सनातन संस्थेला २५ वर्षे पूर्ण झाल्याविषयी सनातनच्या साधिका सौ. अंजली अजय जोशी यांना सुचलेले काव्य येथे देत आहोत.
‘सनातन’ एक दिव्य तेजस्वी तारा ।
‘सनातन’ एक पवित्र विचारधारा ।
‘सनातन’ धर्मलयावरील उतारा ।। १ ।।
‘सनातन’ आहे वेद अन् उपनिषदे यांचे सार ।
‘सनातन’ सांभाळते विश्वाचा कारभार ।
‘सनातन’ देते धर्मउत्थापनेला धार ।। २ ।।
सनातनचे आहे ‘वसुधैव कुटुंबकम्’ ब्रीद ।
साधनेसाठी सनातन घालते सर्वांना साद ।
वाद संपूनी, घराघरात निर्मितो सुसंवाद ।। ३ ।।
सनातन निर्मित साधनामार्ग ‘गुरुकृपायोग’ ।
त्यातूनी बरसतो गुरुकृपेचा चैतन्य ओघ ।
कलियुगातील हा गुरुप्राप्तीचा विहंगम मार्ग ।। ४ ।।
‘रामराज्याची स्थापना’ असे ध्येय सनातनचे ।
अवघड कार्य ते साधक अन् संत घडवण्याचे ।
प्रथम रामराज्य आणणे आपल्या अंतरीचे ।। ५ ।।
गुरुकृपायोगे सहज घडवली साधक मंडळी ।
कठोर प्रयत्ने जाहली संतांची मांदियाळी ।
प्रीतीमय जाहली चराचर सृष्टी सगळी ।। ६ ।।
गुरुकृपा योगातील स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया ।
ही असे अनिष्ट शक्तींच्या त्रासातून मुक्ततेची क्रिया ।
दैवी गुण संपादन करण्याची आहे ही किमया ।। ७ ।।
‘सनातन’ माध्यम असे कलियुगी अवतारी कार्याचे ।
धरतीवरील हे कार्य वाटते जणू त्रिदेवांचे ।
ग्रंथरूपाने ज्ञानाचे भांडार उघडले जणू ब्रह्मदेवाचे ।। ८ ।।
सृष्टीच्या पालनास्तव अवतरण झाले महाविष्णूचे ।
विकृतीच्या लयास्तव प्राकट्य भगवान शिवाचे ।
मेघ बरसतील अवनीवरी चैतन्य अन् आनंद यांचे ।। ९ ।।
– सौ. अंजली अजय जोशी (वय ६१ वर्षे), सनातन आश्रम, मिरज. (१३.३.२०२४)