नगरमधून ‘एम्.आय.एम्.’ची उमेदवारी रहित !

नगर – नगर लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील आणि महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांच्यात लढत होत आहे. येथे ‘एम्.आय.एम्.’चे उमेदवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ. परवेज अशरफी हे उभे रहाणार होते; परंतु विरोधकांकडून झालेली टीका आणि मुसलमान समाजातून झालेला विरोध लक्षात घेता  उमेदवारी मागे घेतली आहे.  एम्.आय.एम्.’चा उमेदवार असल्यास भाजपचा लाभ होतो, म्हणून मुसलमान समाजातूनच या उमेदवारीला विरोध झाल्याचे सांगण्यात येते. अशरफी सध्या भ्रमणभाष उचलत नाहीत, असे समजते. मतदारांची दिशाभूल करण्यासाठी आणि मते खाण्यासाठीच हे उमेदवार आणले गेल्याचा आरोप लंके समर्थकांनी केला होता. काही हिंदुत्वनिष्ठ पदाधिकार्‍यांनीही अशरफी यांच्याविरोधात वक्तव्य केली होती.