मंचर (जिल्हा पुणे), ६ एप्रिल (वार्ता.) – येथील आंबेगाव तालुक्यातील नागरिकांसाठी ४ एप्रिलला ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटाचे विनामूल्य आयोजन करण्यात आले होते. हे आयोजन जनसेवक श्री. संजय भाऊ थोरात यांनी केले होते. संजय थोरात हे हिंदु जनजागृती समितीच्या कार्यात नेहमी सहभागी होत असतात. कार्याला ते नेहमी साहाय्यही करतात. हा चित्रपट एकूण ३९२ जणांनी एकाच वेळी पाहिला. सर्वप्रथम ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. ‘स्वातंत्र्यवीर सावरकर युवा विचार मंच’चे संस्थापक अध्यक्ष डॉ. नीलेश लोणकर यांनीही ५ एप्रिलला अल्प दरात ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट प्रायोजित केला होता.
स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे अदम्य साहस, देशभक्ती आणि समर्पणाचे प्रतीक ! – संजय भाऊ थोरात, जनसेवक
श्री. संजय भाऊ थोरात म्हणाले की, स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे अदम्य साहस, देशभक्ती आणि समर्पणाचे प्रतीक आहेत. ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा केवळ एक चित्रपट नसून त्यांचे सत्य जगासमोर आणण्यासाठी केलेला प्रयत्न आहे. अंदमानमध्ये काळापाण्याची भोगलेली शिक्षा, जगप्रसिद्ध मार्सेलिसची उडी, सावरकरांनी लिहिलेले साहित्य आणि केलेले कार्य अशा सावरकरांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटना दाखवण्याचा प्रयत्न हा अतिशय पहाण्यासारखा आहे.