धर्मरक्षणाचे कार्य तळमळीने करणारे आणि धर्मप्रेमींना साहाय्य करणारे जळगाव येथील श्री. प्रशांत जुवेकर (वय ३८ वर्षे) !

चैत्र पौर्णिमा (हनुमान जयंती, २३.४.२०२४) या दिवशी जळगाव येथील श्री. प्रशांत जुवेकर यांचा ३८ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या पत्नी सौ. क्षिप्रा प्रशांत जुवेकर (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के) यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

श्री. प्रशांत जुवेकर

श्री. प्रशांत जुवेकर यांना ३८ व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा !

सौ. क्षिप्रा जुवेकर

१. धर्मरक्षणाची तळमळ

१ अ. धर्मरक्षणाविषयी विविध प्रकारच्या सेवा करणे : ‘धर्मरक्षणासंबंधीची सेवा करतांना अनेक कठीण प्रसंग कौशल्याने हाताळावे लागतात. श्री. प्रशांत यांना नेहमी कुठे धर्मावरील आघात करणार्‍या घटना घडल्या, तर त्याची माहिती देण्यासाठी भ्रमणभाष येतात. ‘त्या सर्वांना उत्तरे देणे, त्यांना कायद्याविषयी साहाय्य करण्यासाठी हिंदुत्वनिष्ठ अधिवक्त्यांना जोडून देणे, कायद्याविषयी मार्गदर्शन करणे, निवेदन सिद्ध करण्यासाठी साहाय्य करणे’, अशा अनेक सेवा श्री. प्रशांत करतात.

१ आ. हिंदु राष्ट्र-जागृती सभा होण्यासाठी तळमळीने प्रयत्न करणे : फेब्रुवारी २०२४ मध्ये जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात हिंदुत्वनिष्ठ व्यक्तींनी मोठ्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे आयोजन केले होते. तेव्हा त्यांनी आयोजनात हिंदु जनजागृती समितीचे साहाय्य मागितले होते. या सभेसाठी वक्ता म्हणून भाग्यनगरचे भाजपचे आमदार टी. राजा सिंह येणार होते. सभेच्या २५ दिवस आधी अनुमती पत्र पाठवूनही पोलिसांकडून काही उत्तर आले नव्हते. सभेच्या एक दिवस आधी पोलिसांनी अनुमती नाकारली. त्या वेळी ‘आता कसे करायचे ?’, असा प्रश्न आयोजकांना पडला. सभेचा प्रसार झाला होता. पटांगणात सिद्धता चालू झाली होती. त्यामुळे सभा रहित करणे शक्य नव्हते आणि सभा घेणेही शक्य नव्हते. त्यामुळे अनेकांना निराशा आली; परंतु श्री. प्रशांत यांनी हार मानली नाही. त्यांनी पोलिसांच्या उत्तराला न्यायालयात आव्हान दिले आणि संभाजीनगर न्यायालयात पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णीकाका यांचे साहाय्य घेतले. त्यानंतर न्यायालयाने सभा घेण्याची अनुमती दिली. असे प्रथमच घडले होते. त्यामुळे आयोजकांना अतिशय आनंद झाला आणि हिंदु राष्ट्र-जागृती सभा यशस्वी झाली.

१ इ. पाय मुरगळल्यावरही सभेसंबंधीची सेवा पूर्ण करणे : सभेच्या एक दिवस आधी धावपळ करतांना श्री. प्रशांत यांचा पाय खड्ड्यात गेल्याने मुरगळला. त्या वेळी झालेला आवाज ऐकून ‘त्यांना अस्थिभंग झाला कि काय ?’, असे आम्हाला वाटले. त्यांच्या पायाला सूज आली होती, तरीही त्यांनी त्याच स्थितीत सभेसंबंधीची सेवा पूर्ण केली. नंतर आधुनिक वैद्यांकडे गेल्यावर ‘त्यांचे अस्थिबंधन (लिगामेंट) दुखावले आहे’, असे लक्षात आले. या प्रसंगात त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली असती; परंतु गुरुदेवांच्या कृपेने तसे झाले नाही.

२. धर्मप्रेमींना सर्वतोपरी साहाय्य करणे

अ. धर्मप्रेमींचे नातेवाईक रुग्णाईत असतील किंवा त्यांच्या परिवारात काही अडचण असेल, तर श्री. प्रशांत त्यांना भ्रमणभाष करतात, तसेच त्यांना भेटायला जातात. ते उत्तरदायी साधकांना धर्मप्रेमींच्या अडचणींवरील नामजपादी उपाय विचारतात आणि धर्मप्रेमींना सांगतात. त्यानंतर ते ‘उपाय पूर्ण केले का ? काही अडचण नाही ना ?’, याचा आढावाही घेतात. त्यामुळे सर्वांना श्री. प्रशांत यांचा आधार वाटतो.

आ. श्री. प्रशांत यांच्याकडे धर्मप्रेमींच्या व्यष्टी साधनेचा आढावा घेण्याची सेवा आहे. ते धर्मप्रेमींना त्यांच्या चुका अतिशय प्रेमाने समजावून सांगतात. त्यामुळे चुकांचे गांभीर्य त्यांच्या लक्षात येते.

३. श्री. प्रशांत यांच्यात जाणवलेले पालट

३ अ. लहान मुलांना समजून घेऊन त्यांना आपलेसे करणे : आधी श्री. प्रशांत यांना लहान मुलांच्या समवेत खेळणे आवडत नसे; परंतु या वेळी आम्ही अयोध्येला (माझ्या माहेरी) गेल्यावर ते माझ्या ताईच्या मुलांशी पुष्कळ खेळले. त्यांनी मुलांना खेळता खेळता नामजप करण्यास शिकवला. त्यांनी मुलांना सुसंस्कारांविषयी सांगितले. ते मुलांना समजून घेतात आणि त्यांच्या भाषेत बोलून त्यांच्याशी खेळतात. त्यामुळे ते मुलांना फार आवडतात.

३ आ. पत्नीला साहाय्य करणे : श्री. प्रशांत मला लहान लहान कामांत साहाय्य करतात. मला आध्यात्मिक त्रास होत असेल, तर ते मला नामजपादी उपाय करण्यास सांगतात आणि त्रासावर मात करण्यासाठी योग्य दृष्टीकोनही देतात. ते माझे आध्यात्मिक मित्र आहेत.

३ इ. मनमोकळेपणाने बोलणे : आता ते सद्गुरु जाधवकाकांशी (सद्गुरु नंदकुमार जाधवकाका यांच्याशी) साधनेविषयी अतिशय मनमोकळेपणाने बोलतात. मनात आलेला प्रत्येक अयोग्य विचार ते सद्गुरु जाधवकाकांना सांगण्याचा प्रयत्न करतात. गुरुकृपेनेच त्यांच्यात हा पालट झाला आहे.

‘श्री गुरूंनी मला साधनेत प्रगती करण्यासाठी साहाय्य करणारे यजमान दिले आहेत’, याबद्दल मी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’

– सौ. क्षिप्रा प्रशांत जुवेकर (श्री. प्रशांत यांच्या पत्नी, आध्यात्मिक पातळी ६४ टक्के), जळगाव (१७.४.२०२४)