पुणे येथे एका व्यक्तीकडून ३ लाखांहून अधिक रुपये जप्त !
पुणे – कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातील शनिवारवाडा प्रवेशद्वारावर २२ एप्रिल या दिवशी दुपारी १२ वाजता एका व्यक्तीकडून ३ लाख ८० सहस्र ५०० रुपये जप्त करण्यात आले. याविषयी संबंधित व्यक्तीने योग्य स्पष्टीकरण न दिल्याने ती रक्कम जिल्हा कोषागार कार्यालयामध्ये जमा केली आहे, अशी माहिती साहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी स्नेहा देवकाते यांनी दिली.
पनवेल येथे वाहतूक पोलिसाला शिवीगाळ आणि मारहाण करणारे तिघे जण कह्यात !
पनवेल – विनाहेल्मेट भरधाव वेगात दुचाकी चालवणार्या तरुणावर वाहतूक पोलिसाने ५ सहस्र ५०० रुपयांची दंडात्मक कारवाई केली. यामुळे संतप्त तरुण, त्याचे वडील आणि त्याचा मित्र यांनी वाहतूक पोलिसाला शिवीगाळ अन् धक्काबुक्की करत मारहाण केली. या प्रकरणी पोलिसांनी पिता, पुत्र यांच्यासह तिघांविरोधात गुन्हा नोंदवून आरोपींना कह्यात घेतले आहे.
संपादकीय भूमिकाकायद्याचा धाक नसल्याचेच लक्षण ! |
नवी मुंबईत ज्येष्ठ नागरिकाची सायबर टोळीकडून फसवणूक
नवी मुंबई – गुन्हे शाखेमधील अधिकारी असल्याचे भासवून एका सायबर टोळीने सीवूड्स भागातील एका ज्येष्ठ नागरिकाला त्याच्या आधार कार्डचा वापर चुकीची वस्तू खरेदी करण्यासाठी झाल्याची भीती दाखवली, तसेच त्यांचे बँक खाते तपासण्याच्या बहाण्याने त्या ज्येष्ठ नागरिकाकडून तब्बल १२ लाख २१ सहस्र रुपयांची रक्कम उकळली. एन्.आर्.आय. पोलिसांनी या प्रकरणातील सायबर टोळीविरोधात फसवणुकीसह आयटी ॲक्टनुसार गुन्हा नोंद करून त्यांचा शोध चालू केला आहे.
पुणे येथे धर्मांध दुचाकी चोरास अटक !
पुणे – शहर परिसरातील दुचाकी गाड्यांची चोरी करणारा शाबीर नदाफ याला गुन्हे शाखेच्या दरोडा आणि वाहन चोरीविरोधी पथक क्र. २ ने अटक केली आहे. त्याच्याकडून १ लाख २० सहस्र रुपये किंमतीच्या ३ दुचाकी गाड्या जप्त केल्या आहेत. त्यामुळे हडपसर, कोंढवा आणि कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यातील ३ गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे.
औषध आणि अन्न प्रशासनातील अधिकार्यांना गणवेश देण्याचा प्रस्ताव सादर !
मुंबई – औषध आणि अन्न प्रशासनातील अधिकारी पोलिसांप्रमाणेच चौकशी करणे, धाडी घालणे वा तत्सम कारवाई करतात; पण त्यांना पोलिसांप्रमाणे गणवेश वा इतर अधिकार नसल्यामुळे त्यांना पुढील कारवाई करता येत नाही. यासाठी अन्न आणि औषध प्रशासनातील अधिकार्यांना पोलिसांप्रमाणे प्रशिक्षण अन् गणवेश देण्याचा प्रस्ताव राज्यशासनाकडे पाठवण्यात आला आहे. ‘पोलिसांप्रमाणे खाकीऐवजी सीमा शुल्क विभागाप्रमाणे पांढरा किंवा निळा गणवेश, तसेच त्यावर अधिकारी-कर्मचारी यांच्या पदानुसार निळ्या किंवा लाल रंगाच्या पट्ट्या असाव्यात’, असेही प्रस्तावात म्हटले आहे.