|
नवी देहली – पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत १४ एप्रिलला लोकसभा निवडणुकीसाठीचे घोषणापत्र प्रकाशित केले आहे. या घोषणापत्रामध्ये समान नागरी कायदा करण्याचा पुनरुच्चार करण्यात आला आहे. तसेच मुंबई-कर्णावती (अहमदाबाद) या प्रमाणेच उत्तर, पूर्व आणि दक्षिण भारतातही बुलेट ट्रेन आणण्यात येणार आहे. गरिबांसाठी ३ कोटी घरे बांधण्यात येणार, विनामूल्य रेशन योजना, घराघरांपर्यंत पाईपलाईनने गॅस यांसह अनेक आश्वासने यात देण्यात आली आहेत.
सौजन्य Republic World
पंतप्रधान मोदी यांनी घोषणापत्र प्रकाशित करतांना म्हटले की, समान नागरी संहिता भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद ४४ मध्ये राज्याच्या धोरणाचे मार्गदर्शक तत्त्व म्हणून अंतर्भूत आहे. जोपर्यंत भारतात समान नागरी संहिता लागू होत नाही, तोपर्यंत महिलांना समान अधिकार मिळणार नाहीत, यावर विश्वास ठेवला पाहिजे. भाजप सर्वोत्तम परंपरांनी प्रेरित समान नागरी संहिता बनवण्यासाठी कटीबद्ध आहे.
घोषणापत्रातील काही आश्वासने !
१. ७० वर्षांवरील प्रत्येक वृद्ध व्यक्तीला आयुष्मान योजनेच्या कक्षेत आणले जाईल
२. ७० वर्षांवरील प्रत्येक वृद्ध व्यक्ती, मग तो गरीब, मध्यमवर्गीय किंवा उच्च मध्यमवर्गीय, ५ लाख रुपयांपर्यंत विनामूल्य उपचार सुविधा मिळणार
३. गुंतवणुकीद्वारे जीवनमान, जीवनाचा दर्जा आणि नोकर्यांवर लक्ष देण्याचा प्रयत्न
४. सहकारातून समृद्धीच्या दृष्टीकोनातून भाजप राष्ट्रीय सहकार धोरण आणणार
५. जेनेरिक औषधांची केंद्र आणखी वाढवण्यात येणार
६. कोट्यवधी लोकांची वीजबील शून्य करण्यावर भर देण्यात येणार
७. महिला सक्षमीकरणासाठी प्राधान्य देण्यात येणार
८. तीन कोटी महिलांना लखपती करणार