गोकर्ण पर्तगाळी मठाचे २४ वे मठाधीश श्री श्री श्रीपाद विद्याधीश तीर्थ श्रीपाद वडेरस्वामीजी यांचे ६ ते ९ एप्रिल अक्षता मंगल कार्यालयात प्रवचन ! – करुणाकर नायक

पत्रकार परिषदेत माहिती देतांना करुणाकर नायक (डावीकडून तिसरे), तसेच अन्य आयोजक

कोल्हापूर, ५ एप्रिल (वार्ता.) – गोवा येथील गोकर्ण पर्तगाळी मठाचे २४ वे मठाधीश श्री श्रीपाद विद्याधीश तीर्थ श्रीपाद वडेर स्वामीजी यांचे प्रथमच करवीरनगरीत आगमन होत आहे. त्यांचे ६ ते ९ एप्रिल या कालावधीत अक्षता मंगल कार्यालय येथे प्रवचन, भजन असे विविध कार्यक्रम होणार आहेत. पर्तगाळी मठाला ५४९ वर्षांची प्रदीर्घ परंपरा असून याचा सर्व भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सारस्वत समाज, एस्.बी. कोकणी व्यासपीठ आणि संयोजक समितीचे अध्यक्ष करुणाकर नायक यांच्या वतीने पत्रकार परिषदेत करण्यात आले. या प्रसंगी उपाध्यक्ष सचिन शानबाग, सचिव गुरुराज शानबाग, युवा आघाडी प्रमुख शांतनु पै, सुरेंद्र प्रभु, महिला आघाडी प्रमुख सुमंगला पै यांसह अन्य उपस्थित होते.

१. ६ एप्रिलला स्वामीजींचे जुना जकात नाका येथे आगमन होणार असून मिरवणुकीने ते अक्षता मंगल कार्यालय येथे जातील. यानंतर त्यांचे आशीर्वादपर प्रवचन होईल.

२. ७ एप्रिलला निर्माल्य विसर्जन पूजा, तप्त मुद्राधारण, सत्यनारायण महापूजा, भजन सेवा, राम तांडव प्रवचन आणि महाप्रसाद आदी कार्यक्रम होणार आहेत. ८ एप्रिलला श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन घेऊन भजनसेवा आणि प्रवचन होईल. ९ एप्रिलला दुपारी ३ वाजता पंढरपूर येथे स्वामीजी प्रस्थान करतील.

३. २४ वे मठाधीश म्हणून कार्यरत असलेल्या श्री श्री श्रीपाद विद्याधीश तीर्थ श्रीपाद वडेर स्वामीजी यांनी यांत्रिकी अभियांत्रिकीची पदवी घेतली असून त्यांचे मराठी, हिंदी, कोकणी, इंग्रजी, कन्नड, संस्कृत अशा भाषांवर प्रभुत्व आहे.

४. मठाच्या वतीने पुरोहित पाठशाळा चालवण्यात येते, तसेच शैक्षणिक उपक्रम, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, भूकंप-महामारीत नागरिकांना साहाय्य, अन्नदान, असे उपक्रम राबवण्यात येतात.

मठास ५५० वर्षे पूर्ण होत असल्याविषयी स्वामीजींनी श्रीरामनवमीपासून ५५० कोटी ‘श्रीराम जय राम जय जय राम’, या जपाचा संकल्प केला असून प्रतिदिन १ कोटी जप केला जाणार आहे.