परकियांच्या खुणा पुसा !

पुरातत्व शास्त्रज्ञ के. महंमद

श्रीराममंदिरासाठी मोठे पुरावे देणारे पुरातत्व शास्त्रज्ञ के. महंमद यांनी नुकतेच सांगितले की, सहस्रो मशिदी ज्या मंदिरांवर उभारल्या आहेत, त्या हिंदूंनी परत मागू नयेत; नाहीतर अराजक होईल. प्रसिद्ध इतिहासकार अर्नोल्ड टॉयन्बी यांनी वर्ष १९६० मध्ये देहलीतील एका भाषणात सांगितले, ‘‘तुमच्या देशात औरंगजेबाने उभारलेल्या मशिदी अत्यंत अपमानास्पद असूनही तुम्ही टिकवल्या आहेत.’’ १९व्या शतकाच्या पूर्वार्धात रशियाने जेव्हा पोलंड जिंकला, तेव्हा त्यांनी पोलंडवरील विजयाचे स्मारक म्हणून वॉर्सा शहराच्या मधोमध एक रशियन ‘ऑर्थडॉक्स चर्च’ उभे केले. पहिल्या महायुद्धानंतर जेव्हा पोलंड स्वतंत्र झाला, तेव्हा पहिले काम कुठले केले असेल, तर रशियाने बांधलेले ते चर्च पाडले आणि रशियन वर्चस्वाचे चिन्ह नष्ट केले; कारण पोलंडवासियांना ते चर्च त्यांच्या अपमानाची सतत आठवण करून देत होते.

आक्रमकांनी भारतात येऊन येथील मंदिरे पाडली आणि त्या ठिकाणी मशिदी उभारल्या. देशाला स्वातंत्र्य मिळून आज ७६ वर्षे झाली, तरी आक्रमकांच्या या खुणा अद्याप तशाच आहेत. याविषयी इतिहासात स्पष्ट नोंद असतांनाही हिंदूंना ‘त्याजागी हिंदूंची मंदिरे होती’, हे सिद्ध करण्यासाठी न्यायालयीन लढाया लढाव्या लागत आहेत, पुरावे गोळा करावे लागत आहेत. ‘कुणीही कोणत्याही धार्मिक उपासनागृहावर बलपूर्वक अधिकार दाखवणे, हे क्रूर पाप आहे. ‘मोगल काळात धार्मिक धर्मांधतेमुळे त्या शासकांनी हिंदूंची अनेक धार्मिक स्थळे कह्यात घेतली, अनेकांना मशिदीचे स्वरूप देण्यात आले. ही सर्व गुलामीची चिन्हे आहेत. त्यामुळे मुसलमानांच्या कह्यात असलेली हिंदूंची स्थळे त्यांनी आनंदाने हिंदूंना परत करावीत’, असे मत मोहनदास गांधींनी व्यक्त केले होते, तरीही स्वातंत्र्यानंतर तत्कालीन काँग्रेस सरकारने यासंदर्भात काहीच प्रयत्न केले नाहीत. उलट मुसलमानांच्या एकगठ्ठा मतांचा स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी उपयोग करून घेतला. त्या बदल्यात उलट त्यांच्यासाठी स्वतंत्र मंत्रालय, स्वतंत्र कायदा आणि स्वतंत्र आयोग स्थापन करून दिला. ५०० वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर २२ जानेवारी २०२४ या दिवशी अयोध्येत भव्य अशा श्रीराममंदिराच्या उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला आणि हिंदूंसाठी जणू ‘अच्छे दिन’ चालू झाले. ‘ज्ञानवापी’च्या संदर्भात भारतीय पुरातत्व विभागाला ३२ हून अधिक शिलालेख मिळाल्याने ‘या ठिकाणी मंदिर होते’, हे स्पष्ट झाले. या आधारावर न्यायालयाने हिंदूंना मशिदीच्या व्यास गर्भगृहात नियमित पूजेसाठी अनुमती दिली आहे. पुरातत्व विभागाच्या या पुराव्याने ‘श्रीकृष्ण जन्मभूमीही लवकरच मुक्त होईल’, असा विश्वास हिंदु पक्षकारांमध्ये निर्माण झाला आहे. अशाच प्रकारे देशभरातील हिंदूंची लपवली गेलेली मंदिरे जोखडातून मुक्त व्हावीत, अशी हिंदूंची अपेक्षा आहे. त्यासाठी हिंदु राष्ट्र हवे !

– श्री. जगन घाणेकर, घाटकोपर, मुंबई.