बुलढाणा जिल्ह्यातील पीर सैलानी बाबाच्या दर्ग्यातील मनोरुग्णांचे प्रकरण
मुंबई – बुलढाणा जिल्ह्यातील पीर सैलानी बाबाच्या दर्गामध्ये मनोरुग्ण आणि मानसिक आजारी व्यक्तींवर अमानवी पद्धतीने उपचार होत होते. याविषयी वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर राज्य मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती के.के. तातेड यांनी हा विषय ‘सुओ मोटो’ विचारार्थ प्रविष्ट करून घेत राज्याचे मुख्य सचिव, पोलीस महासंचालक, तसेच बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांना समन्स जारी केले आहे.
‘या संपूर्ण प्रकरणाची वस्तूस्थिती तपासावी. पीडित रुग्णांना मिळालेल्या अमानवी वागणुकीविषयी यापूर्वी कोणतीही कारवाई करण्यात आली आहे का ? असेल तर त्याचा तपशील द्यावा आणि नसेल तर त्याचे कारण द्यावे, तसेच बुलढाणा जिल्ह्यात मनोरुग्णांवरील वैद्यकीय उपचारांची व्यवस्था आहे का ? असेल तर संबंधित रुग्णालयाची क्षमता किती आहे ?’, या प्रश्नांची उत्तरे देण्याचे निर्देश न्या. तातेड यांनी दिले आहेत.
काय आहे प्रकरण ?
‘स्किझोफ्रेनिया, हिस्टेरिया यांसह विविध मानसिक आजारांनी ग्रस्त शेकडो रुग्णांना सैलानी बाबांच्या दर्ग्यामध्ये उपचारांसाठी नेले जाते. त्याठिकाणी तरुण आणि आक्रमक स्वरूपाच्या रुग्णांना बंद खोलीत विनावस्त्र लोखंडी पुलाला बांधून ठेवले जाते. या ठिकाणी अनेक रुग्ण हे १ ते १४ वर्षांपासून बंदिस्त आहेत’ अशा स्वरूपाच्या ‘दी लॅन्सेट मेडिकल जर्नल’मध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालाचे वृत्त ‘संडे टाइम्स’ने नुकतेच दिले होते. डॉ. हिंमतराव आणि प्रमोदिनी बावस्कर यांनी या धक्कादायक अन् विदारक वस्तूस्थितीवर अहवालाच्या निमित्ताने प्रकाश टाकला आहे. या पार्श्वभूमीवर मानवाधिकार आयोगाने या दर्ग्यातील उपचारांची स्वत:हून नोंद घेतली. |