खोपोली (जिल्हा रायगड) – येथे १३ एप्रिल या दिवशी सनातन संस्थेच्या वतीने अध्यात्म कार्यशाळा पार पडली. सनातन संस्थेच्या कार्याला २५ वर्षे पूर्ण झाली. या रौप्य महोत्सवाचे औचित्य साधून कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्याला खोपोली येथील जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या वेळी ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’ या विषयावर मार्गदर्शन करतांना सनातन संस्थेचे श्री. श्रीकृष्ण उपाध्ये म्हणाले, ‘सध्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येक व्यक्तीला कोणत्या ना कोणत्या कारणाने ताण असतोच ! वैज्ञानिक प्रगती करत असतांना आपण केवळ सुख मिळवण्यासाठी धडपडत असतो; पण सुखाच्या मागे दुःखही येतेच. सुख-दुःखाच्या पलीकडे जाऊन आनंद कसा मिळवायचा ?, हे योग्य साधनेने शिकता येते. आध्यात्मिक ग्रंथांचा अभ्यास करून त्यातील ज्ञान कृतीत आणणे म्हणजे साधना होय. साधनेच्या बळावरच आपण जीवनात येणार्या कठीण प्रसंगांना तोंड देऊ शकतो. स्वभावदोष आणि अहंकार यांमुळे आपण दुःख ओढवून घेतो. त्यामुळे दोष आणि अहंनिर्मूलन करणे आवश्यक आहे.’’
‘दत्तगुरूंच्या नामजपाची आवश्यकता’ याविषयी सनातन संस्थेच्या सौ. मोहिनी मांढरे यांनी सांगितले, तर ‘ईश्वरावर श्रद्धा ठेवून संयमाने, चिकाटीने नियमित साधनेचे प्रयत्न केल्यास ईश्वरप्राप्ती निश्चित होत असते’, याविषयी सनातन संस्थेच्या सौ. विशाखा आठवले यांनी सांगितले.
अभिप्राय
१. मार्गदर्शनात सांगितल्यानुसार वर्तमानात आनंद मिळवण्याचा प्रयत्न करणार. – सौ. अरुणा भोईर, मूळगाव, खोपोली
२. अंतर्मन आणि बाह्यमन यांविषयी अमूल्य मार्गदर्शन लाभले. – श्री. सचिन पाटील, खोपोली