लवकरात लवकर संयुक्त मार्ग काढावा ! – विश्वजित कदम, आमदार, काँग्रेस

विश्वजित कदम, आमदार, काँग्रेस

सांगली, १६ एप्रिल (वार्ता.) – ‘सांगलीविषयी लवकरात लवकर संयुक्त मार्ग काढावा’, असे विधान काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांनी १६ एप्रिल या दिवशी येथे पत्रकारांशी बोलतांना केले. काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांनी बंडखोरी करून उमेदवारी आवेदन भरल्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

आमदार विश्वजित कदम पुढे म्हणाले की, सांगली लोकसभा मतदारसंघ महाराष्ट्रात चर्चेत राहिला आहे. या संदर्भात चर्चा करण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस विधीमंडळाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी मला तातडीने बोलावले होते. त्या वेळी सांगलीचे जिल्हाध्यक्ष विक्रम सावंत आणि इतर सर्वांची पटोले अन् थोरात यांच्याशी सविस्तर चर्चा झाली. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला, पक्षाचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांच्याशीही माझे बोलणे झाले. या चर्चेत मी सांगली येथील परिस्थिती त्यांच्यासमोर मांडली. या संदर्भात लवकरात लवकर संयुक्त मार्ग काढावा, ज्यामुळे राज्यातील आणि सांगली येथील महाविकास आघाडीसंदर्भात एक ठोस पाऊल उचलता येईल. विशाल पाटील यांनी काँग्रेस पक्षाचा एबी अर्ज भरलेला नाही; मात्र कुठल्याही पक्षाचा एबी अर्ज हा शेवटच्या क्षणापर्यंत जोडता येऊ शकतो. त्यासाठी १९ एप्रिल या दिवशी दुपारी ३ वाजेपर्यंत मुदत आहे.’’