Nature’s Havoc Hotspots : देशातील ८ राज्यांत उष्णतेची लाट !

नागपूर आणि पुणे बनली ‘उष्णता केंद्रे’ !

नवी देहली – ओडिशा, झारखंड, बिहार, बंगाल, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, कर्नाटक आणि तेलंगाणा या ८ राज्यांमध्ये उष्णतेची लाट आली आहे. एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात बिहारमधील बक्सर येथील तापमान ४२ अंश सेल्सिअसवर पोचले आहे. दुसरीकडे राजस्थान, मध्यप्रदेश, आसाम, मेघालय, सिक्किम, अरुणाचल प्रदेश आणि केरळ या राज्यांत भारतीय हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तवला आहे. याखेरीज डोंगराळ राज्यांमध्ये बर्फवृष्टी चालू असल्याचे सांगण्यात येत आहे.

हवामान खात्याने सांगितले की,

१. मध्यप्रदेशातील ३३ जिल्ह्यांत गारांसह पावसाची शक्यता आहे.

२. बिहारमधील २४ जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट येईल. राज्यातील बक्सरमध्ये ४२ अंश तापमानाची नोंद झाली आहे. १० एप्रिलपासून राजधानी पाटलीपुत्रसह अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.

३. छत्तीसगडमधील काही जिल्ह्यांमध्ये कमाल तापमानाने ४० अंशांचा टप्पा ओलांडला आहे.

४. झारखंड राज्यात कमाल तापमान ३८ अंश, तर किमान तापमान २४ अंशांच्या आसपास रहाण्याची शक्यता आहे.

५. हरियाणात १० एप्रिलपर्यंत हवामानात पालट दिसून येईल.

६. देशातील ९ प्रमुख शहरांमध्ये गेल्या १० वर्षांत झाडी आणि जलस्रोत अल्प झाले. जयपूर, कर्णावती, नागपूर, पुणे आणि चेन्नई या शहरांचा ८० टक्के भाग ‘उष्णता केंद्रे’ बनली आहेत.

७. एप्रिल ते जून या कालावधीत सरासरीच्या दुप्पट उष्णतेच्या लाटेच्या हवामान खात्याच्या अंदाज आहे. वरील शहरांमध्ये गेल्या ६ वर्षांपासून उन्हाळ्यात भूपृष्ठाचे तापमान ४२ ते ४५ अंश इतके नोंदवले गेले आहे.