बालपणापासूनच एकलव्याप्रमाणे साधनारत असलेल्या आणि कुटुंबियांना साधना करण्यास प्रोत्साहन देणार्‍या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती मीरा सामंत (वय ९० वर्षे)!

श्रीमती मीरा सामंत यांच्यातील जिज्ञासा आणि साधनेची तळमळ या गुणांमुळे त्यांनी साधनेचे कोणतेही मार्गदर्शन नसतांनाही बालपणापासून स्वयंस्फूर्तीने साधना केली. त्या वेळी त्यांना अनेक अनुभूतीही आल्या. त्यांना अनेक संतांचा सत्संग लाभला आणि त्यांनी त्या सत्संगाचा साधनेच्या दृष्टीने लाभ करून घेतला. या लेखातून उलगडलेल्या त्यांच्या साधनाप्रवासातून त्यांची अनेक गुणवैशिष्ट्ये उलगडली गेली आहेत. त्यांची ‘देवाप्रती भाव, साधनेची तीव्र तळमळ, त्यागी वृत्ती’ इत्यादी गुणवैशिष्ट्ये दर्शवणारे प्रसंग या लेखात दिले आहेत. २५.४.२०२४ या दिवशी श्रीमती मीरा सामंत यांच्या साधना प्रवासातील काही भाग पाहिला. आज पुढील भाग पाहू. 

(भाग ४)

या लेखाचा भाग ३ वाचण्यासाठी क्लिक करा: https://sanatanprabhat.org/marathi/787548.html

श्रीमती मीरा सामंत

१ अं २. संकष्ट चतुर्थी आणि विनायक चतुर्थी यांचे व्रत : तिने कित्येक वर्षे प्रत्येक संकष्टीला सायंकाळी स्वतः २१ मोदकांचा नैवेद्य बनवून हे व्रत निष्ठेने केले. तिच्या समवेत कधी कधी आम्ही घरातल्यांनीही हे व्रत केले.

१ अं ३. चातुर्मासाचे व्रत : आईने जवळपास २५ वर्षे चातुर्मास पाळला. या काळात ती एकभुक्त (टीप ३) रहात असे. प्रत्येक चातुर्मासाच्या पारण्याच्या वेळी आई आमच्या वसाहतीतील सर्व जण, तसेच नातेवाईक यांना महाप्रसादासाठी बोलवत असे. प्रत्येकाला यथाशक्ती दक्षिणा आणि महाप्रसाद देऊन मगच तो चातुर्मास संपत असे. त्या वेळी बनवलेल्या स्वयंपाकात अपेक्षापेक्षा अधिक लोक जेवून जात असत. सगळे जण जेवल्यावर आई जेवायला बसायची. तेव्हा काही जण घरी यायचे. त्या वेळी आई आधी त्यांना जेवायला वाढायची आणि नंतर स्वतः जेवायची. एवढे करून कधी ‘अन्न न्यून पडले’, असे झाले नाही.

टीप ३ – एकभुक्त : दिवसातून एकदाच जेवण करणे

१ क. दुपारी १२ वाजता दत्तगुरु कोल्हापूरमध्ये भिक्षा मागत असल्याने त्या वेळी दारात कुणी आल्यास त्याला विन्मुख न पाठवण्याविषयी आईने सांगणे : आम्ही जवळपास १० वर्षे कोल्हापूर येथे राहिलो. आईने आम्हाला सांगितले होते, ‘‘आपल्या दारात दुपारी बाराच्या सुमारास कोणी आल्यास त्याला भिक्षा न देता पाठवायचे नाही; कारण दत्तगुरु दुपारी १२ वाजता कोल्हापूरमध्ये भिक्षा मागतात.’’

१ ख. तीर्थक्षेत्री जाऊन देवदर्शन करण्याची आवड असणे : आई तीर्थक्षेत्री देवदर्शनासाठी आवर्जून जात असे. मी आणि भाऊ दोघेही लहान असतांना ‘आई-वडील सकाळी जवळच्या अष्टविनायकासारख्या तीर्थक्षेत्री गेले अन् संध्याकाळी परत आले आणि दिवसभर आम्ही दोघेच घरात आहोत’, असे अनेकदा घडले आहे. काही वेळा थोडे लांब जायचे असेल, तर ते आम्हाला घेऊनही तीर्थक्षेत्री जात असत. अगदी सामान्य आर्थिक स्थिती असूनही तिने बर्‍याचदा ‘साध्या एस्.टी.ने प्रवास करणे, प्रवासात स्वतः स्टोव्हवर स्वयंपाक करणे’ इत्यादी करून नरसोबाची वाडी, गाणगापूर, कुरवपूर, श्रीशैल, अशी दत्तस्थाने, तसेच केदारनाथ, बद्रीनाथ, रामेश्वर, वाराणसी, अशी देशभरातील बरीच देवळे अन् तीर्थक्षेत्रे यांचे दर्शन घेतले आहे.

१ ग. दोन्ही मुले आणि नातवंडे यांचा उपनयन संस्कार तीर्थक्षेत्री करणे : ‘उपनयन संस्कार तीर्थक्षेत्री आणि अल्प लोकांमध्ये करावा’, असा आईचा आग्रह असे. तसे ते ती इतरांना सांगत असे. त्यामुळे माझ्या थोरला भावाचा उपनयन संस्कार नृसिंहवाडी येथे झाला. त्या काळी नृसिंहवाडी येथे तितकी सुविधा नसल्याने, तसेच आर्थिक बाजूही सक्षम नसल्याने भावाच्या उपनयन संस्कारासाठी आईला पुण्याहून स्टोव्हसहित सर्व साहित्य घेऊन धर्मशाळेत रहावे लागले. तिने धर्मशाळेत राहून छोट्या प्रमाणात का होईना, भावाचा उपनयन संस्कार तिथेच केला. माझा उपनयन संस्कार बाळेकुंद्री (कर्नाटक) येथे करण्यात आला. माझ्या दोन्ही पुतण्यांचा उपनयन संस्कार नृसिंहवाडी येथे झाला.

१ घ. संतसहवास आणि संतदर्शन यांची ओढ असणे : ‘संतदर्शन व्हावे आणि त्यांच्या सत्संगात रहावे’, असे आईला सतत वाटत असे. आईला संतदर्शनाची पुष्कळ ओढ असल्यामुळे कुठे कुणी संत आल्याचे समजले, तर ती त्यांच्या दर्शनाला आवर्जून जात असे. ती संतांच्या उत्सवांनाही जाण्याचा प्रयत्न करत असे. त्यामुळे तिला अनेक संतांचे दर्शन लाभले. त्यात मला ठाऊक असलेली काही नावे, म्हणजे वरदहळ्ळी (कर्नाटक) येथील प.प. श्रीधरस्वामी, काटेल (जिल्हा सोलापूर) येथील प.पू. गुलाबबाबा, कोल्हापूर येथील प.पू. गगनगिरी महाराज, प.पू. श्रीकृष्ण सरस्वती महाराज, प.पू. चिले महाराज, प.पू. वटकर महाराज आणि प.पू. प्रज्ञानंद, प.पू. अमलानंद, नृसिंहवाडी येथील प.पू. महादबा पाटील महाराज, सांगली येथील प.पू. दासराम केळकर महाराज, सिंधुदुर्गातील प.पू. राऊळ महाराज, प.पू. परुळेकर महाराज अन् प.पू. देसाई महाराज, पुणे येथील प.पू. मामा देशपांडे आणि प.पू. गुळवणी महाराज. यांतील बहुतेक संतांचे दर्शन आई सनातनच्या संपर्कात येण्याआधी झाले. संतदर्शनाला गेल्यावर ती त्या सत्संगाविषयी आम्हाला सांगत असे. सनातनच्या संपर्कात आल्यानंतर तिला प.पू. भक्तराज महाराज, प.पू. रामानंद महाराज, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि अन्य संत यांचा सहवास लाभला. आमच्या घराला अनेक संतांच्या चरणांचा स्पर्श झाला.

१ घ १. प.पू. गुलाबबाबा यांनी सांगितल्यावर नेसत्या वस्त्रासहित लगेच त्यांच्या समवेत गोव्याला माहेरी जाणे : प.पू. गुलाबबाबा सांगलीला आले होते. त्या वेळी आईला त्यांचे प्रथम दर्शन झाले. ती केवळ त्यांच्या दर्शनाला गेली होती; परंतु ‘ती गोव्याची आहे’, हे समजल्यावर त्यांनी तिला सांगितले, ‘‘तुम्ही आमच्या समवेत लगेच चला. आम्ही तिकडे जात आहोत.’’ त्या सरशी ती आणि वडील दोघेही त्यांच्या गाडीत बसले. त्यांच्याकडे केवळ अंगावरचे कपडे आणि खिशात ३० – ३५ रुपये होते. ते प.पू. गुलाबाबा यांच्या समवेत गोव्यात आले. प.पू. गुलाबाबा आईला म्हणाले, ‘‘आज रात्री आपण तुमच्या माहेरच्या घरी मुक्कामाला जाऊया.’’ मग आई त्या ३५ – ४० जणांना घेऊन गोव्यात तिच्या माहेरी गेली. रात्री आईने तिथल्या नातेवाइकांकडून सर्वांसाठी महाप्रसाद बनवला. दुसर्‍या दिवशी पहाटे उठून त्यांच्या दुपारच्या महाप्रसादासाठी पोळ्या इत्यादी बनवल्या. पहाटे प.पू. गुलाबबाबा आईला म्हणाले, ‘‘येथे आईचे रामराज्य आहे !’’ त्यानंतर सकाळी अल्पाहार करून आई-बाबा त्यांच्यासह गोव्यातील कवळे, मंगेशी इत्यादी देवळांत दर्शन घ्यायला गेले.

१ घ २. आई गरोदर असतांना तिची कुरवपूरहून आलेल्या सद्गृहस्थांची भेट होणे आणि त्यांनी कुरवपूरचे तीर्थ देऊन ‘हे तुझ्यासाठी आणले आहे’, असे आईला सांगणे : माझ्या जन्माच्या वेळी गरोदर असतांना आई पुणे येथे रहात होती. तेथे जवळ असलेल्या एका घरामध्ये कर्नाटकमधील कुरवपूर (टीप ४) येथून एक सद्गृहस्थ आले होते. आई त्यांच्या दर्शनाला गेली. त्यांनी तिला आवर्जून कुरवपूर येथून आणलेले तीर्थ दिले आणि ‘हे तुझ्यासाठी आणले आहे’, असे सांगितले. मी साधनेकडे वळल्यानंतर तिने मला ही अनुभूती सांगितली.

टीप ४ – कुरवपूर : दत्तात्रेयांचे पहिले अवतार असलेल्या श्रीपाद श्रीवल्लभ यांची तपोभूमी.

१ घ ३. मुलाच्या प्रकृतीची काळजी वाटत असल्याने त्याविषयी शक्तीचा संचार होत असलेल्या सत्पुरुषांना विचारणे आणि ‘मुलाला पुढे सद्गुरु भेटणार असल्याने काळजी करू नकोस’, असे त्यांनी सांगणे : कोल्हापूर येथील शाहूपुरीमध्ये एका ठिकाणी एका सत्पुरुषांमध्ये प्रत्येक पौर्णिमेला दैवी शक्तीचा संचार होत असे. आई-वडील बर्‍याचदा संचाराच्या ठिकाणी केवळ सत्संगासाठी जात असत. ते ठिकाण आम्ही रहात असलेल्या जागेपासून पुष्कळ दूर असले, तरी ‘रात्री पायी जाणे आणि सर्व संपल्यानंतर पायी परत येणे’, हा आईचा नेम होता. कधी कधी ती आम्हालाही समवेत घेऊन जात असे. संचार असलेली शक्ती उपस्थितांपैकी कुणालाही बोलवत असे आणि मग त्या व्यक्तीला काही सांगत असे अथवा विभूती देत असे. त्या शक्तीला काही प्रश्न विचारल्यास ती शक्ती त्याचे उत्तर देत असे. मी सतत आजारी असल्याने आई-वडिलांना माझी काळजी वाटत असे. मला प्रथम संचाराच्या ठिकाणी नेले. तेव्हा संचार झालेल्या शक्तीने मला आणि आईला बोलावले. आईला माझ्या प्रकृतीविषयी पुष्कळ काळजी वाटत असल्यामुळे ‘याचे पुढे कसे काय होणार ?’, असे तिने त्या शक्तीला विचारले. तेव्हा त्या सत्पुरुषांनी तिला सांगितले, ‘‘याला मोठेपणी सद्गुरु भेटतील. त्यानंतर हा तिन्ही लोकी झेंडा लावील. काळजी करू नकोस !’’

१ घ ४. प.पू. मामा देशपांडे यांच्या सांगण्यानुसार मुलाचा विवाह ठरवणे आणि त्याविषयी मुलाला योग्य वेळी सांगणे : क्वचित् काही संतांना ती व्यवहारातील प्रश्न विचारत असे आणि योग्य वेळी आवश्यक तेवढे इतरांना सांगत असे. माझ्या लग्नासंबंधी एक स्थळ आले होते. त्या मुलीचे छायाचित्र घेऊन ती प.पू. मामा देशपांडे यांच्याकडे गेली आणि त्यांना ते छायाचित्र दाखवून ‘काय करू ?’, असे तिने विचारले. तेव्हा प.पू. मामांनी आईला सांगितले, ‘‘नको. कोणतेही स्थळ स्वीकारण्याआधी मला छायाचित्र दाखव. मगच पुढे जा, अन्यथा पुष्कळ त्रास होईल !’’ मग काही कालावधीनंतर सौ. नंदिनीचे स्थळ आले. तेव्हा तिचे छायाचित्र पाहून प.पू. मामांनी या लग्नाला होकार दिला. हे सर्व आईने मला ‘सौ. नंदिनीशी विवाह ठरणार’, असे दिसू लागल्यावर सांगितले.’

– आधुनिक वैद्य दुर्गेश सामंत (श्रीमती मीरा सामंत यांचा मुलगा), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (फेब्रुवारी २०२४) ०

२. सनातनच्या संपर्कात आल्यानंतर केलेली साधना

२ अ. संपर्कात येणार्‍या व्यक्तींना आपल्या परीने साधना सांगणे

१. ‘सनातनच्या संपर्कात यायच्या आधी आई इतरांना ‘कुलदेवता आणि संत यांच्या दर्शनाला जा’, असे सांगत असे. सनातनच्या संपर्कात आल्यावर ती सर्वांना नामजप करण्याच्या संदर्भात सांगत असे. ती याविषयी परिचितांप्रमाणेच अगदी आमच्या घरासमोर असलेल्या महानगरपालिकेचा रस्ता स्वच्छता करणार्‍या वृद्ध सफाई कर्मचारी स्त्रीलाही सांगत असे. एक-दोनदा सांगूनही कोणी कृती करत नसेल, तर आई सांगायचे बंद करत असे.’ – आधुनिक वैद्य दुर्गेश सामंत (श्रीमती मीरा सामंत यांचा मुलगा), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

२. ‘घरी नातेवाईक आले की, आई त्यांच्याशी व्यवहारातील अन्य विषय बोलण्याऐवजी त्यांना साधना आणि नामस्मरण यांचे महत्त्व सांगायच्या.’ – श्रीमती आरती प्रमोद सामंत (श्रीमती मीरा सामंत यांची थोरली स्नुषा), पुणे

२ आ. घरी आलेल्या साधकांना सेवा करण्यासाठी प्रोत्साहन देणे : ‘घरी आलेल्या साधकांशी बोलणे, त्यांना सेवा करण्यासाठी प्रोत्साहन देणे’, या कृती ती सतत करत असे. ती साधिकांना, विशेषकरून विवाहित साधिकांना सांगते, ‘‘आपण नुसते घरात राहिलो, तर ‘तुझे-माझे’, एवढेच करत राहू. त्यामुळे घरात बांधले गेल्यासारखे संसारात अडकून राहू नका. आपण संसारात अडकून राहिलो, तर ‘तुझे-माझे’ करणे’, यातून कधीच सुटका होणार नाही. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने आपल्याला एवढी सेवा मिळाली आहे, तर ती आपण करायला हवी.’’ नवविवाहित परिचित मुली किंवा विवाहयोग्य मुली यांना आई सांगायची, ‘‘सनातनच्या आश्रमात एकदा तरी जाऊन या. ‘संसार शिस्तीने कसा करायचा ?’, हे कळेल.’’

२ इ. मिरज येथील सनातनच्या आश्रमात सेवा करणे : पूर्वी ती वेळ मिळेल, तेव्हा आवर्जून मिरज येथील सनातनच्या आश्रमात सेवा करण्यासाठी जात असे. ‘सौ. आशालता सखदेवआजी (आताच्या (कै.) सद्गुरु (सौ.) आशालता सखदेवआजी) यांच्या समवेत आश्रमात सेवा करतांना त्यांच्याकडून उकडीचे मोदक करणे इत्यादी शिकले’, असे आई आम्हाला सांगत असे. त्या वेळी तेथे सेवा करणार्‍या श्रीमती अंभोरेआजी (श्रीमती अन्नपूर्णा अंभोरेआजी (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ९१ वर्षे)) आणि तिची चांगली मैत्री झाली होती.

त्या आधी आई गोंदवले येथे किंवा सांगली येथील प.पू. केळकर महाराज यांच्याकडे काही उत्सव असल्यास तेथे सेवेसाठी जात असे. घरी मोठा विशेष धार्मिक कार्यक्रम, उदा. चातुर्मासाचे उद्यापन इत्यादी असेल, तर आधी आश्रमातील साधकांसाठी महाप्रसाद पाठवत असे आणि मग घरात महाप्रसाद वाढायला घेत असे.’

– आधुनिक वैद्य (डॉ.) दुर्गेश सामंत

२ ई. ‘आई स्वतः नियमित दैनिक ‘सनातन प्रभात’ वाचायच्या आणि त्यावर चर्चा करायच्या.

२ उ. सनातनचा कोणताही ग्रंथ आला की, आई तो लगेच खरेदी करून प्राधान्याने वाचायच्या. कोणालाही भेट देण्यासाठी त्या सनातनचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने वापरायच्या.’

– श्रीमती आरती प्रमोद सामंत

२ ऊ. ‘दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्र प्रसिद्ध होत असते. आई त्या छायाचित्राला नमस्कार करते.

२ ए. चातुर्मासाच्या पारण्याच्या दिवशी मुलगा आणि सून यांना गुरूंनी बोलवल्यावर त्यांनी पारण्याला थांबण्यापेक्षा गुरूंकडे जाणे आवश्यक असल्याचे आईने नातेवाइकांना सांगणे : साधारण वर्ष १९९४ मध्ये एकदा आमच्या घरी ज्या दिवशी आईचे चातुर्मासाचे पारणे (उद्यापन) होते, त्याच दिवशी प.पू. भक्तराज महाराज ईश्वरपूर (जिल्हा सांगली) येथे आले होते. त्यांनी त्यांच्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे ईश्वरपूर येथे पोचल्यावर मला आणि सौ. नंदिनी यांना ईश्वरपूर येथे बोलवून घेतले. ते तिथे असेपर्यंत आम्हाला आपल्या सत्संगात ठेवत. त्यांनी बोलवले; म्हणून आम्ही उभयतां ईश्वरपूरला गेलो. घरी पारण्याला आलेले नातेवाईक आणि अन्य शेजारी यांना आमची अनुपस्थिती जाणवली. त्यांनी त्याबद्दल आईला विचारले. तेव्हा तिने त्यांना सांगितले, ‘‘त्यांना त्यांच्या गुरूंनी बोलवले असल्यामुळे ते दोघे त्यांच्याकडे गेले आहेत. त्यामुळे त्यांनी इथे उपस्थित रहाणे आवश्यक नाही.’’

२ ऐ. मुलगा वैद्यकीय व्यवसाय बंद करून पूर्णवेळ साधना करणार असल्याचे कळल्यावर आईला काहीही न वाटणे आणि तिने वडिलांना ‘काळजी करू नका’, असे समजावणे : वर्ष १९९८ च्या गुरुपौर्णिमेच्या दोन दिवस आधी मी माझा वैद्यकीय व्यवसाय बंद करून पूर्णवेळ साधना करण्याचे ठरवले. लगेच त्या रात्री मी दूरभाष करून वडिलांना तसे सांगितले आणि त्यांना ‘आईला सांगा’, असे म्हणालो. नंतर या विषयावर आमच्या कुटुंबात काहीच बोलणे झाले नाही. २ वर्षांनंतर एकदा वडील मला म्हणाले, ‘‘तू व्यवसाय बंद करणार’, हे समजल्यानंतर तुझ्या आईला काहीच वाटले नाही. ती काही बोलली नाही; पण मी अस्वस्थ झालो. ‘तू (मुलगा), नंदिनी (सून) आणि मुकुल (नातू) यांचे पुढे कसे होणार ?’, या काळजीच्या विचारांनी मला दोन दिवस रात्री झोप लागली नाही.’’ त्यावर मी त्यांना विचारले, ‘‘मग त्याबद्दल काय केले ?’’ तेव्हा ते म्हणाले, ‘‘तुझ्या आईशी बोललो. तिने सांगितले, ‘काही काळजी करू नका ! ते देवाच्या सेवेसाठी जात आहेत. काही होणार नाही !’ तिने हे सांगितल्यानंतर माझ्या मनातील सर्व काळजी दूर झाली.’’

२ ओ. ‘एकदा अध्यात्माचा मार्ग धरला की, परत माघारी फिरायचे नाही’, असे आईने मुलाला सांगणे : वर्ष २००१ मध्ये वडिलांचे निधन झाल्यानंतर काही कारणाने मी परत दोन-चार मासांनी सांगलीला गेलो होतो. त्या वेळी आई माझ्याशी बोलतांना म्हणाली, ‘‘तुम्हाला ‘या मार्गाला जा’, असे आम्ही सांगितले नाही. तुम्ही तुमचे ठरवून गेलात; पण ‘या मार्गातून परत माघारी येऊ नका. जीवनात एकदा हे धरले, तर काही झाले, तरी ते सोडायचे नाही’, हे मात्र सांगून ठेवते.’’

– आधुनिक वैद्य (डॉ.) दुर्गेश सामंत

२ औ. सुनांना साधना करण्यासाठी प्रोत्साहन देणे

२ औ १. सेवा करण्यास प्रोत्साहन देणे

अ. ‘मी बाहेर सेवेला जात असतांना आईंनी मला कधीही विरोध केला नाही. तेव्हा त्या ‘मला बाहेर जाऊन सेवा करता येत नाही. तुम्हाला जमत आहे, तोपर्यंत तुम्ही करा’, असे सांगायच्या.’ – श्रीमती आरती प्रमोद सामंत

आ. ‘मार्च १९९३ मध्ये मी आणि माझे पती आधुनिक वैद्य दुर्गेश यांनी सांगली येथे आमचा खासगी वैद्यकीय व्यवसाय चालू केला. त्यानंतर ७.११.१९९३ या दिवशी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले सांगली येथे अध्यात्मप्रसारासाठी आले. त्यानंतर मी उत्तरोत्तर प्रसारकार्यात व्यस्त होत गेले. याअंतर्गत मी अनेकदा शनिवार-रविवार सांगलीच्या बाहेर कोल्हापूर, कराड, सातारा, सोलापूर आणि गोवा येथे जात असे. त्या वेळी आधुनिक वैद्य दुर्गेश घरी एकटेच असायचे, तरीही आईंनी मला कधीही कोणत्याही प्रकारे विरोध केला नाही.

२ औ २. धाकट्या सुनेला पूर्णवेळ साधना करण्यास विरोध न करणे : पुढे ध्यानीमनी नसतांना अकस्मात् आधुनिक वैद्य दुर्गेश स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय बंद करून पूर्णवेळ साधना करू लागले आणि त्यानंतर १ – २ मासांत मीही पूर्णवेळ साधना करू लागले. त्या वेळी आमच्या मुलाचे (कु. मुकुल याचे) वय दीड वर्ष होते. आम्ही व्यवसाय, घर आणि वाहन यांसाठी कर्ज घेतले होते. आई-बाबांनी त्यांच्या दोन्ही मुलांकडून कधीही आर्थिक साहाय्याची अपेक्षा केली नाही, उलट त्यांनी आम्हालाच साहाय्य केले. कोणत्याही आई-वडिलांना ‘मुलगा आणि सून यांनी उतारवयात आपल्या जवळ असावे’, असे वाटणे साहाजिक असते. असे असूनही आईंनी आम्हाला पूर्णवेळ साधना करण्यासाठी कधीही विरोध केला नाही.

३. सनातनच्या रामनाथी आश्रमातील आश्रमजीवन

३ अ. रामनाथी आश्रमात रहायला आल्यावर आश्रमजीवन कृतज्ञतापूर्वक स्वीकारणे : आई त्यांच्या आयुष्यातील अधिक काळ त्यांच्या सांगली येथील स्वतःच्या प्रशस्त बंगल्यात राहिलेल्या आहेत. त्यानंतर गेली ७ – ८ वर्षे त्या पुणे येथे थोरल्या सुनेसह आपल्या नातवाकडे रहायच्या. जुलै २०२३ मध्ये त्यांच्या आरोग्याच्या तक्रारीमुळे त्यांना गोवा येथे यावे लागले. त्यांनी ते स्वीकारले आणि त्या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात रहायला आल्या. त्यांना त्यांच्या पद्धतीच्या जेवणाची सवय होती, तरीही त्यांनी आश्रमात बनवलेले जेवण कृतज्ञतापूर्वक स्वीकारले.’

– आधुनिक वैद्या (डॉ.) सौ. नंदिनी दुर्गेश सामंत (श्रीमती मीरा सामंत यांची धाकटी स्नुषा), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

३ आ. आसक्ती नसणे आणि इतरांचा विचार करणे : ‘आई रामनाथी आश्रमात रहायला आल्यानंतर तिचे एक भाऊ तिला भेटायला आले होते. त्यांनी भेट म्हणून पुष्कळ रुपये तिच्या हातात दिले. त्यांचे मन मोडायला नको; म्हणून आईने ‘एक नोट घेते. बाकी तुझ्याकडे ठेव’, असे सांगत ते परत केले. ‘मामांनी दिलेल्या पैशातूनही त्यांना काहीतरी भेटवस्तू घेऊन दे’, असे आईने मला सांगितले.’

– आधुनिक वैद्य (डॉ.) दुर्गेश सामंत

३ इ. बोलण्यात किंवा अन्य कुठेही वेळ न दवडता सतत नामजप करणे : ‘माझा विवाह झाल्यापासून मी आईंना नियमितपणे न चुकता ६ ते ८ घंटे बसून नामजप करतांना पाहिले आहे. घरात त्या आवश्यक तेवढेच लक्ष घालत आणि बोलत. घरी कुणी आले, तरी त्या आवश्यक तेवढेच बोलून नामजप करायच्या. नातेवाइकांचा, म्हणजे अगदी त्यांच्या भावंडांचा दूरभाष आला, तरी त्या नामजपालाच प्राधान्य देत.

आता त्यांचे वय ९० वर्षे आहे. रामनाथी आश्रमात येण्यापूर्वी त्या आजारी असल्याने त्यांना ८ दिवस रुग्णालयातील अतिदक्षता विभागात भरती केले होते, तरीही रामनाथी आश्रमात आल्यापासून त्या सकाळी लवकर उठून अंघोळ आणि अल्पाहार करतात अन् त्यानंतर आसंदीवर बसून दुपारच्या महाप्रसादापर्यंत नामजप करतात. महाप्रसाद झाल्यानंतर त्या पुन्हा रात्रीच्या महाप्रसादापर्यंत आसंदीवर बसून नामजप करतात. अशा प्रकारे सकाळी ८ ते रात्री १० या कालावधीत विश्रांती न घेता त्या आसंदीवर बसून अखंड नामजप करतात.

३ ई. रामनाथी आश्रमातील वास्तव्यात विहिणींचे आपापसांत मैत्रिणी असल्याप्रमाणे जुळणे : माझ्या विवाहानंतर माझ्या सासूबाई आणि आई (श्रीमती सुनंदा शरदचंद्र सामंत, वय ८७ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६२ टक्के) यांची मोजक्या वेळा भेट झाली आहे. आता काही कारणाने त्या दोघी रामनाथी आश्रमात एकत्रित रहात आहेत. पहिल्या दिवसापासून जणू त्या पुष्कळ वर्षांपासून गाढ मैत्रिणी असल्याप्रमाणे त्यांचे जुळत असल्याचे दिसते. त्यांच्यात कुठेही मतभेद किंवा संघर्ष होत नाही. त्या दोघीही साधनेच्या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही विषयावर बोलत नाहीत.

३ उ. आई रुग्णाईत असूनही त्यांचा चेहरा तेजस्वी दिसणे आणि त्यांची सेवा करतांना आनंद जाणवणे : जेव्हा आई रामनाथी आश्रमात आल्या, तेव्हा त्या रुग्णाईत होत्या, तरीही त्यांचा चेहरा तेजस्वी दिसतो. मी गेली २५ वर्षे रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात संगणकीय सेवेत असल्यामुळे मला शारीरिक सेवांची सवय राहिलेली नाही. आईंची सेवा करतांना मला दमायला होते; परंतु मला आनंद जाणवतो.’

‘देवाने भले करणे, म्हणजे मुखात अखंड नाम रहाणे होय.’ – श्रीमती मीरा सामंत (वय ९० वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (फेब्रुवारी २०२४)


६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती मीरा सामंत (वय ९० वर्षे) यांची त्यांच्या नातेवाइकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

१. श्रीमती सुनंदा शरदचंद्र सामंत (श्रीमती मीरा सामंत यांच्या विहीणबाई (मुलाच्या सासूबाई)), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

१ अ. ‘श्रीमती मीरा सामंत या परोपकारी आहेत. त्या इतरांना समजून घेतात.

१ आ. प्रेमभाव : घरात कोणीही आले की, त्या त्यांची विचारपूस करतात. त्यांना भेटायला कोणी पाहुणे आले, तर त्या त्यांचे यथायोग्य स्वागत करतात, तसेच त्यांना निरोप देण्यासाठी खोलीबाहेर उद्वाहक यंत्रापर्यंत जातात.

१ इ. त्या स्वतःचे विचार प्रांजळपणे आणि स्पष्टपणे व्यक्त करतात.

१ ई. धार्मिक वृत्ती : त्यांनी पुष्कळ व्रतवैकल्ये आणि देवधर्म केला आहे; परंतु ‘त्याचा इतरांना त्रास होणार नाही’, याची त्यांनी नेहमीच काळजी घेतली. घरातील सर्व कामे सांभाळून त्या ते करायच्या.

१ उ. इतरांना साहाय्य करणे : वर्ष १९९५ मध्ये माझे यजमान (कै. शरदचंद्र विठ्ठल सामंत) कर्करोगाने आजारी होते. त्यांचे कर्करोगाचे शस्त्रकर्म सांगली येथे झाले. त्या वेळी आम्ही आमच्या जावयांकडे (आधुनिक वैद्य (डॉ.) दुर्गेश सामंत यांच्याकडे) रहायला होतो. त्या शस्त्रकर्माच्या वेळी त्यांनी आम्हाला सर्वतोपरी साहाय्य केले. त्यांनी मला आणि माझ्या यजमानांना पुष्कळ धीर दिला. त्यामुळे आम्हा उभयतांना त्यांचा पुष्कळ आधार वाटला. एवढे साहाय्य करूनही त्यांना त्याबद्दल कोणताही मोठेपणा नव्हता. त्या वेळी होळी पौर्णिमेला त्यांनी स्वतः पुरणपोळ्या करून आम्हाला खाऊ घातल्या होत्या. त्या प्रसंगी त्यांनी आम्हाला केलेले साहाय्य मी कधीही विसरणार नाही.’

२. सौ. अदिती अनिल सामंत (श्रीमती मीरा सामंत यांच्या विहीणबाईंची सून), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

२ अ. ‘आजींचा स्वभाव पुष्कळ निर्मळ आहे. त्या सतत हसतमुख असतात.

२ आ. संपूर्ण दिनक्रम घड्याळ्याच्या काट्यानुसार काटेकोरपणे पार पाडणे : आजी वेळेला पुष्कळ महत्त्व देतात. त्यांचे वय ९० वर्षे असूनही त्यांचा दिनक्रम घड्याळाच्या काट्याकडे बारीक लक्ष ठेवून चाललेला असतो. ‘सकाळी उठणे, आवरणे, डोळ्यांत औषधाचे थेंब घालणे, व्यायामासाठी चालायला जाणे, रात्री महाप्रसादानंतर दातांची संवेदनशीलता न्यून करण्यासाठी पेस्ट लावून १० मिनिटे बसणे, रात्री झोपायला जाणे’, हे सर्व त्या ठरल्या वेळी करतात.

२ इ. सात्त्विक पोषाख आवडणे आणि तो परिधान केल्यावर कौतुक करणे : मी जेव्हा साडी परिधान करते, तेव्हा त्या मला जवळ बोलवून आणि माझा हात धरून ‘साडी छान आहे. छान दिसतेस !’, असे म्हणून माझे कौतुक करतात. आम्ही साडी नेसली की, त्यांना पुष्कळ आनंद होतो.

२ ई. सेवा करून खोलीत आल्यावर प्रेमाने विचारपूस करणे आणि सेवेचे महत्त्व समजावणे : सेवा करून रात्री खोलीत आल्यावर आजी नेहमी ‘आलीस का ? आज काय सेवा केली ?’, अशी माझी प्रेमाने विचारपूस करतात. त्यानंतर त्या म्हणतात, ‘‘तुम्ही आश्रमात सेवा करता, हे किती चांगले आहे ! घरात राहिला असता, तर नको नको ते विचार करत राहिला असता.’’

२ उ. प.पू. भक्तराज महाराज यांची भजने मनापासून ऐकणे आणि म्हणणे : त्यांना प.पू. भक्तराज महाराज यांची भजने ऐकायला आवडतात. त्यांना वयोमानामुळे ऐकू अल्प येत असल्यामुळे त्या अत्यंत एकाग्रतेने आणि लक्षपूर्वक भजने ऐकतात. कधी कधी त्या त्यांतील काही भजने सुंदर आवाजात म्हणतातही !

२ ऊ. पूर्वायुष्यातील साधनेविषयीचे रम्य प्रसंग सांगणे : सेवा करून रात्री खोलीत आल्यावर मी त्यांच्या जवळ जाऊन बसते. तेव्हा ‘त्या कवळे (गोवा) येथील शांतादुर्गादेवीच्या मंदिरात नेहमी जायच्या. देवीला अभिषेक करण्यासाठी त्या तेथील तळ्यातील पाणी सोवळ्यात आणून द्यायच्या’ इत्यादी त्यांच्या पूर्वायुष्यातील साधनेविषयी रम्य प्रसंग सांगतात.

२ ए. त्यांच्या चेहर्‍याकडे पाहिल्यावर पुष्कळ आनंद जाणवतो. त्यांच्या अस्तित्वामुळे घरात चैतन्य जाणवते.’

(फेब्रुवारी २०२४)