Supreme Court On Stridhan : स्त्रीधना’वर पत्नीचाच अधिकार ! – सर्वोच्च न्यायालय

ते ठेवण्याचे अथवा विकण्याचे पतीला नाही, तर पत्नीलाच स्वातंत्र्य !

प्रतिकात्मक चित्र

नवी देहली – ‘स्त्रीधना’वर (स्त्रीधन म्हणजे लग्नापूर्वी, लग्नाच्या वेळी किंवा नंतर आई-वडील, सासर, नातेवाईक अथवा मित्र यांच्याकडून मिळालेल्या भेटवस्तू !)पतीचे कोणतेच नियंत्रण नाही. त्यावर पत्नीचाच संपूर्ण अधिकार आहे. संकटकाळात मात्र पती त्याचा वापर करू शकतो; पण नंतर त्याला पत्नीकडे ते परत करावे लागेल, असा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणी दिला आहे. स्त्रीधन ही पूर्णपणे स्त्रीचीच मालमत्ता आहे. तसेच केवळ तिलाच तिच्या इच्छेनुसार ते विकण्याचा किंवा ठेवण्याचा पूर्ण अधिकार आहे, असेही न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांच्या खंडपिठाने सांगितले.

न्यायालयाने पुढे म्हटले की, स्त्रीधनाचा अप्रामाणिकपणे अपवापर झाल्यास पती किंवा त्याच्या कुटुंबातील सदस्य यांच्यावर भा.द.वि.च्या कलम ४०६ अंतर्गत कारवाई केली जाऊ शकते. फौजदारी खटल्यांप्रमाणे ठोस पुराव्याच्या आधारे निर्णय घेऊ नये, तर पत्नीचा दावा अधिक भक्कम असण्याच्या शक्यतेच्या आधारे निर्णय घेण्यात यावा, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. खंडपिठाच्या समोर स्त्रीधनाच्या संदर्भात चालू असलेल्या खटल्याचा निकाल देतांना पत्नीचे सर्व दागिने हिसकावून घेतल्यावरून पतीला २५ लाख रुपयांची भरपाई देण्याचे आदेश दिले.