रुग्णालये किंवा आधुनिक वैद्य यांनी निष्काळजी केल्यामुळे रुग्णाने जीव गमावल्याच्या विविध घटना पहायला मिळतात. त्यामुळे काही जण रुग्णालयाच्या विरोधात संताप व्यक्त करतात, तर काही जण निमूटपणे परिस्थिती सहन करतात. असाच प्रसंग ओढवलेल्या पीडितांनी रुग्णालयाच्या विरोधात न्यायालयात दावा करून हानीभरपाईची मागणी केली आणि त्यात ते यशस्वी झाले. त्याविषयीचे विश्लेषण या लेखात पाहूया.
१. रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झालेल्या महिलेच्या नातेवाईकांकडून हानीभरपाईची मागणी
सुधाकुमारी या ‘भारतीय दूरसंचार निगम’ मध्ये (‘बी.एस्.एन्.एल्.’मध्ये) ‘वरिष्ठ टेलिकॉम ऑफिस असिस्टंट’ (वरिष्ठ दूरसंचार कार्यालय साहाय्यक) म्हणून कार्यरत होत्या. ही गर्भवती महिला बाळंतपणासाठी २७.५.२००४ या दिवशी त्रिवेंद्रमच्या ‘एस्.पी. फोर्ट’ या रुग्णालयात भरती झाली. दुसर्या दिवशी तिला एक कन्यारत्न झाले. त्यानंतर तिला संतती बंधन बंधक शस्त्रक्रिया करायची होती; पण तिला श्वास घ्यायला अडचण आली. तेव्हा तिच्या छातीत संसर्ग असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे तिचे शस्त्रकर्म (लेप्रोस्कोपिक स्टर्लायझेशन) करता आले नाही. त्यानंतर मात्र ३१.५.२००४ या दिवशी संतती बंधन बंधक शस्त्रक्रिया करण्यात आली. रुग्णालयात असतांना तिला ताप आला. तिला ‘ब्रॉन्चोप्नेउमोनिया’ या आजाराची लक्षणे होती. १.६.२००४ या दिवशी तिचा मृत्यू झाला. तशी माहिती तिच्या पतीला तेथील परिचारिकेने दिली.
पीडितेच्या मृत्यूचे खरे कारण, म्हणजे तिला श्वसनाचा त्रास असतांनाही तिची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. याविषयी ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ने जी नियमावली ठरवलेली आहे, तिचे उल्लंघन झाले. याप्रकरणी मृतक महिलेचे पती आणि २ मुली यांनी ७५ लाख रुपये हानीभरपाई मिळण्यासाठी याचिका प्रविष्ट केली, तसेच फौजदारी गुन्हाही नोंद केला.
२. केरळ उच्च न्यायालयासमोर रुग्णालयाच्या अनेक धक्कादायक गोष्टी उघड
याचिका सुनावणीस आली, तेव्हा रुग्णालयाचे अध्यक्ष आणि इतर आधुनिक वैद्य यांनी अशी भूमिका घेतली, ‘मृतक महिलेला वर्ष २००३ मध्ये पहिले बाळ झाले होते. तेव्हा ही शस्त्रक्रिया करण्याचे ठरले होते आणि तिला तो त्रास पूर्वी झालेला असावा, तसेच या वेळी तिच्या छातीत थोडा कफ जमा होता. रुग्णालयाने त्यांची सर्व काळजी घेतली; पण त्यांचा मृत्यू झाला. हा दैवयोग किंवा अपघात असावा.’ खटला चालू असतांना मृतक महिलेविषयीची रुग्णालयातील काही कागदपत्रे समोर आली. त्यात अनेक धक्कादायक गोष्टी दिसून आल्या. सर्वप्रथम मृतक महिलेला श्वसनाचा त्रास असतांनाही तिचे शस्त्रकर्म करण्यात आले. त्यामुळे तिचा मृत्यू झाला. हे शस्त्रकर्म टाळता आले असते. या मृत्यूविषयी रुग्णालय आणि आधुनिक वैद्य यांनी दायित्व घेण्याचे टाळले. यात त्यांची काहीही चूक नाही, असे त्यांनी न्यायालयासमोर स्पष्ट केले.
रुग्णालयाची कागदपत्रे पाहिल्यावर केरळ उच्च न्यायालयाच्या लक्षात आले की, २७.५.२००४ या दिवशी गरोदर असतांना महिला रुग्णालयात भरती झाली होती. तेव्हा तिला ‘ब्रोनकाईल अस्थमा’ होता. त्यामुळे तिला श्वास घेण्यात अडचण होती. या प्रकरणात न्यायालयाचे असे स्पष्ट मत झाले की, पीडितेचे शस्त्रकर्म करण्यापूर्वी तिला भूल देण्याची प्रक्रिया योग्य प्रकारे झाली नाही. तज्ञांनी शस्त्रकर्म करण्यापूर्वी तिच्या कुठल्याही तपासण्या केल्या नव्हत्या. त्यामुळे त्यांना रुग्णाची शारीरिक सद्यःस्थिती माहिती नव्हती. असे दायित्वशून्यतेने वागल्यामुळे ‘गॅस्ट्रिक ॲसिड एस्पायरेशन’ या नावाचा आजार झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. यात भूलतज्ञ आणि शस्त्रकर्म करणारे आधुनिक वैद्य यांचा दोष आहे.
रुग्ण शस्त्रकर्म करण्यासाठी योग्य आहे का? हे पहाणे रुग्णालयाचे दायित्व असते. शस्त्रकर्म करण्यापूर्वी रुग्णाची कुठलीही अनुमती (कन्सेंट) घेतली नव्हती. तशी अनुमती केवळ २७.४.२००४ या दिवशी प्रसुतीसाठी घेण्यात आली होती. पुढची संतती प्रतिबंधक शस्त्रकर्म करण्याविषयी ३१.५.२००४ या दिवशी स्वतंत्र अशी अनुमती घेणे आवश्यक होते, जी घेण्यात आली नाही, ही एक गंभीर चूक आहे.
३. मृतक महिलेच्या नातेवाईकांना ३० लाख रुपये हानीभरपाई देण्याचा न्यायालयाचा आदेश
मृतक महिलेचा पती आणि २ मुली यांनी पोलिसांना हा सर्व प्रकार सांगितला. त्यानुसार पोलिसांनी फौजदारी गुन्हा नोंदवला होता. तसेच हानीभरपाईची याचिकाही केली होती. त्यामुळे केरळ उच्च न्यायालयाने रुग्णालय आणि शस्त्रकर्म करणारे आधुनिक वैद्य यांना दोषी ठरवले. यासाठी न्यायालयाने पूर्वीची सर्वोच्च न्यायालयाची निकालपत्रे आणि इतर न्यायालयांची निकालपत्रे यांचा आधार घेतला. याप्रकरणी न्यायालयाने ‘रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे महिला रुग्णाचा मृत्यू झाला’, असे निकालपत्र घोषित केले. यात मृतक महिलेचा पती आणि २ मुली यांना रुग्णालय अन् आधुनिक वैद्य यांनी प्रत्येकी १० लाख रुपये देण्याचा आदेश दिला.
महिलेचा पती आणि दोन मुली यांनी ७५ लाख रुपयांची हानीभरपाई मागितली होती; मात्र न्यायालयाने ‘एकूण ३० लाख रुपयांची रक्कम पीडितेच्या कुटुंबियांना द्यायला सांगितली. यात २० लाख रुपये संबंधित रुग्णालयाने आणि अन्य ५-५ लाख रुपये हे शस्त्रकर्म करणार्या दोघा आधुनिक वैद्यांनी द्यावेत’, असे सांगितले. तसेच पीडितेच्या वारसांना वर्ष २००४ पासून रक्कम जमा होईपर्यंत ६ टक्के व्याज मिळावे, असाही आदेश केला.’
श्रीकृष्णार्पणमस्तु ।
– (पू.) अधिवक्ता सुरेश कुलकर्णी, मुंबई उच्च न्यायालय