तुर्भेगाव (वाशी) येथे श्रीरामनवमी उत्सव उत्साहात साजरा !

वाशी – तुर्भेगाव आणि वाशी येथे श्रीरामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. झाला. तुर्भेगाव येथे विश्वनाथ कृष्णाजी सामंत ट्रस्टच्या वतीने संत श्री रामतनुमाता मंदिर येथे श्रीरामनवमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या उत्सवाचे हे ८४ वे वर्ष होते. या उत्सवानिमित्त १० ते १६ एप्रिल या कालावधीत रामनाम सप्ताह साजरा करण्यात आला. यामध्ये प्रतिदिन सकाळी ६ ते ७ जप, सकाळी ७ ते ८ आणि सकाळी ९ ते २ अखंड रामनाम, श्रीरामतनु चरितायन, दुपारी २ ते ३ रामरक्षा सहस्रावर्तने, दुपारी ३ ते ५ अखंड रामनाम (शांता महिला मंडळ), सायंकाळी ५ ते ६ हरिपाठ गजर, सायं. ९ ते १०.३० भजन (शांता महिला मंडळ), १७ एप्रिल या दिवशी श्रीरामजन्मोत्सवाच्या दिवशी सकाळी ६.३० ते ७.३० श्रीरामतनु चरितायन (शांता महिला मंडळ), सकाळी ८ ते ९ कलावती माता भजन मंडळ, तुर्भे सकाळी ९ ते १०.३० श्री पांडुरंग प्रासादिक भजन मंडळाचे भजन, १०.३० ते १२.३० या वेळेत श्रीरामजन्म कीर्तन समर्थ भक्त अमेयबुवा रामदासी (डोंबिवली) यांनी सादर केले. दुपारी १ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. सायं. ७ ते रात्री १० तुर्भे गाव पंचक्रोशीत पालखी सोहळा पार पडला.

श्री साई सेवा समिती संस्थेच्या वतीने श्री रामनवमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. वाशी सेक्टर १ येथील श्री साईबाबा मंदिरात विविध धार्मिक अनुष्ठाने पार पडली. या उत्सवाचे दरवर्षीचे आकर्षण म्हणजे साईबाबांच्या चरणपादुका, चित्र आणि पोथीची भव्य मिरवणूक होय. ही मिरवणूक १८ एप्रिलला सायंकाळी ७ वाजता निघणार आहे. उत्सवाची सांगता १९ एप्रिलला महाप्रसादाने होईल. सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. वाशी सेक्टर ७ येथील जागृतेश्वर शिव मंदिरामध्ये सकाळी काकडा झाला. त्यानंतर ह.भ.प. द्वारकानाथ महाराज देशमुख यांचे कीर्तन आणि सायंकाळी पालखी मिरवणूक झाली. श्री हनुमान प्रासादिक आरती मंडळ आणि जागृतेश्वर शिव मंदिर विश्वस्त संस्था, वाशी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने संगीतमय श्रीराम कथेचे आयोजन करण्यात आले आहे.