण्याचा प्रयत्न केला, तर थयथयाट कशासाठी ?

२२ जुलै १९२४ या दिवशीचा तो लेख आणि अलीकडचाच हा ‘सी.एन्.एन्.’चा लेख या दोन्ही लेखामागचे उद्दिष्ट मुसलमानांना चेतवणे अन् हिंदुस्थानातील शांतता, सुव्यवस्थेचा भंग करून यादवी माजवणे हा आहे’, असाच निष्कर्ष काढता येतो. ख्रिस्ती आणि मुसलमान धर्माच्या अनुयायांनी शस्त्र बळावर त्यांच्या धर्माचा प्रचार अन् प्रसार केला. हिंदु समाजाने आपल्या धर्माचा प्रसार ज्ञानाच्या बळावर केला. जेव्हा शस्त्रधारी परकियांनी आक्रमण करून हिंदूंचे साम्राज्य हिरावून घेण्याचा आणि हिंदु संस्कृती अन् धर्म नष्ट करण्याचा प्रयत्न केला, तेव्हाच शस्त्र उपसले. हा हिंदुस्थानचा खरा इतिहास आहे. जगातील प्रत्येक धर्म स्वतःचे अस्तित्व आणि वर्चस्व टिकवण्यासाठी जर प्रयत्न करत असेल, तर हिंदूंनी त्यांचे अस्तित्व टिकवण्यासाठी स्वसामर्थ्य वाढवण्याचा प्रयत्न केला, तर एवढा थयथयाट कशासाठी केला जात आहे ? जगात ख्रिस्ती आणि इस्लामी राष्ट्रे अस्तित्वात आहेत. त्यांनी स्वतःला ‘निधर्मीवादी’ म्हणून घोषित केले नाही, तरीही हिंदूंनी निधर्मीवादी रहावे आणि स्वतःची संस्कृती अन् स्वतःचे राष्ट्र रसातळाला जातांना शांतपणे पहावे, अशी अपेक्षा जगातील कोणतेही राष्ट्र किंवा प्रसारमाध्यमे करत असतील, तर त्यांची तमा हिंदूंनी बाळगण्याचे कारण नाही.

४. ‘सी.एन्.एन्.’ला सावरकर यांच्याच  शब्दांत स्पष्टपणे ठणकावण्याची आवश्यकता

आजही ख्रिस्ती आणि मुसलमान धर्मांचे अनुयायी बळजोरीने अथवा फसवून किंवा प्रलोभन देऊन हिंदु समाजातील अनेकांचे धर्मांतर करत आहेत. त्या विरोधात एक अक्षरही लिहिण्याची बुद्धी ‘सी.एन्.एन्.’ला होत नाही. याचाच अर्थ ‘सी.एन्.एन्.’ पक्षपात करणारे माध्यम आहे. हिंदु समाजावर होणारा अन्याय ‘सी.एन्.एन्.’ला आनंद देणारा आहे. जगातील सर्व धर्म स्वतःचे अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि हिंदूंनी मात्र तसा प्रयत्न केला, तर ते गळा काढतात. त्यांची ही वृत्ती हिंदु समाजाला त्याच्या धर्म आणि संस्कृतीसह नष्ट करणारी मनीषा बाळगते, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. अशा प्रसंगी जगाला ‘जगात जर कोणताच धर्म रहाणार नसेल, तर हिंदु धर्माचा आग्रह मी धरणार नाही; पण ते जोपर्यंत होत नाही, तोवर माझा धर्म मला आवडता आहे’, असे सावरकर यांच्याच शब्दांत स्पष्टपणे ठणकावून सांगण्याची आवश्यकता आहे.

५. ‘सी.एन्.एन्.’कडून हिंदूंच्या खच्चीकरणाचा प्रयत्न

हिंदूंनी तेवढे निधर्मीवादाला कायम कवटाळून बसावे आणि इतर धर्मांच्या अनुयायांनी मात्र निधर्मीवादाच्या तत्त्वज्ञानाचा स्वप्नातही स्वीकार करू नये. अशा प्रवृत्तीच्या लोकांकडून हिंदूंवर अन्याय होतो आहे. ‘हिंदूंना न्याय हवा आहे’, अशी मागणी करून त्यांच्याकडून न्याय मिळेल, अशी अपेक्षा ठेवणे, म्हणजे रेडा कधीतरी दूध देईल; म्हणून प्रतीक्षा करण्यासारखे आहे.

हिंदूंचा आत्मविश्वास नष्ट व्हावा आणि हिंदु समाजात फूट पडावी, यादृष्टीने केला जाणारा प्रयत्न हिंदु समाजाने संघटित होऊन हाणून पाडला पाहिजे. एखाद्या राष्ट्राने स्वतःचे सामर्थ्य वाढवणे, स्वतःचा विकास साधणे; आर्थिकदृष्ट्या, लष्करीदृष्ट्या बलाढ्य होण्याचा प्रयत्न करणे; स्वतःचा ऐतिहासिक, सांस्कृतिक, धार्मिक वारसा अभिमानाने जतन आणि त्याचे संरक्षण करणे, हा अपराध ठरत नाही. हिंदु राष्ट्राने किंवा हिंदु समाजाने स्वतःचा विकास साधू नये; म्हणून त्यांच्यावर आरोप करून त्यांचे मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न ‘सी.एन्.एन्.’ करत आहे आणि हे तो स्वतःच्याच कृतीने सिद्ध करत आहे.

६. ‘सी.एन्.एन्.’ने मुसलमान आणि ख्रिस्ती राज्यकर्त्यांच्या छळाविषयी चकार शब्द न उच्चारणे

हिंदूंनी धर्मनिरपेक्षतेला लाथाडले; म्हणून अख्ख्या जगाला सांगून हिंदु समाजाविषयी विद्वेष पसरवण्याचा हा प्रकार आहे. वास्तविक जगातील कोणत्या देशांनी आणि कोणत्या विचारसरणीच्या लोकांनी इस्लामिक आतंकवाद पोसला, हे लपून राहिलेले नाही. ‘मुसलमान धर्माचा प्रचार आणि प्रसार, हा त्या धर्मातील साधुत्वाच्या प्रभावाने झाला आहे. त्यांनी तलवारीच्या धारेवर स्वतःच्या धर्माचा प्रसार केला नाही. तलवारीचा उपयोग केवळ रक्षणासाठी केला’, असे कुणी कितीही सांगितले, तरी मुसलमानांचा रक्तरंजित इतिहास ज्याला ठाऊक आहे, त्याचा त्यावर विश्वास बसणार नाही.

ख्रिस्ती राज्यकर्त्यांनी केलेले छळसत्र लपून राहिलेले नाही. त्यांनी अमानुषपणे स्वतःची सत्ता राबवली. इतर देशांना गुलामगिरीच्या नरकात ढकलले. पराभूत राष्ट्रांचा अतोनात छळ केला. इतरांचे स्वातंत्र्य हिरावून घेतले, तसेच पराभूत राष्ट्रांची आर्थिक लूट केली. इतरांची संस्कृती नष्ट करणे आणि स्वतःचे वर्चस्व प्रस्थापित करणे यांसाठी त्यांनी त्यांच्या राजकीय सत्तेचा गैरवापर केला. त्याविषयी एक चकार शब्द न लिहिणारे आणि न उच्चारणारे ‘सी.एन्.एन्.’ हिंदूंना धर्मनिरपेक्षवादाची गुटी चाखवू पहात आहे. ‘सी.एन्.एन्.’चे हे वर्तन, म्हणजे व्यसनाधीन माणसाने व्यसनमुक्तीवर भाषण देण्यासारखे आहे.

७. हिंदुस्थानला बौद्धिक उपदेश न केलेला बरा !

हिंदुस्थानने काय करावे ? आणि काय करू नये ? हा हिंदुस्थानचा प्रश्न आहे. हिंदुस्थान हे एक स्वतंत्र आणि सार्वभौम राष्ट्र आहे. आपल्या देशाचा राज्यकारभार कसा करावा ? आणि कोणत्या तत्त्वज्ञानाच्या आधारावर स्वतःची परराष्ट्रनीती राबवावी ? याचे भान हिंदुस्थानला आहे. त्यामुळे कोणत्याही प्रसारमाध्यमाने हिंदुस्थानला बौद्धिक उपदेश न केलेला बरा !

– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते आणि लेखक, पुणे. (६.५.२०२४)