विविध युगांतील धर्मयुद्धामध्ये नामानिराळे राहून धर्माचे रक्षण करणारा हनुमान !

श्री हनुमान

१. त्रेतायुगातील राम-रावण यांच्या धर्मयुद्धात वानरसैन्याचे रक्षण करणे !

त्रेतायुगात लंकेत झालेल्या धर्मयुद्धात रावण सैन्यातील शक्तीसंपन्न, मायावी शक्तीसंपन्न असणारे अतिकाय, नरांतक, देवांतक, प्रहस्त, इंद्रजीत यांसारख्या महाबलशाली राक्षसविरांनी वानरसेना, तसेच सुग्रीव, अंगद, बिभीषण, लक्ष्मण इत्यादी धर्मयोद्ध्यांवर अनेक विध्वंसक अन् प्राणघातक शस्त्रास्त्रांचा मारा केला; परंतु हनुमंताने ही सर्व शस्त्रास्त्रे वानरसेनेपर्यंत पोचण्यापूर्वी स्वत:च्या अंगावर झेलून त्यांना निष्प्रभ केले.

२. द्वापरयुगातील कौरव-पांडव यांच्या महाभारत युद्धात पांडवांचे रक्षण करणे !

महाभारताच्या धर्मयुद्धाचा आरंभ होण्यापूर्वी भगवान श्रीकृष्णाने हनुमंताला अर्जुनाच्या रथावर सूक्ष्म रूपाने उपस्थित रहाण्यास सांगितले. त्याप्रमाणे अर्जुनाच्या कपिध्वजात हनुमान सूक्ष्म रूपाने स्थानापन्न झाला. महाभारताच्या धर्मयुद्धात भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कर्ण आणि अश्वत्थामा यांसारख्या महारथींनी अर्जुनावर प्राणघातक, तसेच सृष्टीविध्वंसक दिव्यास्त्रे सोडली होती; परंतु भगवान श्रीकृष्णाच्या कृपेने अर्जुनाला काहीच लागले नाही. रथावर सूक्ष्म रूपाने बसलेल्या हनुमंताने सर्व दिव्यास्त्रे काही काळासाठी थोपवून धरली. १८ दिवसांचे युद्ध संपल्यावर जेव्हा श्रीकृष्ण आणि अर्जुन रथातून खाली उतरले अन् श्रीकृष्णाच्या आज्ञेवरून जेव्हा मारुतीराया रथ सोडून अर्जुनासमोर प्रकट झाला, तेव्हा हनुमानाने थोपवलेल्या दिव्यास्त्रांना मुक्त केले. त्यामुळे अर्जुनाच्या रथात मोठा विस्फोट झाला आणि त्याच्या ठिकर्‍या ठिकर्‍या उडाल्या.

३. कलियुगातील संतांचे आराध्य दैवत !

अ. समर्थ रामदासस्वामी : छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याला आध्यात्मिक स्तरावर बळकटी मिळण्यासाठी रामदासस्वामींनी ११ मारुतींची स्थापना केली होती.

समर्थ रामदासस्वामी

आ. संत तुलसीदास : संत तुलसीदासांनीही हनुमंताची उपासना केली होती. हनुमंताच्या कृपेमुळेच संत तुलसीदासांना ३ वेळा प्रभु श्रीराम, लक्ष्मण आणि सीतामाता यांचे प्रत्यक्ष दर्शन झाले. काशीतील काही पंडित संत तुलसीदासांचे विरोधक होते. त्यांनी तुलसीदासांना नष्ट करण्यासाठी एका तांत्रिकाच्या साहाय्याने कृत्येला (अघोरी शक्तीला) पाठवले होते. हनुमंताच्या कृपेमुळे संत तुलसीदासांचे रक्षण झाले.

संत तुलसीदास

इ. राष्ट्रसंत विद्यारण्यस्वामी : सम्राट हक्कराय आणि बुक्कराय यांना घडवणारे राष्ट्रसंत विद्यारण्यस्वामी यांनीही हनुमंताचे गुणगान करून त्याच्या पंचमुखी रूपाची महती सांगितली आहे.

हनुमानाची अन्य गुणवैशिष्ट्ये

१. संगीताचा जाणकार : हनुमानाला नारदमुनींकडून संगीताचे ज्ञान प्राप्त झाले होते. त्याला वीणावादनही करता येत असे. तो टाळ आणि चिपळ्या वाजवून श्रीरामाचे भावपूर्ण भजन करतो.

२. संस्कृत भाषा आणि व्याकरण यांवर प्रभुत्व असणे : हनुमंत अतिशय प्रतिभाशाली असून त्याला संस्कृत भाषेतील व्याकरणाचे सखोल ज्ञान आहे. ऋष्यमुख पर्वताच्या पायथ्याशी पंपासरोवराजवळ जेव्हा श्रीराम आणि लक्ष्मण यांच्याशी हनुमंताची पहिली भेट झाली, तेव्हा त्याने राजपुरोहिताचे रूप धारण केले होते. त्याने श्रीराम आणि लक्ष्मण यांच्याशी संस्कृत भाषेत उत्स्फूर्तपणे वार्तालाप केला. यावरून त्याचे संस्कृत भाषेवरील प्रभुत्व दिसून येते.

३. अष्टमहासिद्धींचा स्वामी : हनुमान हा गरिमा, लघिमा, महिमा आदी अष्टमहासिद्धींचा स्वामी आहे.

– सुश्री (कु.) मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.