७० वर्षांनंतर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन देहली येथे होण्याची शक्यता !

प्रतिकात्मक चित्र

नागपूर – आगामी ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ७० वर्षांनंतर पुन्हा एकदा राजधानी देहली येथे होण्याची शक्यता आहे. संमेलनासाठी देहली येथून एकाच वेळी २ संस्थांची निमंत्रणे आली आहे. देहलीसमवेतच इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर), औंध (जिल्हा सातारा), औदुंबर (जिल्हा सांगली) मुंबई आणि धुळे येथूनही निमंत्रणे आली आहेत; परंतु २१ एप्रिल या दिवशी मुंबई येथे झालेल्या साहित्य महामंडळाच्या बैठकीत इचलकरंजी, मुंबई आणि देहली या ३ ठिकाणी भेट देण्याचे ठरवण्यात आले आहे. त्यातही देहलीविषयी या वेळी सकारात्मक विचार केला जाण्याची शक्यता आहे. वर्ष १९५४ मध्ये देहली येथे झालेल्या संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मणशास्त्री जोशी होते.

९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी स्थळ निवड समिती नियुक्ती करण्यात आली. महामंडळाकडे निमंत्रणे पाठवण्याची मुदत ३१ मार्चपर्यंत होती. त्यानुसार वरील गावांतून निमंत्रणे आली. स्थळ निवड समितीकडून निमंत्रण स्थळांची प्रत्यक्ष पहाणी होईल. त्यानंतर स्थळ अंतिम केले जाईल. अमळनेर (जिल्हा जळगाव) येथे झालेल्या संमेलनाला साहित्य रसिकांची विशेष गर्दी झाली नव्हती, तसेच लहान गावांत होणारी गैरसोय, ग्रंथविक्रीला मिळणारा अल्प प्रतिसाद अशा काही कारणांमुळे यापुढील संमेलने जिल्हास्तरावरच भरवण्याची चर्चा महामंडळाच्या बैठकीत झाली होती; मात्र ‘केवळ गर्दीचा निकष ठरवून ग्रामीण भागाला संमेलनापासून वंचित ठेवू नये’, अशी भूमिकाही काहींनी घेतली.