उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन मतदान केंद्रांवर सर्व सुविधा द्या !

निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या सूचना

मतदानाच्या संदर्भात घेण्यात आलेल्या बैठकीत जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि अन्य प्रशासकीय अधिकारी

कोल्हापूर – तीव्र उन्हाचा तडाखा लक्षात घेऊन मतदानासाठी मतदान केंद्रावर येणारे मतदार आणि नियुक्त करण्यात आलेले अधिकारी, कर्मचारी यांना आवश्यक त्या सेवासुविधा द्या. जिल्ह्यात ८५ टक्क्यांपेक्षा अधिक मतदान होण्यासाठी सूक्ष्म नियोजन करा. आचारसंहिता भंगाची कोणतीही घटना आढळून आल्यास तात्काळ कार्यवाही करा, अशा सूचना निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केल्या.

निवडणुकीच्या अनुषंगाने मतदान प्रक्रियेची पूर्वसिद्धता, मतदान केंद्रांवरील सुविधा, मतदान टक्केवारी वाढवण्यासाठी उपाययोजना आदी विषयांसंदर्भात जिल्हाधिकारी येडगे यांच्या अध्यक्षतेखाली शाहूजी सभागृहात आढावा बैठक झाली. त्या वेळी या सूचना त्यांनी दिल्या. जिल्हाधिकारी येडगे पुढे म्हणाले, ‘‘मतदान केंद्रांच्या ठिकाणी त्या ठिकाणची विद्युत् व्यवस्था, पंखे सुस्थितीत असल्याची निश्चिती करा. सावलीसाठी केंद्राबाहेर मंडप उभारून घ्या. पिण्याचे पाणी आणि आसंदी यांची व्यवस्था करा. प्रत्येक मतदान केंद्रावर प्रथमोपचार संच सिद्ध ठेवा. वाड्या-वस्त्यांवर लांब मतदान केंद्र असणार्‍या ठिकाणी मतदारांची ने-आण करण्यासाठी वाहनाची व्यवस्था करा.’’