देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमातील सौ. मनीषा हरीष पिंपळे यांना आलेल्या विविध अनुभूती

१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवात रथोत्सवांतर्गत दिंडी असणार याची साधिकेला मिळालेली पूर्वसूचना !

सौ. मनीषा पिंपळे

‘वैशाख कृष्ण सप्तमी (२२.५.२०२२) या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या निमित्त रथोत्सव आयोजित केला होता. त्या वेळी मी सनातनच्या गोवा येथील रामनाथी आश्रमात होते. जन्मोत्सवाच्या ८ ते १० दिवस आधी प्रतिदिन सेवा करतांना माझे मन आश्रमाच्या प्रवेशद्वाराकडे जात असे. तेव्हा मला ‘टाळ, तुळशी आणि झेंडे घेऊन एक दिंडी आश्रमात येत आहे’, असे जाणवायचे आणि माझ्या डोळ्यांतून भावाश्रू यायचे. त्या वेळी ‘जन्मोत्सवात दिंडी असणारा रथोत्सव असणार आहे’, हे मला ठाऊक नव्हते. (प्रत्यक्षातही रथोत्सवात टाळ वाजवणार्‍या आणि डोक्यावर तुळस घेतलेल्या साधिका अन् हातात झेंडे धरलेले साधक-साधिका असलेली दिंडी होती.’ – संकलक)’

२. गोव्यातील रामनाथी आश्रम म्हणजे पंढरपूरच !

मी रामनाथी आश्रमात असतांना आश्रमात प्रवेश करण्यापूर्वी माझे हात आपोआप जोडले जायचे. त्या वेळी ‘परात्पर गुरु डॉ. आठवले विठ्ठलाप्रमाणे विटेवर उभे आहेत’, असे मला जाणवायचे आणि ‘भारतभरातील जिज्ञासू, धर्माभिमानी, साधक असे सर्वजण गोव्यातील सनातनचा रामनाथी आश्रम पंढरपूर असल्याचे समजून आश्रमात येतात’, असे मला जाणवायचे. त्या वेळी माझ्याकडून पुढील गीत आपोआप म्हटले जायचे.

‘उभा कसा राहिला विटेवरी जयंत अवतार घेऊनी ।
विठ्ठल प्रगटला जणू रामनाथी भूवैकुंठी ।।’

३. परात्पर गुरु डॉ. आठवले स्वामी समर्थांच्या रूपात दिसणे

एकदा मी रामनाथी आश्रमात भाकरी करण्याची सेवा करत होते. त्या वेळी मी मानसरित्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीत गेले. तेव्हा मला परात्पर गुरु डॉक्टर स्वामी समर्थांच्या रूपात समर्थांप्रमाणेच मांडी घालून गादीवर बसलेले दिसले. त्या वेळी मला पुढील ओळी स्फुरल्या.

‘अक्कलकोटच्या स्वामींचा अवतार भूवैकुंठात प्रगटला ।
त्रिगुणात्मक त्रिमूर्ती दत्ताचा अवतार जयंतरूपात प्रगटला ।।’

– सौ. मनीषा हरीष पिंपळे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२०.५.२०२२)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक