समंजस आणि सेवेची आवड असलेली ६१ टक्के आध्यात्मिक पातळीची फोंडा, गोवा येथील कु. सान्वी लोटलीकर (वय ९ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! कु. सान्वी लोटलीकर ही या पिढीतील एक आहे !

कु. सान्वी अमेय लोटलीकर

(‘वर्ष २०२० मध्ये कु. सान्वी अमेय लोटलीकर हिची आध्यात्मिक पातळी ६३ टक्के होती आणि आता वर्ष २०२४ मध्ये तिची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के आहे.’ – संकलक)

१. सौ. आर्या लोटलीकर (कु. सान्वीची आई), फोंडा, गोवा.

सौ. आर्या लोटलीकर

१ अ. समंजस : ‘आम्ही रहात असलेल्या इमारतीत बरीच मुले आहेत. पूर्वी सर्व मुले एकत्र खेळत असत; परंतु काही कारणास्तव आता ती मुले सान्वीला खेळायला घेत नाहीत. प्रारंभी तिला या गोष्टीचा पुष्कळ त्रास झाला; मात्र गुरुकृपेने तिने नंतर या गोष्टीवर मात केली. तिला याविषयी विचारल्यावर ती म्हणाली, ‘‘असू दे. देवाची इच्छा ! मी त्या मुलांच्या समवेत न खेळण्यात माझे हित असेल; म्हणून देवाने असे घडवून आणले.’’

‘गुरुदेवा (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले), तुम्हीच आम्हाला या बालकावर संस्कार करण्याची बुद्धी द्या आणि मार्गदर्शन करा’, अशी मी आपल्या चरणी प्रार्थना करते. आम्हाला अशा दैवी बालकांचे संगोपन करण्याची सेवा मिळाली, त्याबद्दल मी आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’

२. सौ. संगीता लोटलीकर (कु. सान्वीची आजी, वर्ष २०२३ मधील आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ६३ वर्षे), फोंडा, गोवा.

सौ. संगीता लोटलीकर

२ अ. सेवेची आवड

१. ‘सान्वीला आश्रमात जायला आवडते; पण ती लहान असल्यामुळे आम्ही तिला आश्रमात घेऊन जात नव्हतो. वर्ष २०२३ मधील दिवाळीच्या सुटीत तिने स्वतःहून आश्रमात जायला आरंभ केला. त्या वेळी ती लवकर उठून सकाळी तिच्या आजोबांच्या समवेत आश्रमात जात असे. ती तिला जमेल तशी साधिकेच्या समवेत सेवा करत असे.

२. ती सकाळी १० वाजता आश्रमात दत्तमाला मंत्रपठण करत असे.

२ आ. इतरांना समजून घेणे : मला दत्तमाला मंत्रपठण करता येत नव्हते. मी तिला म्हणाले, ‘‘मला संस्कृत उच्चार शिकव. ते मला जमत नाहीत.’’ मी तिला असे सांगितल्यावर तिने मला ३ दिवस शिकवले. यातून तिच्यातील ‘तत्परता आणि इतरांना समजून घेण्याची वृत्ती’, हे गुण माझ्या लक्षात आले.

२ इ. आश्रमातील महाप्रसाद आनंदाने ग्रहण करणे : तिला मंदिरे आणि आश्रम येथे असलेला महाप्रसाद पुष्कळ आवडतो. तिची घरी केलेल्या जेवणात आवड-नावड असते; मात्र आश्रमात जो महाप्रसाद असेल, तो ती ग्रहण करते.’

(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक : ५.१.२०२४)