‘गॅरेंटी’ (हमी) देण्यासाठी पुष्कळ धैर्य लागते ! – पंतप्रधान मोदी

वर्धा येथील उमेदवार रामदास तडस आणि अमरावती येथील नवनीत राणा यांच्या प्रसारसभेला पंतप्रधानांची उपस्थिती

पंतप्रधान मोदी

वर्धा – वर्ष २०१४ पूर्वी अशी धारणा झाली होती की, काही चांगले होऊ शकत नाही. गावात वीज, पाणी, रस्ते येऊ शकत नाहीत. येणार्‍या पिढ्यांना ‘गरिबी मुक्ती’ मिळू शकत नाही. शेतकर्‍यांना वाटत होते, त्यांची स्थिती पालटू शकत नाही, महिलांना वाटत होते, त्यांच्या अडचणी कुणी समजू शकत नाही. आम्ही घराघरात वीज दिली, पाण्याची जोडणी दिली, ४ कोटी गरिबांना घरे दिली. ५० कोटींहून अधिक जण अधिकोषाला जोडले गेले. २५ कोटींहून अधिक लोकांना गरिबीतून बाहेर काढले. अजूनही कुणा परिवाराला वीज, पाणी, घर मिळाले नसेल, तर घरोघरी जाऊन त्यांना मोदी तिसर्‍यांदा निवडून आल्यावर मिळेल, हे सांगा, अशी विनंती पंतप्रधान मोदी यांनी सहस्रो मतदारांना वर्धा येथील सभेत केली. या वेळी ते म्हणाले, ‘‘तुम्हीच मोदी आहात. तुम्ही माझे प्रतिनिधी आहात. ज्यांना सुविधा मिळाल्या नाहीत, त्यांचा तपशील मला पाठवा त्यांना सांगा मी मोदींकडून ‘गॅरेंटी’ घेऊन आलो आहे. ‘गॅरेंटी’ देण्यासाठी पुष्कळ धैर्य लागते. पूर्ण दिशा स्पष्ट असावी लागते. माझ्यासाठी हा ३ अक्षरांचा खेळ नाही. क्षण क्षण तुमच्यासाठी, देशासाठी देण्याचा माझा मानस आहे.’’

या वेळी मोदी म्हणाले की,

१. २४ गुणिले ७  काम आणि २०४७ वर्ष हे ध्येय आहे. भाजपने घोषणापत्रात ३ कोटी घरे, प्रत्येक घरी नळातून पाणी, प्रत्येक परिवारातील ७० च्या पेक्षा अधिक वयाच्या व्यक्तींचे वैद्यकीय खर्चाचे ५ लाख रुपयांपर्यंत दायित्व मोदी घेणार. आता घरोघरी वाहिनीने गॅस येईल.

२. स्वयं साहाय्यता क्षेत्रातील महिलांच्या समुहांना नवनवीन क्षेत्रांत नेणार. ३ कोटी महिला लक्षपती दिदी बनवू.

३. एन्.डी.ए.चे किसानविरोधी, गरीबविरोधी विचार होते, म्हणून शेतकर्‍यांची स्थिती बिकट होती. त्या वेळी ‘बारशाला गेला आणि बाराव्याला आला’ याप्रमाणे होत होते. विदर्भाला काँग्रेसच्या या धोरणामुळे पुष्कळ हानी झाली.

४. येथे रेल्वेसेवा, रस्ते आदी शेतकर्‍यांच्या समृद्धीचे महामार्ग बनतील. सिंचनाची समस्या सोडवली जाईल. अडकलेल्या सिंचन समस्या सरकार सोडवत आहे. विदर्भाच्या विकासाकडे केंद्राचे बारीक लक्ष आहे.

५. संत्र आणि हळदी यांना वेगळी ओळख देण्यासाठी केंद्राने प्रयत्न केले.  किसान सन्मान योजनेत साहाय्य थेट अधिकोषात जाईल आणि राज्य सरकारचे साहाय्यही शेतकर्‍यांना वेगळे मिळेल.

६. छत्रपतींच्या या धरतीवर तुम्हाला काँग्रेसच्या पापांचा हिशोब करायचा आहे. काँग्रेसला मत देणे म्हणजे मत वाया घालवणे असल्याने विकासासाठी मत द्या.

. माझा नमस्कार घराघरात सांगा. मला आशीर्वाद मिळाले, तर ती ऊर्जा मला तुमच्या विकासासाठी वापरता येईल.