भारतीय नौदल म्हणजे हिंदी महासागरामधील सुरक्षिततेची निश्चिती !

अलीकडच्या काळात भारतीय नौदलाने सोमाली चाच्यांनी (दरोडेखोरांनी) अपहरण केलेल्या ‘ए.व्ही. रूएन’ या नौकेची यशस्वीरित्या सुटका करून स्वतःची क्षमता दाखवून दिली आहे. माल्टाचा ध्वज असलेली ही नौका १४ डिसेंबर २०२३ या दिवशी समुद्री चाच्यांच्या आक्रमणात फसली. या नौकेवर १८ खलाशी आणि जवळजवळ १ दशलक्ष डॉलर्स (८ कोटी रुपयांहून अधिक) किमतीचा माल होता. आक्रमण झालेल्या या नौकेला त्वरित साहाय्याची आवश्यकता होती. या वेळी या आक्रमणापासून सोडवण्यासाठी भारतीय नौदलाने ‘आय.एन्.एस्. कोची’ या चाच्यांशी लढणार्‍या नौकची नियुक्ती केली आणि या नौकेच्या अपहरणामध्ये हस्तक्षेप करून नौकेची सुटका केली. या जहाजावरील एक खलाशी गंभीररित्या घायाळ झाला होता आणि त्याला त्वरित वैद्यकीय साहाय्य देऊन पुढील उपचारासाठी सुरक्षितपणे ओमान येथे पाठवण्यात आले. याच वेळी नियंत्रितपणे सोडलेली क्षेपणास्त्रे नष्ट करण्यासाठी ‘आय.एन्.एस्.कोलकाता’ ही नौकाही या भागात नियुक्त करण्यात आली. यातून हिंदी महासागरामध्ये समुद्री चाच्यांच्या वाढलेल्या आक्रमणांपासून समुद्रातील व्यापारी नौकांचे रक्षण करण्याची भारतीय नौदलाची बांधीलकी दिसून आली.

(उभे असलेले) नौदलाचे कमांडो आणि (बसलेले) अटक केलेले सोमालियन चाचे

१. भारतीय नौदलाने नियोजनबद्धतेने सोमालीयन चाच्यांविरुद्ध केली कारवाई !

प्रारंभीला हस्तक्षेप करून; पण नंतर या नौकेची सुटका करण्याच्या मोहिमेकडे जगाचे लक्ष वेधले असले, तरी या नौकेवरील काही खलाशी हे सोमालीयन चाच्यांच्या कह्यात होते आणि त्यांनी ही नौका पुंटलँड सोमालिया भागात असलेल्या बोसासो या शहराकडे नेली. या परिस्थितीमध्ये या चाच्यांविरुद्ध कारवाई करून नौकेवर नियंत्रण मिळवण्याची संधी शोधत भारतीय नौदलाने बारकाईने लक्ष ठेवले. मार्च मासाच्या मध्याला ही संधी मिळाली आणि भारताने या चाच्यांच्या विरोधात मोहीम करून खलाशांची सुटका केली. ‘ए.व्ही.रूएन’ या जहाजावर वास्तव्य करून त्या भागातील इतर व्यापारी नौकांना लक्ष्य करण्याचा या चाच्यांचा विचार होता. यावर मात करण्यासाठी भारतीय नौदलाने त्वरित ‘आय.एन्.एस्. कोलकाता’, ‘आय.एन्.एस्. सुभद्रा’, समुद्रात गस्त घालणारे ‘पी.एल्-८’ हे विमान आणि पुष्कळ उंचीवरून काम करणारे मानवरहित विमान यांचा वापर केला. भारताने सर्व बाजूंनी विचार करून ‘सी-१७’ या विमानातून नौदलाचे खास कमांडो अपहरण केलेल्या नौकेवर उतरवले आणि १६ मार्च या दिवशी ही मोहीम यशस्वी झाली. या मोहीमेमध्ये नौकेवरील सर्व १७ खलाशांची सुटका करून ३५ सोमाली चाच्यांना कह्यात घेतले आणि त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी त्यांना मुंबईला आणले गेले. या नौकेवरील ७ खलाशी बल्गेरिया येथील असल्याने बल्गेरियाचे अध्यक्ष रूमेन रादेव यांनी ‘भारताने ही कृती धैर्याने केली’, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी पुष्कळ कृतज्ञता व्यक्त केली. या सलग घडलेल्या घटनांमुळे हिंदी महासागरामध्ये भारतीय नौदलाची शक्ती वाढली आहे, हे अधोरेखित झाले.

(निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन

२. समुद्रातील नौकांच्या सुरक्षेविषयीचे आव्हान

जानेवारी मासात नौदलाच्या ‘आय.एन्.एस्. सुमित्रा’ या नौकेने दक्षिण अरबी समुद्रामध्ये ‘अल नईमी’ या १९ पाकिस्तानी खलाशी असलेल्या मासेमार नौकेची सुटका केली. दुसर्‍या एका लक्षात घेण्यासारख्या घटनेमध्ये अरबी समुद्रामध्ये सोमाली चाच्यांपासून वाचवण्यासाठी इराणच्या ‘एफ्.व्ही. अमन’ या नौकेने साहाय्य मागितल्यावर १७ खलाशांसह त्या नौकेची सुटका केली, तसेच भारतीय नौदलाने इंग्लंडमधील ‘एम्.व्ही. मर्लियन लौंदा’ या नौकेची ‘आय.एन्.एस्. विशाखापट्टणम्’ या क्षेपणास्त्रविरोधी नौकेने हुती बंडखोरांनी केलेल्या आक्रमणापासून सुटका केली. सध्या चाचेगिरी आणि हुती बंडखोरांचा आतंकवाद यांमुळे प्रामुख्याने समुद्रातील नौकांच्या सुरक्षेविषयीचे आव्हान समोर आले आहे.

३. हिंद महासागर प्रदेशात समुद्री चाचे आणि हुती बंडखोर यांची संयुक्तपणे वाढती आक्रमणे

भारतीय नौदलाच्या अहवालानुसार वर्ष २०२३ मध्ये आधीच्या वर्षाच्या तुलनेत चाचेगिरी आणि चोर्‍या होण्याचे प्रमाण जवळजवळ २९ टक्के वाढले आहे. गेल्या वर्षी अशा प्रकारच्या १९४ घटना घडल्या होत्या. हा अहवाल भारतीय नौदलाच्या ‘डेडीकेटेड इनफॉर्मेशन फ्युजन सेंटर (इंडियन ओशन रिजन – हिंद महासागर प्रदेश)’ या समुद्रातील सुरक्षा केंद्राने दिला आहे. खरे म्हणजे गेल्या १० वर्षांत अनेक देशांकडून हिंदी महासागरात गस्त घातली जात असल्याने तेथील चाचेगिरीच्या घटनांमध्ये घट झाली होती आणि हा भाग ‘अतिशय धोकादायक’ क्षेत्रांमधून वगळण्यात आला होता; परंतु इतर देशांनी लाल समुद्रामधील हुती बंडखोरांशी लढण्यासाठी त्यांचे लक्ष्य केंद्रित केल्यावर हिंदी महासागरामध्ये सोमाली चाच्यांनी डोके वर काढले आहे.

काही स्रोतांकडून मिळालेल्या माहितीनुसार समुद्री चाचे आणि हुती बंडखोर यांनी संयुक्तपणे आक्रमणे चालू केली आहेत. गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार ‘हमास’ आतंकवादी संघटनेचा पाठिंबा असलेले हुती आणि सोमालियातील ‘अल शबाब गट’ यांचे एकमेकांशी संबंध आहेत. अशा अनेक संकटांमध्ये हिंदी महासागरातील सुरक्षिततेमध्ये पोकळी निर्माण झाली असतांना या भागात प्रमुख सत्ता असलेल्या भारताने या समुद्री भागातील सुरक्षिततेविषयी प्रमुख भूमिका घेण्याची अपेक्षा आहे.

४. हिंदी महासागरातून नौकांचा प्रवास सुरक्षितपणे होण्याविषयी भारतीय नौदल अग्रेसर

हिंद महासागरात तैनात असलेले भारतीय नौदल

भारतातील व्यापार हा हिंदी महासागरावर अवलंबून असून जवळजवळ ९० टक्के व्यापार या भागातून होतो, ज्यामध्ये तेलाच्या आयातीचा समावेश आहे. यामुळे या भागाची आवश्यकता ओळखून वर्ष २००८ पासून भारताने ‘गल्फ ऑफ एडन’मध्ये (एडनचे खोरे – हिंदी महासागरातील खोल पाण्याचे खोरे आहे, जे लाल समुद्र आणि अरबी समुद्र यांना जोडते.) चाच्यांच्या विरोधात लढणार्‍या नौका नियुक्त करण्यास प्रारंभ केला आहे. सध्या या भागात चाच्यांच्या विरोधात लढण्यासाठी भारताने १० युद्धनौकांची नियुक्ती केली आहे. इंग्लंड आणि अमेरिका या देशांचे लक्ष सध्या हुती बंडखोरांकडे असल्याने हिंदी महासागरातील सुरक्षेविषयीचे उत्तरदायित्व भारताकडे अधिक प्रमाणात आहे. भारतीय नौदलाने हिंदी महासागरातून नौकांचा प्रवास सुरक्षितपणे होण्याविषयी भारत अग्रेसर आहे, हे दाखवून दिले आहे.

५. हिंदी महासागराची सुरक्षा राखण्यासाठी भारताची भूमिका अत्यंत महत्त्वाची

भारतीय नौदलाचे प्रमुख ॲडमिरल आर्. हरि कुमार यांनी निःसंदिग्धपणे म्हटले आहे, ‘‘चीनला हिंदी महासागरामध्ये आर्थिकदृष्टीने रस असला, तरी येथे स्थायिक असलेल्या सत्तेने, म्हणजे भारतीय नौदलाने ‘भारताची वाढती नौदल सत्ता हिंदी महासागरातील सुरक्षेविषयी खात्री देत आहे’, असे भूषणावह स्वतःला म्हणायला हरकत नाही.’’ अलीकडेच भारताने ‘ए.व्ही. रूएन’ या नौकेची सोमालिया चाच्यांपासून केलेल्या सुटकेवरून भारतीय नौदलाची शक्ती आणि हिंदी महासागर सुरक्षित करण्याविषयीची बांधीलकी ठळकपणे दिसून येत आहे. या मोहिमेमध्ये भारताने अपहरण केलेल्या नौकेतील खलाशी आणि नौकेवरील व्यापारी माल यांचे रक्षण केले. यावरून या भागात होणार्‍या चाचेगिरीविरुद्ध लढण्याची भारतीय नौदलाची क्षमता दिसून येते. चाचेगिरीच्या वाढत्या घटना आणि हिंदी महासागरातील सुरक्षेविषयीची नवीन आव्हाने या पार्श्वभूमीवर ‘स्थानिक नौदल सत्ता’ म्हणून समुद्रातील सुरक्षा राखण्यासाठी भारताची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते.

– ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त), पुणे.