Parbhani Boycotted Voting : जिल्हाधिकार्‍यांनी मध्यस्थी केल्यानंतर मतदानाला आरंभ

बलसा खुर्द (जिल्हा परभणी) या गावातील कामे आश्‍वासन देऊनही न केल्याने  ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार !


बलसा खुर्द (जिल्हा परभणी) – परभणीसह राज्यातील ८ लोकसभा मतदारसंघात २६ एप्रिल या दिवशी मतदानाची प्रक्रिया पार पडली. बलसा खुर्द या गावातील १ सहस २९५ ग्रामस्थांनी मात्र मतदानावर पूर्ण बहिष्कार टाकला. सकाळचे ११ वाजून गेल्यानंतरही एकाही ग्रामस्थाने मतदान केले नाही. अंततः जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी गावात धाव घेत गावकर्‍यांना सांगितले, ‘‘तुमच्या मागण्यांचा विचार करू. निवडणुका झाल्या की त्यावर मार्ग काढू, पण ग्रामस्थांनी शंभर टक्के मतदान करावे.’’ त्यानंतर दुपारनंतर विलंबाने गावकर्‍यांनी मतदान करण्यास आरंभ केला.

ग्रामस्थांनी जिल्हा प्रशासनाला गावातील समस्या सांगितल्या होत्या. ‘या समस्या जर सोडवल्या नाहीत, तर मतदानावर बहिष्कार टाकला जाईल’, अशी चेतावणीही ग्रामस्थांनी जिल्हा प्रशासनाला दिली होती. जिल्हाधिकार्‍यांनी याची नोंद घेऊनही कारवाई केली नव्हती.

संपादकीय भूमिका

प्रशासनाकडे वारंवार मागणी करूनही लोकांची मागणी दुर्लक्षित करणार्‍या संबंधितांवर कारवाई करणे आवश्यक आहे !