काँग्रेसच्या घोषणापत्रात अप्रत्यक्षपणे हिंदु राष्ट्राची हुकुमशाहीशी तुलना !

मुंबई, ६ एप्रिल (वार्ता.) – येत्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने घोषित केलेल्या घोषणापत्रामध्ये ‘तानाशाही किंवा बहुसंख्याकवाद यांना देशात कोणतेही स्थान नाही’, असा वाक्यप्रयोग करण्यात आला आहे.  या वाक्यामध्ये ‘बहुसंख्यांकवाद’ हा शब्दप्रयोग ‘तानाशाही’ या शब्दासमवेत करण्यात आला आहे. ‘तानाशाही’ हा शब्द हुकुमशाही या अर्थाने वापरला जातो. ‘बहुसंख्यांकवाद’ हा शब्दप्रयोग काँग्रेसने हिंदु राष्ट्रासाठी केला असेल तर हिंदु राष्ट्राची तुलना थेट हुकुमशाहीशी करण्यात आली आहे.

काँग्रेसच्या निवडणुकीच्या घोषणापत्रात पान क्रमांक ७ वर ‘अल्पसंख्यांक’ म्हणून अल्पसंख्यांकांसाठी असलेल्या घोषणांमध्ये हिंदूंच्या संख्याबळाला तानाशाही म्हणून हिणवल्याचा स्पष्टपणे उल्लेख करण्यात आला आहे. ‘भारताच्या इतिहासात किंवा लोकशाही परंपरा समजून घेतली असता काँग्रेसचे म्हणणे आहे की, तानाशाही किंवा बहुसंख्यांकवाद यांना देशात कोणतेही स्थान नाही’, असे लिहिण्यात आले आहे. भारतात ‘बहुसंख्यांकवाद’ असा कोणताही शब्द किंवा ‘वाद’ अस्तित्वात नाही. असे असतांना काँग्रेसने हा शब्दप्रयोग नेमका कशासाठी वापरला आहे ?  ‘बहुसंख्यांकवाद’ म्हणजे नेमके काय ? याची स्पष्टता घोषणापत्रात करण्यात आलेली नाही. त्यामुळे ‘बहुसंख्यांक’ म्हटले तर भारतात हिंदूविना बहुसंख्यांक कुणीही नाही. त्यामुळे ‘बहुसंख्यांकवाद’ हा शब्द हिंदु राष्ट्रासाठीच असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.