बालपणापासूनच एकलव्याप्रमाणे साधनारत असलेल्या आणि कुटुंबियांना साधना करण्यास प्रोत्साहन देणार्‍या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती मीरा सामंत (वय ९० वर्षे) !

श्रीमती मीरा सामंत यांच्यातील जिज्ञासा आणि साधनेची तळमळ या गुणांमुळे त्यांनी साधनेचे कोणतेही मार्गदर्शन नसतांनाही बालपणापासून स्वयंस्फूर्तीने साधना केली. त्यांनी कर्मकांडाविषयी अधिकारी व्यक्तींकडून जाणून घेऊन त्याप्रमाणे कृती केली आणि कुटुंबियांकडूनही तसे प्रयत्न करून घेतले. त्यांनी निष्ठेने आणि चिकाटीने विविध व्रतवैकल्ये केली. त्या वेळी त्यांना अनेक अनुभूतीही आल्या. त्यांना अनेक संतांचा सत्संग लाभला आणि त्यांनी त्या सत्संगाचा साधनेच्या दृष्टीने लाभ करून घेतला.

श्रीमती मीरा सामंत

सनातनच्या संपर्कात आल्यावर त्यांनी सतत नामजप करण्यास आणि इतरांनाही साधना सांगण्यास आरंभ केला. त्यांनी त्यांचा आधुनिक वैद्य असलेला मुलगा आणि सून (आधुनिक वैद्य दुर्गेश सामंत आणि आधुनिक वैद्या सौ. नंदिनी दुर्गेश सामंत) यांना व्यवसाय सोडून पूर्णवेळ साधना करण्यास कोणताही विरोध केला नाही. आता त्या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात वास्तव्यासाठी आल्या आहेत. त्यांनी आश्रमजीवनही आनंदाने स्वीकारले आहे.

या लेखातून उलगडलेल्या त्यांच्या साधनाप्रवासातून त्यांची अनेक गुणवैशिष्ट्ये उलगडली गेली आहेत. त्यांची ‘देवाप्रती भाव, साधनेची तीव्र तळमळ, त्यागी वृत्ती’ इत्यादी गुणवैशिष्ट्ये दर्शवणारे प्रसंग या लेखात दिले आहेत. ‘साधनेची कोणतीही माहिती नसतांना एकलव्याप्रमाणे साधना कशी करावी ?’, याचा आदर्श श्रीमती मीरा सामंत यांनी सर्वांसमोर ठेवला आहे. ‘या लेखातून अनेक साधकांना तळमळीने साधना करण्याची प्रेरणा मिळेल’, यात शंका नाही.

(भाग १)

१. सनातनच्या संपर्कात येण्यापूर्वी केलेली साधना

डॉ. दुर्गेश सामंत

१ अ. लहानपणापासून प्रतिदिन साडी नेसून तुळशीला पाणी घालणे : ‘ती. आईंच्या (माझ्या सासूबाई श्रीमती मीरा सामंत यांच्या) माहेरी तुळस नव्हती, तरी अगदी लहान वयापासून त्या प्रतिदिन शेजारच्या घरातील तुळशीला पाणी घालायच्या. त्या त्यांच्या आईच्या फाटलेल्या नऊवारी साडीचा तुकडा कापून तो साडी म्हणून नेसायच्या आणि नंतरच तुळशीला पाणी घालायच्या. त्या काळात तेथील शाळेत शिकवायला एक पोर्तुगीज शिक्षक होते. ते आईंना ‘संत मीराबाई’, असे संबोधायचे.

१ आ. विवाहानंतर सासरच्या घरी तुळशीला पाणी घालणे आरंभ करणे : आईंचा विवाह झाल्यानंतर त्या बेळगावला आपल्या सासरी राहू लागल्या. तेव्हा त्या घराच्या दारात तुळस होती; परंतु घरातील कुणी तिला पाणी घालत नसे. आईंनी प्रतिदिन अंघोळ करून तुळशीला पाणी घालणे चालू केले.’

– आधुनिक वैद्या (डॉ.) सौ. नंदिनी दुर्गेश सामंत (श्रीमती मीरा सामंत यांच्या धाकट्या स्नुषा), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

१ इ. कर्मकांडाबद्दल जिज्ञासेने जाणून घेऊन त्यानुसार कृती करणे आणि इतरांकडूनही तसे करून घेणे : ‘कोणतेही कर्मकांड कसे करायचे ?’, याबद्दल ती. आईला जिज्ञासा असे. कर्मकांडाविषयी जाणून घेतल्यावर ती त्यानुसार करण्याचा प्रयत्न करत असे अन् आम्हालाही ती कृती करण्यासाठी उद्युक्त करत असे.

१ इ १. कर्मकांडातील कृती योग्य प्रकारे होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे : ‘गणेशचतुर्थीच्या काळात घरातील प्रत्येकाने स्वतः दूर्वा काढून आणाव्यात आणि २१ दुर्वांची जुडी करून ती गणपतीला वहावी’, असा आईचा आग्रह असे. कोणी स्वतः दूर्वा काढून आणत नसेल, तर ती स्वतः तेवढ्या दूर्वा काढून त्यांची जुडी करून ती त्या व्यक्तीला देत असे आणि गणपतीला वहायला सांगत असे. ‘या दूर्वा चांगल्या जागी उगवलेल्या असाव्यात, भले ती जागा दूर असली, तरी चालेल’, असा तिचा आग्रह असे. ती स्वतः तिथपर्यंत जाऊन दूर्वा काढत असे.

आधुनिक वैद्या (सौ.) नंदिनी सामंत

१ ई. घरी देवघरात प्रतिदिन २४ घंटे दिवा प्रज्वलित ठेवणे : आई देवघरात तेलाचा दिवा २४ घंटे लावून ठेवत असे. ‘तो २४ घंटे प्रज्वलित राहील’, याकडे ती स्वतः लक्ष ठेवत असे.

१ ई १. देवघरात दिवा २४ घंटे  प्रज्वलित ठेवण्याविषयी शेजार्‍यांनी विचारल्यावर त्यांना ठामपणे उत्तर देणे : आमच्या घरी एक दांपत्य भाडेकरू म्हणून रहात होते. ते गृहस्थ आईशी बोलतांना काही वेळा गंमतही करत असत. ‘आई नियमितपणे देवघरात तेलाचा दिवा २४ घंटे लावून ठेवत असे’, याबद्दल एकदा ते गृहस्थ तिला म्हणाले, ‘‘२४ घंटे दिवा कशासाठी लावून ठेवता ? एवढ्या महागाईत तेल व्यय होणार ना ?’’ त्यावर झालेल्या चर्चेत अशी अनेक सूत्रे आली; पण आईने आपली बाजू सोडली नाही. ‘आपण योग्य तेच करत आहोत. एवढा व्यय आणि कष्ट देवासाठी करायला हवेत’, असे आपल्याला वाटते’, असे तिने पुनःपुन्हा सांगितले.

१ उ. घरी प्रतिदिन आरती करणे आरंभ करणे : आई सांगली येथे स्वतः बांधलेल्या वास्तूत रहायला आल्यानंतर तेथे तिने देवघर करून घेतले. तिने तेथे प्रतिदिन सायंकाळी ४ आरत्या आणि मंत्रपुष्पांजली म्हणणे चालू केले. घरात कुणीच नसेल, तरच यात खंड पडे, नाहीतर ‘जो घरात आहे, त्याने आरती करायला हवी’, असा प्रघात तिने घालून दिला. तिने प्रत्येक गुरुवारी मोठी आरती, म्हणजे नेहमीपेक्षा आणखी २ – ३ आरत्या आणि काही स्तोत्रे म्हणणे चालू केले. ‘त्या वेळी जे घरात असतील, त्या सर्वांनी यात सहभागी व्हायचेच आणि प्रत्येक आरतीच्या वेळी देवाला काही तरी नैवेद्य दाखवायचाच’, असेही तिने सांगितले. ‘आरती केल्यानंतर मन शांत होते’, असे मला जाणवायचे. ‘ही एक अनुभूती होती’, हे मला सनातनमध्ये आल्यानंतर समजले.

(क्रमशः)

– आधुनिक वैद्य दुर्गेश सामंत (श्रीमती मीरा सामंत यांचा मुलगा), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.