Goa Lineman Death : डिचोली (गोवा) येथे वीज कर्मचार्‍याचा विजेचा धक्का बसून मृत्यू

विजेच्या खांबावर चढून काम करत असतांना विजेच्या धक्क्याने मनोज जांबावलीकर यांचा मृत्यू
(चित्र सौजन्य : heraldgoa)

डिचोली (गोवा) : वीज खात्याचा कर्मचारी येथील गृहनिर्माण वसाहतीत विजेच्या खांबावर चढून काम करत असतांना विजेचा धक्का बसल्याने त्याचा मृत्यू झाला. मनोज जांबावलीकर असे त्याचे नाव असून तो पिळगाव येथील रहिवासी आहे. १९ एप्रिल या दिवशी जांबावलीकर विजेच्या खांबावर चढून वीजवाहिन्यांच्या दुरुस्तीचे काम करत असतांना वीजपुरवठा अचानक चालू झाला. या घटनेमुळे वीज कर्मचार्‍यांना धोकादायक स्थितीत काम करावे लागत असल्याचे सूत्र पुन्हा ऐरणीवर आले आहे.

ग्रामस्थ संतप्त !

ही घटना कळताच ग्रामस्थांनी वीज खात्याच्या कारभाराविषयी संताप व्यक्त करत जोपर्यंत वीज खात्यातील अधिकार्‍यांना बोलावत नाही, तोपर्यंत मृतदेह जागेवरून हलवण्यास विरोध दर्शवला. त्यानंतर पोलिसांना बोलावण्यात आले. पोलिसांनी ग्रामस्थांच्या मागणीनुसार वीज अधिकार्‍यांना बोलावून घेतले. या वेळी ग्रामस्थांनी अधिकार्‍यांवर प्रश्नांचा भडीमार केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात नेण्यात आला.

(सौजन्य : Prime Media Goa)

खलप यांचा वीजमंत्री ढवळीकर यांच्यावर आरोप

वर्ष २०१९ ते २०२४ या काळात जवळपास ७१ व्यक्ती आणि ३० प्राणी विजेच्या धक्क्याने मरण पावले. तब्बल १२ सहस्र कोटी रुपये खर्चून वीज यंत्रणा अद्यायावत केल्यानंतरही ही जीवित हानी रोखण्यात अपयश आले आहे. वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी याचे नैतिक दायित्व स्वीकारून त्यागपत्र द्यावे, अशी मागणी काँग्रेसचे उत्तर गोव्याचे लोकसभा उमेदवार अधिवक्ता रमाकांत खलप यांनी केली आहे. (खलप यांना लोकसभेची उमेदवारी मिळाल्यानंतरच वर्ष २०१९ पासून झालेल्या जीवित हानीची जाणीव कशी काय झाली ? त्याआधी त्यांनी कधी या संदर्भात आवाज उठवला होता का ? हे राजकारण आहे, असे कुणाला वाटल्यास चुकीचे ठरणार नाही ! – संपादक)

कारखान्याच्या इनव्हर्टरच्या वीजप्रवाहामुळे मृत्यू !

(इनव्हर्टर म्हणजे वीजप्रवाह खंडित झाल्यावर आपोआप साठवलेला वीजप्रवाह चालू करणारे यंत्र)

एका फिटनेस कारखान्याचा इनव्हर्टर चालू झाल्यामुळे त्याचा वीजप्रवाह वीज कर्मचारी काम करत असलेल्या ठिकाणापर्यंत आला. त्यामुळेच वीज कर्मचार्‍याचा मृत्यू झाला, असे स्पष्टीकरण चौकशीअंती वीज खात्याचे मुख्य अभियंता स्टीफन फर्नांडिस यांनी दिले आहे.

वीज कर्मचार्‍याच्या मृत्यूच्या घटनेची चौकशी करणार ! – वीजमंत्री ढवळीकर

वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी वीज कर्मचारी जांबावलीकर यांच्या मृत्यूविषयी शोक व्यक्त करून कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याचे म्हटले आहे, तसेच मृत्यूच्या घटनेची खात्यांतर्गत चौकशी करणार असल्याचे सांगितले.

रमाकांत खलप यांच्या टिकेवर ते म्हणाले,

‘‘खलप यांचे आरोप पूर्णतः निराधार आणि दिशाभूल करणारे आहेत. उच्चशिक्षित आणि अधिवक्ता असलेले खलप यांनी अर्थसंकल्पातील भांडवली खर्च आणि महसुली खर्च यांविषयी आधी जाणून घ्यावे. राजकीय लाभ मिळवण्यासाठी ते या संवेदनशील विषयाचे राजकारण करत आहेत, हे दुर्दैवी !