रत्नागिरी जिल्ह्यातील पर्यटनस्थळांमध्ये १० वर्षांत १९ पर्यटनस्थळांची वाढ

रत्नागिरी – जिल्हा पर्यटनदृष्ट्या विकसित व्हावा, यासाठी गेल्या १० वर्षांपासून जोरदार प्रयत्न चालू आहेत. मागील १० वर्षांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यात ‘क’ श्रेणीतील १९ पर्यटनस्थळे वाढली आहेत. एकूण जी ७२ पर्यटनस्थळे होती. ती आता ९१ पर्यटनस्थळे झाली आहेत. जिल्ह्यातील ८ तालुक्यांमध्ये ही पर्यटनस्थळे वाढली आहेत. या सर्व पर्यटनस्थळांच्या ठिकाणी सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्यासंदर्भातही प्रयत्न केले जात  आहेत. ‘क’ वर्गातील पर्यटनस्थळांचा विकास जिल्हा वार्षिक योजना निधीतून केला जातो.
पर्यटनस्थळांमध्ये अ,ब,क, श्रेणी आहे. ‘अ’श्रेणीतील पर्यटनस्थळे आंतराष्ट्रीय दर्जाची असतात. ‘ब’वर्गातील पर्यटनस्थळे राष्ट्रीय स्तरावरची असतात. जिल्ह्यात गणपतीपुळे, पावस, थिबा पॅलेस, लांजा तालुक्यात माचाळ, दापोली तालुक्यातील पन्हाळेकाजी आणि गुहागरात वेळणेश्वर ही पर्यटनस्थळे ‘ब’ वर्गातील आहेत.

जिल्ह्यातील स्थानिक नागरी आणि ग्रामीण भागांतील प्रसिद्ध निसर्गरम्यस्थळे, सांस्कृतिक, ऐतिहासिक स्थळांसह प्रसिद्ध यात्रास्थळे पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करण्यासाठी जोरदार नियोजन चालू आहे. जिल्ह्यात ‘अ’ श्रेणीचे पर्यटनस्थळ नसले, तरी अन्य ठिकाणे निवडून ‘क’ वर्गातील पर्यटनस्थळे वाढवण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. जिल्ह्यातील ‘क’ श्रेणीतील १९ पर्यटनस्थळे वाढली आहेत. या पर्यटनस्थळांमध्ये दापोलीत कर्दे, लाडघर, दाभोळ, वणंद ही ४ स्थळे वाढली आहेत. पूर्वी या दापोली तालुक्यात १२ पर्यटनस्थळे होती. खेडमध्ये १० वर्षांपूर्वी ११ पर्यटनस्थळे होती. त्यामध्ये श्री काळकाई मंदिर, कादोशी गावातील निरिबजी धबधबा ही २ स्थळे वाढली आहेत. चिपळूणमध्ये १० वर्षांपूर्वी ‘क’ दर्जाची १३ पर्यटनस्थळे होती. त्यात पांडवकालीन लेणी-पीरबाबा दर्गा हे एक पर्यटनस्थळ वाढले आहे. गुहागर तालुक्यात ६ पर्यटनस्थळे होती.

त्यामध्ये कोतळूक, वरवेली, साखरीआगर, शिरगाव या ४ गावांच्या पर्यटन स्थळांची भर पडली आहे. संगमेश्वर तालुक्यात ६ पर्यटनस्थळे होती. त्यात गेल्या १० वर्षांत कडवई गावच्या पर्यटनस्थळाची भर पडली आहे. रत्नागिरी तालुक्यात ११ पर्यटनस्थळे होती. गेल्या १० वर्षांमध्ये शीळ धरण, पानवल धबधबा, गावखडी परिसर या ३ स्थळांची भर पडली आहे. लांजा तालुक्यात १० वर्षांपूर्वी २ पर्यटनस्थळे होती, त्यामध्ये मागील १० वर्षात मौजे कोट येथील ‘झाशीची राणी लक्ष्मीबाई स्मारक’ आणि ‘गंगूची बाऊल’ या २ स्थळांची वाढ झाली आहे. राजापूमध्ये ‘क’ वर्गातील ७ पर्यटनस्थळे होती. या पर्यटनस्थळांत ओझरच्या धबधब्यासह कातळशिल्पांचीही वाढ झाली आहे.