महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने लोकसभा निवडणुकीचे अचूक भविष्य वर्तवणार्या ज्योतिषाला २१ लाख रुपयांचे बक्षीस घोषित केले आहे. याला नेहमीप्रमाणे त्वरित प्रसिद्धी मिळाली; पण या विषयाची एकच बाजू समाजापुढे मांडली जाऊ नये आणि ज्योतिषांनाही त्यांचे मत मांडण्याची संधी मिळावी; म्हणून हा लेखन प्रपंच !
लेखक : ज्योतिष अभ्यासक श्री. प्रदीप पंडित, पुणे.
अंनिसचे आव्हान राजकीय अंदाज वर्तवणार्यांना का नाही ?
अंनिसचे हे आव्हान राजकीय अंदाज वर्तवणार्या अभ्यासकांना का नसते ? राजकीय अंदाज वर्तवणार्या अभ्यासकांच्या अंदाजामुळे मतदार, सर्वसामान्य जनता आणि राजकीय नेते यांवर परिणाम होत नाही का ? तरी अंनिसचा आक्षेप केवळ ज्योतिषांवरच आहे. ते ज्योतिषशास्त्राचा संबंध हिंदु धर्म, हिंदु तत्त्वज्ञान यांच्याशी लावतात. त्यांच्या मते हिंदु धर्माशी संबंधित सर्व वाईट किंवा चुकीचे असते.
मन दिसत नाही, तरी मानसशास्त्र मानता ना ?
हे लोक मन, मनावरचे उपचार करणारे मानसशास्त्र यांना मानतात; पण खरे म्हणजे मन हा प्रकार शरीरशास्त्रात कुठेच दिसत नाही, दाखवता येत नाही, सिद्ध करता येत नाही ! पण ज्योतिषशास्त्राच्या अस्तित्वाचे पुरावे मात्र मागतात !
हवामान खात्याचे अंदाजही चुकतात !
आपल्या हवामान खात्याचे अंदाज अनेकदा चुकतात. त्यामुळे शेतकर्यांचे, जनतेची पुष्कळ हानीही होते. त्यात अंधश्रद्धा निर्मूलन समितीला काही वावगे वाटत नाही; पण ‘ज्योतिष गृहिते १०० टक्के सिद्ध झाली पाहिजेत’, असा त्यांचा दुराग्रह असतो.
वैज्ञानिक गृहितके निकामी ठरतात तेव्हा…?
एखाद्या गोष्टीचा वैज्ञानिक आधार तपासण्यासाठी त्यामधील गृहितके सिद्ध झाली पाहिजेत, असे म्हणतात. विज्ञाननिष्ठ वैद्यकीय गृहिते निकामी ठरली, तर त्यावर अंधश्रद्धा निर्मूलन समितीवाले काही बोलणार नाहीत; पण त्यांना ज्योतिष मात्र अचूकच पाहिजे !
विज्ञान चुकत नाही, तर कल्पना चावला यांचा बळी का गेला ?
आपण इंग्रज, अमेरिकन, युरोपीयन लोकांना पुष्कळ हुशार आणि बुद्धिवान समजतो. त्यांचे गणित किंवा तर्क (लॉजिक) कधीच चुकू शकत नाही, असे मानतो. मग कै. कल्पना चावला यांचे यान अंतराळात भस्मसात् कसे झाले ? तेथे तुमचे आधुनिक विज्ञाननिष्ठ, प्रगत शास्त्र चुकले, तरी त्याविषयी अंधश्रद्धा निर्मूलनवाले बोलणार नाहीत; पण ज्योतिषांना सुळावर चढवायला ते तत्पर असतात.
२१ लाख रुपयांचे बक्षीस देण्याएवढी अंनिस श्रीमंत !
खरेतर सामाजिक संस्थेने तिचा प्रत्येक रुपया समाजोपयोगी कारणांसाठी वापरला पाहिजे; आपल्या अहंकार सुखासाठी नाही. २१ लाख रुपये वाटण्याइतकी ही संस्था श्रीमंत आहे का ? हे पैसे ते कसे जमा करणार आहेत ?
सहस्रो वर्षे जुन्या ज्योतिषशास्त्राची परीक्षा घेण्याएवढी अंनिस ज्ञानी आहे का ?
सहस्रो वर्षे पुरातन ज्योतिषशास्त्राची परीक्षा घेण्याची पात्रता अंनिसकडे आहे का ? कोणतेही शास्त्र समजण्यासाठी त्या शास्त्राचा उत्तम अभ्यास हवा. अंनिसच्या लोकांचा ज्योतिषशास्त्राचा अभ्यास आहे का ? ज्या विषयाचा आपला अभ्यास नाही, त्या विषयावर बोलू नये. समर्थ रामदास स्वामी म्हणतात ना.. ‘अभ्यासोनी प्रगटावे….।’
ज्योतिषशास्त्र सत्य असल्यामुळे सहस्रो काळ टिकले आहे !
कोणतीही निष्कृष्ट गोष्ट फार काळ टिकत नाही. जे चांगले आहे, तेच दीर्घकाळ टिकते, हा निसर्गनियम आहे. ज्योतिषशास्त्र सत्य आहे म्हणून टिकले, नाहीतर ते केव्हाच नामशेष झाले असते.
अन्य क्षेत्रांतही वाईट गोष्टी असतात; म्हणून त्यांचे शास्त्र चुकीचे नसते ना ?
अंनिसच्या मते ज्योतिषांत काही वाईट गोष्टी आहेत; म्हणून त्यांचा ज्योतिषशास्त्राला विरोध आहे; पण वाईट गोष्टी ज्योतिषक्षेत्रातच आहेत का ? राजकारण, समाजकारण, शिक्षण, विज्ञान, वैद्यकीय, व्यापार, कला, क्रीडा, समाजातील अन्य क्षेत्रांत वाईट गोष्टी नाहीत का ? म्हणून ते क्षेत्रच चुकीचे नसते ना ? समाजात अनेक वाईट गोष्टी असतांना त्यांचा रोख नेहमी ज्योतिषावरच का असतो ?
ज्योतिषाविषयी पूर्वग्रहदूषित आणि एकांगी विचार !
ज्योतिषाविषयी अंनिसचे विचार, मते झापडबंद, एकांगी, पूर्वग्रहदूषित आहेत. आजकाल अनेक तरुण, महिला, मध्यमवयीन लोक मोठ्या संख्येने ज्योतिष शिकण्याकडे वळत आहेत. या सुशिक्षित लोकांना सर्वसामान्य ज्ञान, सद्सद्विवेकबुद्धी आहे. काय चूक ?, काय वाईट ? हे त्यांना कळते.
इतरांच्या स्वातंत्र्यावर घाला कशासाठी ?
इतर वेळी लोकशाहीची भलावण करणारे हे लोक भविष्य जाणून घेऊ इच्छिणार्यांच्या अधिकारांवर आक्रमण का करतात ? लोकांच्या निर्णयक्षमतेवर या लोकांनी अधिकार गाजवू नये. ज्योतिषाच्या मागे लागायचे कि नाही ? हे लोकांनाच ठरवू द्या. या लोकांनी अमेरिकेसारखे जगाचे पोलीस होऊ नये. सोप्या प्रसिद्धीच्या मागे लागण्यापेक्षा त्यांनी खरोखरचे समाजकार्य करावे.
– ज्योतिष अभ्यासक प्रदीप पंडित, पुणे.