Hamas Leader 3 Son Killed : हमासच्या प्रमुखाची ३ मुले, ३ नातवंडे यांना इस्रालयने केले ठार !

मुलांना ठार केल्याने हमासच्या भूमिकेत कोणताही पालट होणार नाही ! – हमास प्रमुख

(डावीकडून ) हमासचा प्रमुख इस्माईल हानिये व त्याची ठार झालेली ३ मुले

तेल अवीव (इस्रायल) – इस्रायलने १० एप्रिलला रात्री गाझापट्टीतील अल-शाती भागात केलेल्या हवाई आक्रमणात आतंकवादी संघटना हमासचा प्रमुख इस्माईल हानिये याची ३ मुले, ३ नातवंडे आणि अन्य १ ठार झाले. ते सर्व एका चारचाकी वाहनातून जात असतांना हे आक्रमण झाले. इस्रायली सैन्याने म्हटले की, हानिया याची तिन्ही मुले आतंकवादी होती. अमीर हानिये हमासमध्ये स्क्वाड कमांडर होता, तर हाझेम आणि महंमद हानिये संचालक होते. हे तिघेही मध्य गाझावर आक्रमण करणार होते.

इस्माईल हानिये याने मुलांच्या हत्येवर म्हटले, ‘माझी मुले शहीद झाली. आम्हाला हा सन्मान दिल्याबद्दल अल्लाचे आभार.’ हानिये याने असेही म्हटले की, हमास शरण येणार नाही आणि इस्रायलवर आक्रमणे चालूच ठेवणार आहे. जेरूसलेम आणि अल-अक्सा मशीद यांच्या स्वातंत्र्यासाठी त्यांचे (इस्रायली) रक्त सांडले जाईल. आम्ही न डगमगता या मार्गावर चालू राहू. त्यांचे रक्त सांडून आम्ही आमच्या लोकांसाठी चांगले भविष्य आणि स्वातंत्र्य आणू. आमच्या मागण्या स्पष्ट आहेत. चर्चेने काही पालट घडू शकतात, असे शत्रूला वाटत असेल, तर तो त्यांचा गैरसमज आहे. माझ्या मुलांना ठार केल्याने ‘हमासला भूमिका पालटण्यास भाग पाडता येईल’, असे त्यांना वाटत असेल, तर ते चुकीचे आहे. माझ्या मुलांचे रक्त आमच्या लोकांच्या रक्तापेक्षा प्रिय नाही. मला १३ मुले आहेत. इतर पॅलेस्टिनींना ज्या वेदनांचा सामना करावा लागत आहे, त्याच वेदना मलाही सहन कराव्या लागल्या आहेत.