अहिल्यानगर येथे पतसंस्थेतील अपहारप्रकरणी ५ पदाधिकार्‍यांना जन्मठेप !

कर्ज न भरणारे १२ संचालक आणि कर्जदार यांना शिक्षा !

पतसंस्था घोटाळ्यात जन्मठेपेची शिक्षा झालेला हा जिल्ह्यातील पहिलाच निकाल !

अहिल्यानगर – येथील ‘संपदा नागरी सहकारी पतसंस्थे’तील घोटाळाप्रकरणी ५ जणांना अहिल्यानगर जिल्हा न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. आरोपी ज्ञानदेव वाफारे, त्याची पत्नी सुजाता वाफारे, साहेबराव भालेकर, संजय बोरा, रवींद्र शिंदे अशी आरोपींची नावे आहेत. तसेच कर्ज न भरणारे १२ संचालक आणि कर्जदार यांना ३ ते १० वर्षांपर्यंतची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पतसंस्था घोटाळ्यात जन्मठेपेची शिक्षा झालेला हा जिल्ह्यातील पहिलाच निकाल आहे. संपदा नागरी सहकारी पतसंस्था १९ सहस्रांहून अधिक ठेवीदारांच्या ठेवी अडकलेल्या आहेत.

१३ कोटी ३८ लाख रुपयांचा अपहार !

या सर्वांनी संपदा पतसंस्थेत १३ कोटी ३८ लाख रुपयांचा अपहार केला होता. या अपहार प्रकरणी वर्ष २०११ मध्ये कोतवाली पोलिसात गुन्हा नोंद झाला होता. या प्रकरणी १७ आरोपींना दोषी ठरवण्यात आले होते.

पतसंस्थेच्या पैशांतून भूमी, चारचाकी, घर घेतले !

ज्ञानदेव वाफारे हा या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे, तसेच त्याच्या पत्नीचाही सहभाग असल्याने तिलाही जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. वाफारे याने पतसंस्थेच्या पैशांतून भूमी, चारचाकी, घर खरेदी केल्याचे अन्वेषणात निष्पन्न झाले होते. पोलिसांनी चौकशी करून न्यायालयात दोषारोपपत्र प्रविष्ट केले होते. न्यायालयाने १३ वर्षांनंतर आरोपींना शिक्षा झाल्याने ठेवीदारांनी समाधान व्यक्त केले. (इतक्या वर्षांनी लागलेला निकाल हा अन्यायच नव्हे का ? – संपादक)

संपादकीय भूमिका :

अहिल्यानगर जिल्हा न्यायालयाचा हा निर्णय अभिनंदनीय आहे.  या प्रमाणेच कृती इतर ठिकाणी केल्यास अन्यांचेही भ्रष्टाचार करण्याचे धाडस होणार नाही.