श्रीमती मीरा सामंत यांच्यातील जिज्ञासा आणि साधनेची तळमळ या गुणांमुळे त्यांनी साधनेचे कोणतेही मार्गदर्शन नसतांनाही बालपणापासून स्वयंस्फूर्तीने साधना केली. त्या वेळी त्यांना अनेक अनुभूतीही आल्या. त्यांना अनेक संतांचा सत्संग लाभला आणि त्यांनी त्या सत्संगाचा साधनेच्या दृष्टीने लाभ करून घेतला. या लेखातून उलगडलेल्या त्यांच्या साधनाप्रवासातून त्यांची अनेक गुणवैशिष्ट्ये उलगडली गेली आहेत. त्यांची ‘देवाप्रती भाव, साधनेची तीव्र तळमळ, त्यागी वृत्ती’ इत्यादी गुणवैशिष्ट्ये दर्शवणारे प्रसंग या लेखात दिले आहेत. २२.४.२०२४ या दिवशी श्रीमती मीरा सामंत यांच्या साधना प्रवासातील पहिला भाग पाहिला. आज पुढील भाग पाहू. (भाग २)
भाग १ वाचण्यासाठी क्लिक करा: https://sanatanprabhat.org/marathi/786425.html
१ ऊ. सोवळे पाळणे : आई घरात सर्व सोवळे नीट पाळत असे आणि इतरांनाही ते पाळायला लावत असे. तिच्या मासिक पाळीच्या वेळी माझे वडील, थोरले बंधू आणि मी स्वयंपाक करत असू. त्यामुळे आम्हा तिघांनाही स्वयंपाक चांगल्यापैकी बनवता येऊ लागला.
१ ए. कुलदेवतेच्या उपासनेची तळमळ असणे
१ ए १. कुलदेवता शोधून काढणे : आईचे लग्न झाल्यानंतर तिला समजले की, सासरच्या व्यक्तींना त्यांची कुलदेवता ठाऊक नाही. त्यामुळे सासरी कुलदेवतेची उपासना होत नसे. मग तिने यासंदर्भात चौकशी करायला आरंभ केला. आरंभी तिला याविषयी यश आले नाही; परंतु प्रयत्न करत राहिल्यानंतर काही वर्षांनी तिला ‘परुळे (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील श्री वेतोबा हा आपला कुलदेव आहे’, हे समजले.
१ ए २. कुलदेवतेच्या दर्शनाला जाणे : कुलदेवतेबद्दल माहिती मिळाल्यानंतर आई प्रथमच सिंधुदुर्गात कुलदेवतेच्या दर्शनाला जाऊन आली. त्यानंतर तिने घरातील इतरांनाही कुलदेवतेच्या दर्शनाला जाण्यासाठी उद्युक्त केले.
१ ए ३. कुलदेवतेच्या उपासनेला आरंभ करणे : त्यानंतर आईने कुलदेवतेचे चित्र देवघरात ठेवून त्याची नित्य पूजा चालू केली. नंतर प्रत्येक १ – २ वर्षांनी ती नियमितपणे परुळे येथे कुलदेवतेच्या दर्शनाला जाऊ लागली. आम्हालाही ती तिकडे घेऊन जात असे. त्या काळी तिथे रहाण्याची काहीही सोय नव्हती, तरी ती ग्रामस्थांना विनंती करून त्यांच्या पडवीत रहायची. समवेत नेलेल्या स्टोव्हवर ती स्वयंपाक करायची. अशा रितीने तिथे १ – २ दिवस राहून मग ती परत येत असे.
– आधुनिक वैद्य (डॉ.) दुर्गेश सामंत (श्रीमती मीरा सामंत यांचा मुलगा), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
१ ऐ. कोल्हापूरला असतांना अंबाबाईच्या मंदिरात पहाटे काकड आरतीला उपस्थित रहाणे : ‘विवाहानंतर आई कोल्हापूरला ५ – ६ वर्षे वास्तव्याला होत्या. तेव्हा त्या जवळच असलेल्या अंबाबाईच्या मंदिरात पहाटे ५ च्या सुमारास शुचिर्भूत होऊन काकड आरतीला (टीप १) उपस्थित रहात असत.
टीप १ – काकड आरती : देवाला उठवण्यासाठी पहाटेच्या वेळी मंदिरात केली जाणारी आरती.
१ ओ. सासरच्या मूळ घरातील व्यक्तीमध्ये संचार होणार्या श्री मंगलादेवीच्या दर्शनाला जाणे
१. एक दिवस बेळगावहून परुळे (जिल्हा सिंधुदुर्ग) येथे जात असतांना आईंना त्यांच्या यजमानांनी सांगितले की, वाटेत लागणार्या शिरगाव (तालुका चंदगड, जिल्हा कोल्हापूर) येथे त्यांचे मूळ घर आहे. हे समजल्यावर आई त्या घरी गेल्या. तेथे शेजारणीने त्यांना सांगितले, ‘‘तुमच्या मूळ घरातील व्यक्तीमध्ये संचार होणारी ‘श्री मंगलादेवी’, ही तुमची देवी आहे.’’ हा संचार प्रत्येक मंगळवारी व्हायचा. देवीचा संचार झाल्यावर ती गावातील व्यक्तींच्या समस्यांवर मार्गदर्शन करायची. आई जमेल तसे तिच्या दर्शनाला जात असत आणि कुटुंबियांनाही घेऊन जात असत. देवी आईंना प्रेमाने ‘बाळ’, असे संबोधायची.’
– आधुनिक वैद्या (डॉ.) सौ. नंदिनी दुर्गेश सामंत
१ औ. शिवाची उपासना करणे : आईचा शिवाच्या उपासनेकडे ओढा असायचा. ‘सोमवारचे व्रत करणे, प्रत्येक सोमवारी न चुकता शिवाला बेल वहाणे, ठराविक संख्येने शिवाचा नामजप करणे’, हे ती करत असे.
१ औ १. आलेल्या अनुभूती
१ औ १ अ. सोमवारच्या व्रतासाठी एका माणसाने अनेक वर्षे घरगुती दूध आणि बेल आणून देणे : वर्ष १९७५ मध्ये आम्ही सांगली येथे स्वतः बांधलेल्या घरात रहायला गेलो. तेव्हा त्या वसाहतीमध्ये तीनच घरे होती. आसपास रस्ताही नव्हता आणि पूर्ण शेतजमीन होती. पावसाळ्यात तेथे गुडघाभर चिखलातून ५०० मीटर चालत जावे लागत असे. ‘सोमवारचे व्रत करण्यासाठी आपल्याला घरगुती चांगले दूध मिळायला हवे. डेअरीचे दूध नको’, असे आईचे म्हणणे होते; कारण डेअरीच्या दुधाच्या संदर्भात शुद्धतेची निश्चिती नसते. मग ‘तेथे घरगुती दूध कुठे मिळणार ?’, असा प्रश्न होता; पण एका माणसाने प्रतिदिन त्याच्याकडील म्हशीचे दूध आणून देण्याचे मान्य केले. तो माणूस आमच्या घरापासून ३ कि.मी. दूर रहात होता. आमच्या घराच्या अंगणात अनेक फुलझाडे होती; पण बेल नव्हता. आसपासही कोठेच बेलाचे झाड नव्हते. मग त्या दूधवाल्यानेच स्वतःहून ‘मी प्रत्येक सोमवारी शिवाला वहाण्यासाठी बेल आणून देत जाईन’, असे सांगितले. त्याला बेल मिळवण्यासाठी त्याच्या घरापासून २ कि.मी. दूर जावे लागत होते, तरीही त्याने अनेक वर्षे बेल आणून दिला. त्यासंबंधी त्याने कोणतेही शुल्क किंवा काहीही मोबदला घेतला नाही.
१ औ १ आ. ‘बेल आणून देणार्या माणसाचा मृत्यू आणि त्याला मिळालेली चांगली गती’, यांविषयी स्वप्नदृष्टांत होणे : नंतर आईला सलग २ दिवस रात्री स्वप्न पडले की, तो दूधवाला पुष्पक विमानासारख्या एका विमानात बसून आकाशातून जात आहे. त्यानंतर २ दिवसांनी त्याच्या मुलाने येऊन सांगितले की, तो दूधवाला २ दिवसांपूर्वी वारला. नंतर हा दृष्टांत अनेकांना सांगून ‘काही इच्छा न ठेवता देवाचे करावे’, याविषयी आई तिच्या परिचितांना सांगत असे.
१ औ १ इ. बेल आणून देणार्या माणसाच्या मृत्यूनंतर दारात बेलाची झाडे उगवणे आणि त्यामुळे अनायासे बेल मिळणे : बेल आणून देणारा दूधवाला गेल्यानंतर अकस्मात् आमच्या घराच्या कुंपणाच्या बाहेर बेलाची २ रोपे उगवली. ते आईच्या लक्षात आले. मग तिने त्यांची देखभाल चालू केली. बेलाची रोपे वाढल्यानंतर आईला अनायासे बेल मिळू लागला.
१ औ २. ‘बेल काढतांना झाडाचीही काळजी घ्यायला हवी’, हे स्वतःच्या कृतीतून शिकवणारी आई ! : आईला वाटत असे, ‘बेल काढणार्याने तो योग्य प्रकारे, म्हणजे पायांत चपला न घालता आणि आवश्यक तेवढाच काढावा. त्याची पाने ओरबाडू नयेत आणि बेल काढतांना त्या झाडाचीही काळजी घ्यावी.’ लोक तसे वागत नाहीत; म्हणून ती नापसंती व्यक्त करत से. तेव्हा तिच्या मनाचा संघर्ष होत असे. कुणी अयोग्य प्रकारे बेल काढतांना दिसले, तर ती त्यांना योग्य प्रकारे बेल काढण्याविषयी सांगत असे. यातून मला ‘झाडाकडेसुद्धा एक जिवंत व्यक्ती म्हणून प्रेमाने बघायला हवे’, हे शिकायला मिळाले.’
(क्रमशः)
– आधुनिक वैद्य दुर्गेश सामंत (फेब्रुवारी २०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |
या लेखाचा भाग ३ वाचण्यासाठी क्लिक करा: https://sanatanprabhat.org/marathi/787548.html