पंतप्रधान मोदी भारताचा चेहरा बनले आहेत ! – अमेरिकी खासदार ब्रॅड शर्मन

भारताचे मित्र म्हणून संबोधले जाणारे अमेरिकी खासदार ब्रॅड शर्मन यांचे मत

अमेरिकी खासदार ब्रॅड शर्मन

लॉस एंजल्स (अमेरिका) – वर्ष २०१४ पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली विकासकामे आणि देशाची आर्थिक प्रगती यांसाठी अमेरिकी खासदार ब्रॅड शर्मन यांनी त्यांचे कौतुक केले आहे. ते म्हणाले की, पंतप्रधान मोदी हे भारताचा चेहरा बनले आहेत. अमेरिकी खासदार ब्रॅड शर्मन हे भारताचे मित्र म्हणून संबोधले जातात.

सौजन्य Business Today

शर्मन पुढे म्हणाले की,

१. पंतप्रधान मोदी यांच्या कार्यकाळात भारत आणि अमेरिका यांच्यातील द्विपक्षीय संबंध सशक्त झाल्याचे दिसत आहे. असे असले, तरी भारताचे रशियासमवेतचे संरक्षण संबंध हे एक आव्हान राहिले आहे. अर्थात् प्रत्येक देशाची आणि नेत्याची स्वतःची आव्हाने असतात.

२. कोणत्याही देशाच्या यशाचे श्रेय मी केवळ एका नेत्याला देत नाही. तुमच्याकडे १.३ अब्जहून अधिक लोक आहेत आणि ते सर्व भारताला अधिक यशस्वी देश बनवण्यासाठी एकत्र काम करत आहेत.

३. अमेरिका आणि भारत यांच्यातील व्यापार गगनाला भिडत आहे. खरेच भारतीय-अमेरिकी हे सर्वाधिक शिक्षित आहेत आणि अमेरिकेतील सर्व वांशिक गटांपेक्षा त्यांचे उत्पन्न सर्वाधिक आहे.

४. रशियाशी आमचे संबंध फारसे चांगले नाहीत. युक्रेनमधील युद्धाचे यशस्वी निराकरण होईल, अशी आम्हा सर्वांना आशा आहे. असे केल्याने जगाला नक्कीच मोठे साहाय्य होईल.