Everest Masala : ‘एव्हरेस्ट फिश करी मसाल्या’मध्ये उच्च पातळीचे कीटकनाशक ?

सिंगापूरने बाजारातून उत्पादन परत मागवले !

नवी देहली – सिंगापूरने भारतातून आयात केलेले ‘एव्हरेस्ट फिश करी मसाला’ हे उत्पादन बाजारातून परत मागवण्यात येत असल्याचे घोषित केले आहे. या मसाल्यामध्ये उच्च पातळीचे कीटकनाशक इथिलीन ऑक्साईड असल्याचा आरोप करून ते मागे घेण्यात येत आहे. ‘एव्हरेस्ट’ आस्थापनाने अद्याप यावर प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही.

‘सिंगापूर फूड एजन्सी’ने एका निवेदनात म्हटले आहे की, हाँगकाँग स्थित ‘सेंटर फॉर फूड सेफ्टी’ने भारतातून आयात केलेल्या एव्हरेस्ट फिश करी मसाल्यामध्ये इथिलीन ऑक्साईड असल्यामुळे हे उत्पादन बाजारातून परत मागवण्याबाबत अधिसूचना प्रसारित केली आहे.

मसाले अधिक काळ टिकवून ठेवण्यासाठी सिंगापूरच्या नियमांनुसार ऑक्साईडचा वापर करण्यास अनुमती आहे; परंतु एव्हरेस्ट फिश करी मसाल्यामध्ये त्याचे असलेले अधिक प्रमाण ग्राहकांसाठी संभाव्य आरोग्य धोक्यात आणते. ज्या लोकांनी या उत्पादनांचे सेवन केले आहे, त्यांनी त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा. अधिक माहितीसाठी ग्राहकांनी जिथून ते खरेदी केले आहे त्या ठिकाणाशी संपर्क साधावा.