कराड, १४ एप्रिल (वार्ता.) – छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या, तसेच स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे जन्मगाव असलेल्या तळबीड येथे वसंतगड मोठ्या दिमाखात उभा आहे. स्वराज्यसाक्षी असलेल्या याच गडावर २४ ते २९ एप्रिल या कालावधीत ‘टीम वसंतगड’ यांच्या वतीने ‘शिवसंस्कार शिबिरा’चे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती आयोजकांनी दिली आहे.
वसंतगडाच्या पायथ्याशी असलेल्या तळबीड या गावात स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची समाधी आहे. मुला-मुलींच्या जीवनाला दूरदर्शन आणि भ्रमणभाष यांपुढे जाऊन आपला ऐतिहासिक वारसा समजावणे आवश्यक आहे. त्यांच्यामध्ये एक आगळी-वेगळी ऊर्जा निर्माण होण्यासाठी सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या गावाची अद्भुतता अनुभवण्याची, गड-दुर्गांच्या सान्निध्यात रहाण्याची संधी ‘टीम वसंतगड’कडून देण्यात आली आहे. हे ७ दिवसांचे निवासी शिबिर असून यामध्ये कुटुंब संस्कार, नातेसंबंध विकास, जीवनमूल्यांचा विकास, वरिष्ठ अधिकार्यांकडून अनमोल मार्गदर्शन आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचे संस्कार करण्यात येणार आहेत. वय वर्ष १० ते १७ या वयोगटातील मुले-मुली यात सहभागी होऊ शकतात. शिबिरामध्ये पालकांनाही सहभागी होण्याची संधी आहे. ज्यांना शिबिरामध्ये सहभागी व्हायचे आहे, त्यांनी २४ एप्रिलला सकाळी ८ वाजता तळबीड येथील महाराणी ताराराणी हायस्कूलच्या मैदानावर उपस्थित रहावे. ३० एप्रिलला सकाळी ११ वाजता निरोप समारंभ आणि भोजन कार्यक्रम होऊन शिबिराची सांगता होईल. शिबिरार्थींनी अधिक माहितीसाठी ‘टीम वसंतगड’शी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.