महाराष्ट्रात मतांसाठी मद्याचे प्रलोभन, आचारसंहितेच्या काळात ४ सहस्र २५५ गुन्हे नोंद !

प्रतिकात्मक चित्र

मुंबई – लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून महाराष्ट्रात अवैध मद्याची विक्री केल्याप्रकरणी तब्बल ४ सहस्र २५५ गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. या प्रकरणी ३ सहस्र ७५४ जणांना अटक करण्यात आली आहे. या कारवायांमध्ये २७ कोटी ९० लाख रुपयांचे मद्य पकडण्यात आले आहे. राज्य उत्पादन विभागाकडून या कारवाईची माहिती देण्यात आली आहे.

२ दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाने महाराष्ट्रात १ मार्च ते ११ एप्रिल या कालावधीत केंद्र आणि राज्य शासन यांच्या यंत्रणांनी टाकलेल्या धाडींमध्ये एकूण ४२१ कोटी ४१ लाख रुपयांची मालमत्ता पकडल्याचे घोषित केले. यामध्ये मद्य, अमली पदार्थ, सोने-चांदी आदी मौल्यवान दागिने, रोख रक्कम, मालमत्ता यांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त केंद्रीय निवडणूक आयोगाने आचारसंहिता लागू झाल्यापासून देशात सलग ४३ दिवस अवैधपणे बाळगण्यात आलेले नियमित सरासरी १०० कोटी रुपये पकडण्यात आल्याची माहिती दिली. एकूणच लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मतदारांना प्रलोभन दाखवण्यासाठी होत असलेला मद्य, अमली पदार्थ, रोख रक्कम यांचा उपयोग चिंताजनक आहे.

संपादकीय भूमिका :

  • निवडणुकीत पैसे, मद्य यांचे आमीष दाखवून मते मिळवणे हे व्यवस्थेसाठी घातक आणि मारक !
  • मतदारांना मद्य आणि अमली पदार्थ यांचे आमीष दाखवणे अन् त्यातून उमेदवार निवडून येणे ही व्यवस्थेची थट्टा !