माझे १६ सहस्र कोटी रुपयांचे आस्थापन कवडीमोल दराने घेतले ! – डी.एस्. कुलकर्णी यांचा आरोप

डी.एस्. कुलकर्णी
  • ४ बांधकाम व्यावसायिकांवर गंभीर आरोप       
  • माझ्या विरोधात सर्व ठरवून केले आहे

पुणे – ‘डी.एस्. कुलकर्णी डेव्हलपर्स लिमिटेड’ हे आस्थापन पुणे येथील ४ बांधकाम व्यावसायिकांनी कवडीमोल दराने विकत घेतले आहे; मात्र ते ठेवीदारांचे पैसे परत करण्यास सिद्ध नाहीत, असा गंभीर आरोप डी.एस्. कुलकर्णी यांनी केला आहे. व्ही.टी. पार्लेशा, जयंत शहा, अशोक चोरडिया आणि प्रमोद रांका यांनी ‘एन्.सी.एल्.टी.’ (राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण) कडून कुलकर्णी यांच्या मालमत्ता विकत घेतल्या आहेत. १६ सहस्र कोटींच्या माझ्या मालमत्ता केवळ ८२६ कोटी रुपयांना विकत घेतल्या असल्याचा खुलासाही डी.एस्. कुलकर्णी यांनी केला आहे. या प्रकाराविरोधात कुलकर्णी यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आहे. न्यायालयाने १० मेपर्यंत सर्व मालमत्ता विकण्यास स्थगिती दिली आहे.

डी.एस्. कुलकर्णी म्हणाले, ‘‘वर्ष २०१७ मध्ये मला एकाच वेळी ३२ सहस्र ठेवीदारांनी पैसे मागितले. मला आणखी एका महिन्याचा अवधी दिला असता, तर सर्व मुद्दे निकाली लागले असते. मी पैसे देत होतो; मात्र मला द्यायला थोडेच पैसे अल्प पडत होते. मला अटक होण्याआधी सर्व अधिकोषांतील (बँकेतील) खाती गोठवण्यात आली असून माझ्या विरोधात हे सर्व ठरवून केले आहे.’’

पैसे परत कसे देऊ ?

सध्या अंगावरील कपडे सोडता माझ्याकडे काही नाही. माझ्या मालमत्ता, तसेच अधिकोषातील खाती गोठवली आहेत. मी ठेवीदारांचे पैसे कसे परत करू ? असाही प्रश्न कुलकर्णी यांनी उपस्थित केला.