Sarabjit Killer Dead : सरबजीत सिंह यांची हत्या करणार्‍याची पाकमध्ये अज्ञातांकडून हत्या !

सरबजीत सिंह (उजवीकडे )या भारतीय नागरिकाची हत्या करणारा सरफराज (डावीकडे)

लाहोर (पाकिस्तान) – पाकच्या कारागृहात कथित हेरगिरीच्या प्रकरणी अटकेत असलेल्या सरबजीत सिंह या भारतीय नागरिकाची कारागृहात हत्या करणारा सरफराज या गुंडाची पाकमध्ये अज्ञाताकडून हत्या करण्यात आली आहे. अमीर सरफराज याने आय.एस्.आय.च्या आदेशावरून येथील कोट लखपत कारागृहात सरबजीत यांची हत्या केली होती. सरफराजही येथे अटकेत होता. पाक आणि अन्य देश येथे आतापर्यंत भारतविरोधी आतंकवादी आणि गुंड यांच्या २१ हत्या झालेल्या आहेत. या हत्या अज्ञातांकडून करण्यात आल्या आहेत.

सरबजीत सिंह यांचा कारागृहात करण्यात आला होता छळ !

वर्ष १९९० मध्ये पाकने सरबजीत यांना अटक केली होती. तेव्हापासून ते या कारागृहात होते. सरबजीत यांच्या सुटकेसाठी भारतात अनेक आंदोलने करण्यात आली होती. भारत सरकारने पाककडे सरबजीत यांच्या सुटकेसाठी प्रयत्न केले होते; मात्र पाकने सुटका करण्यास नकार दिला होता. शेवटी वर्ष २०१३ मध्ये सरबजीत यांची हत्या करण्यात आली.

हा न्याय नाही ! – सरबजीत यांची मुलगी स्वप्नदीप

सरफराजच्या हत्येवर सरबजीत यांची मुलगी स्वप्नदीप यांनी सांगितले की, आधी मला समाधान वाटले; पण नंतर मला वाटले की, हा न्याय नाही. वडिलांच्या निर्घृण हत्येत ३-४ लोक सहभागी होते. त्यामुळे अमीरची हत्या करून हा कट लपवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

कर्मानुसार फळ मिळते ! – अभिनेते रणदीप हुडा

सरबजीत सिंह यांच्या जीवनावर हिंदी भाषेत चित्रपट बनवण्यात आला होता आणि त्यात सरबजीत यांची भूमिका अभिनेते रणदीप हुडा यांनी केली होती. त्यांनी सरफराज यांच्या हत्येवर प्रतिक्रिया व्यक्त करतांना म्हटले की, तुम्ही जे कर्म करता ते तुमच्याकडे नक्की परत येते. अज्ञात मारेकर्‍यांचे आज मी आभार मानतो आहे. मला आज माझी बहीण (सरबजीत यांची बहीण) दलबीर कौर यांची आठवण येते आहे. पूनम आणि स्वप्नदीप यांचीही (सरबजीत यांच्या मुली) आठवण येते आहे. सरबजीतला किमान इतका तरी न्याय मिळाला.