कोकण किनारपट्टीवर पावसाळ्यात येणार्‍या भरतीचे दिनांक घोषित !

प्रतिकात्मक चित्र

अलिबाग – कोकण किनारपट्टीवर यंदा पावसाळ्यात २२ दिवस समुद्राला मोठी भरती येणार आहे. त्याचे वेळापत्रक हवामान विभागाने आताच घोषित केले आहे.  या काळात साडेचार मीटरहून अधिक उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे. २० सप्टेंबरला पावसाळ्यातील सर्वांत मोठी भरती येणार आहे. जून महिन्यात ५ ते ८ आणि २३ ते २५ या कालावधीत, जुलै महिन्यात २२ ते २५,  ऑगस्ट महिन्यात १९ ते २३ आणि सप्टेंबर महिन्यात १७ ते २२ या कालावधीत मोठी भरती येणार आहे. या दिवसांसाठी मासेमारांना, तसेच किनारपट्टीवरील नागरिकांना सतर्कतेचे आदेश देण्यात येतील. रायगड जिल्ह्यात नदी, खाडी आणि समुद्र किनार्‍यावर एकूण ३८५ गावे आहेत. या गावांना स्थानिक पातळीवर नियोजन करण्याचे आदेश रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिले आहेत. या कालावधीत उधाणांचे पाणी किनारपट्टीवरील भागात शिरण्याची शक्यता आहे. शेतात खारेपाणी शिरून भूमी नापिक होण्याची शक्यता आहे.