मराठवाडा-विदर्भात हलक्या पावसाचा अंदाज, तर कोकणासह आंध्र-तेलंगाणा येथे उष्णतेची लाट !

कुलाबा वेधशाळेने वर्तवला अंदाज

नाशिक – राज्यात कोकणामध्ये, तसेच आंध्रप्रदेश आणि तेलंगाणा येथे आगामी २ दिवस उष्णतेची लाट रहाणार आहे. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भात ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात वातावरण कोरडे रहाणार असून उन्हाचा कडाका वाढण्याचा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तवला आहे.

वातावरणातील खालच्या थरातील द्रोणिका रेषा मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातून तामिळनाडूपर्यंत जात असल्याने वातावरणात पालट झाला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार २६ एप्रिल या दिवशी जोरदार वारे वाहिले. मध्यप्रदेश, राजस्थान, हरियाणा राज्यांत काही ठिकाणी गारपीटही झाली. त्यामुळे उत्तर भारतात उन्हापासून काही दिवस दिलासा मिळाला आहे.