चैत्र शुक्ल एकादशी (१९.४.२०२४) या दिवशी श्री. राम होनप यांचा ४१ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त मला त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
श्री. राम होनप यांना ४१ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा ! |
१. अभ्यासू वृत्ती
‘श्री. राम होनप यांचे व्यक्तीमत्त्व अत्यंत सरळ आहे. त्यांची वृत्ती अभ्यासू आहे. त्यामुळे अनेक साधक त्यांच्याकडे आकर्षित होतात आणि विविध विषयांवर त्यांचे मतही विचारतात. रामदादा अभ्यास करून त्यांना सूत्रे सांगत असल्यामुळे अनेक साधकांना त्यांचा आधार वाटतो.
२. तत्त्वनिष्ठता
वर्ष २०२३ च्या ‘वैश्विक हिंदु राष्ट्र अधिवेशन’ काळात आम्ही एकत्रित सेवा करत होतो. एकदा एका साधकाकडून चूक झाल्यामुळे आम्हाला सेवेत अडचणी येत होत्या. तेव्हा भावनाप्रधानतेमुळे ‘त्या साधकाला त्या चुकीविषयी नंतर सांगूया’, असा माझा विचार झाला; पण रामदादांनी त्वरित पुढाकार घेऊन त्या साधकाची चूक एका संतांना सांगून ती अडचण सोडवली. हे करतांना ‘त्या साधकाला जेवढ्या लवकर त्याची चूक कळेल, तेवढ्या लवकर त्याची साधनेत प्रगती होईल’, असा रामदादांचा दृष्टीकोन होता. यातून ‘ते तत्त्वनिष्ठपणे वागतात’, असे माझ्या लक्षात आले आणि ‘तत्त्वनिष्ठपणे कसे वागायचे ?’, हे मला शिकता आले.
३. सेवेसाठी सदैव तत्पर असणे
रामदादांना कधीही कुठल्याही सेवेसाठी विचारले, तरी ते कधीच ‘नाही’ म्हणत नाही. ते सर्व प्रकारच्या सेवेसाठी सदैव सिद्ध असतात. त्यामुळे मला त्यांचा आधार वाटतो.
४. जाणवलेला पालट
४ अ. अंतर्मुखतेत वाढ होणे : पूर्वीच्या तुलनेत रामदादा अधिक अंतर्मुख झाले आहेत. पूर्वी सेवांच्या मधील वेळेत ते इतर विषयांकडे लक्ष द्यायचे. आता तसे न करता ‘ते नामजप किंवा स्वयंसूचना सत्र करणे’, याला प्राधान्य देतात.’
– श्री. निषाद देशमुख (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३०.१.२०२४)