‘करवीर गर्जना ढोल पथका’च्या वतीने गुढीपाडव्याच्या निमित्ताने शोभायात्रा !

गतवर्षी ‘करवीर गर्जना ढोल पथका’च्या वतीने काढण्यात आलेल्या शोभायात्रेतील काही छायाचित्रे

कोल्हापूर – ‘करवीर गर्जना ढोल पथका’च्या वतीने गुढीपाडव्याच्या निमित्ताने शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाच्या शोभायात्रेची ‘मराठी शाळा आमचा मान, अवघे करू तिचा सन्मान’, ही संकल्पना असून या माध्यमातून सातत्याने घटणारा मराठी शाळेचा पट आणि मराठी भाषेचे न्यून होणार महत्त्व यांवर प्रबोधन करण्यात येणार आहे. ही शोभायात्रा ९ एप्रिलला सकाळी ९ वाजता मिरजकर तिकटी येथून प्रारंभ होईल. बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रस्ता, गुजरी कॉर्नर मार्गे भवानी मंडप येथे सांगता होईल, अशी माहिती पथकाच्या वतीने श्री. युवराज जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

श्री. युवराज जोशी पुढे म्हणाले, ‘‘या शोभायात्रेत मर्दानी खेळ, दुचाकी पथक, बालचामू वेशभूषा स्पर्धा, वारकरी, इस्कॉन भजनी मंडळ, ढोल-ताशा पथक, ध्वजपथक, चित्ररथ, छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती, श्री महालक्ष्मीदेवीची मूर्ती यांचा समावेश असणार आहे. नागरिकांनीही या यात्रेत सहभागी होऊन संस्कृती रक्षणाच्या अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन श्री. युवराज जोशी यांनी केले आहे.