स्वीकारण्याची वृत्ती असलेला आणि तळमळीने सेवा करणारा सोलापूर सेवाकेंद्रातील ५६ टक्के अध्यात्मिक पातळी असणारा कु. भावेश (ओम) प्रकाश सूर्यवंशी (वय १६ वर्षे) !

१. पू. दीपाली मतकर (सनातनच्या ११२ व्या संत, वय ३५ वर्षे), सोलापूर

पू. दीपाली मतकर

१ अ. नम्रता : ‘ओम सर्व साधकांशी नम्रतेने बोलतो. ओम प्रथमच सोलापूर सेवाकेंद्रात आला होता. तेव्हा तो सर्व साधकांची प्रेमाने विचारपूस करायचा.

१ आ. शिकण्याची वृत्ती : त्याचा सर्व साधकांकडून शिकण्याचा भाग असतो. सेवाकेंद्रात आल्यावर त्याने अनेक सेवा शिकून घेतल्या.

कु. भावेश प्रकाश सूर्यवंशी

१ इ. तळमळीने प्रसारसेवा करणे : साधकांच्या समवेत सभेच्या प्रसार सेवेतही तो तळमळीने विषय सांगतो. सोलापूर सभेच्या आढावा बैठकीत आलेल्या धर्मप्रेमीने सांगितले, ‘‘ओमदादा छान बोलतात. मी त्यांच्या बोलण्यामुळे सभेला आलो. लहान असूनही त्यांनी मला चांगले मागदर्शन केले. मलाही तशी धर्मसेवा करायची आहे.’’

१ ई. स्वीकारण्याची वृत्ती : प्रारंभी ओमला सेवाकेंद्रात भांडी घासण्याची सेवा आवडत नसे; पण याविषयी त्याच्याशी बोलल्यावर त्याने प्रायश्चित्त म्हणून आठवडाभर भांडी घासण्याचीच सेवा केली. त्यानंतर तो ‘भांडी घासणे’ ही सेवा आनंदाने करू लागला. त्याने सांगितले, ‘‘मला आता प्रतिदिन भांडी घासणे ही सेवा दिली, तरी चालेल.’’

१ उ. उपायांचे गांभीर्य : मधल्या काळात त्याचा आध्यात्मिक त्रास वाढला होता. त्यावर त्याला ‘उपाय आणि स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया’ यांसाठी प्रयत्न करूया’, असे सांगितल्यावर त्याने लगेच उपायांचा भाग वाढवला.

१ ऊ. साधनेसाठी गुरुदेवांना अपेक्षित असे प्रयत्न करणे : त्याची गुरुदेवांवर दृढ श्रद्धा आहे आणि गुरुदेवांना अपेक्षित असे साधनेचे प्रयत्न त्याला करायचे असतात. ओमला दुपारी झोपण्याची सवय होती. आता त्यात पालट करून तो दिवसभर सेवा करून दुपारी व्यष्टी साधनेचे प्रयत्न करतो.’

२. श्री. ज्ञानदीप चोरमले (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय २१ वर्षे), सोलापूर

२ अ. सेवेची तळमळ : ‘माझी सेवा अधिक चांगली आणि परिपूर्ण कशी होईल ?’, यासाठी ओमचे प्रयत्न असतात.

२ आ. प्रेमभाव : मी त्याला सेवेसाठी कधीही काही साहाय्य मागितले, तर तो लगेच मला साहाय्य करतो. त्यामुळे मला त्याचा आधार वाटतो.

२ इ. विचारण्याची वृत्ती : सेवेत त्याला काही अडचण आली, तर तो विचारून घेतो. एका वेळी दोन सेवा आल्या, तर तो लगेच प्राधान्य विचारून सेवा पूर्ण करतो.’

३. कु. रश्मी चाळके (वय २० वर्षे) आणि सौ. राजश्री देशमुख (वय ५१ वर्षे), सोलापूर

अ. ‘ओमला एखादी सेवा शिकवली, तर पुढच्या वेळी त्याला त्या सेवेतील बारकावे सांगावे लागत नाहीत. तो ती सेवा परिपूर्ण करतो.

आ. ओम त्याच्या मनात येणार्‍या नकारात्मक आणि अनावश्यक विचारांविषयी लगेच पू. दीपालीताईंशी बोलून घेतो. त्या जे सांगतात, त्याप्रमाणे तो लगेच प्रयत्न करायला आरंभ करतो.’

(सर्व सूत्रांचा दिनांक : ८.३.२०२४)

एका शिबिरात कु. भावेश सूर्यवंशी याला आलेल्या अनुभूती

सनातन आश्रम, रामनाथी, गोवा येथील शिबिरात कु. भावेश सूर्यवंशी याला आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

१. मनात काळजीचे विचार येत असतांना सूक्ष्मातून सच्चिदानंद परब्रह्म परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आश्वस्त करणे

‘सोलापूरहून रामनाथीला जायला निघालो, त्या वेळी मला पुष्कळ कृतज्ञता वाटली. सोलापूरहून ९ साधक निघाले होते. आम्ही सर्व जण बसमध्ये बसल्यावर माझ्या मनात ‘आम्ही सर्व लहान आहोत. मग एवढा प्रवास कसा करणार ?’, असा विचार आला. तो मी परम पूज्य डॉक्टरांना सांगितल्यावर, ‘मी आहे ना ! तू कशाला चिंता करतोस ?’, असे त्यांनी सूक्ष्मातून सांगितल्यावर मी स्थिर झालो.

२. शिबिरासाठी जातांना रस्त्यात ट्रक बंद पडल्यामुळे जाण्यात आलेला अडथळा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना प्रार्थना केल्यामुळे त्यांच्या कृपेने दूर होणे

बस फोंडा घाटातून येत असतांना एक मालाने भरलेला ट्रक रस्त्यात बंद पडला होता. त्यामुळे आमची बस पुढे किंवा मागेही जाऊ शकत नव्हती. तेव्हा भगवंताने लक्षात आणून दिले की, ‘आमचे देवाशी अनुसंधान न्यून पडत आहे.’ त्वरित आम्ही प्रार्थना केली आणि बंद पडलेल्या ट्रक जवळून आमची बस कशीबशी पुढे निघाली. प.पू. गुरुदेवांच्या मुळेच हे सर्व घडले आणि आम्ही आश्रमात सुखरूप पोचलो.

३. प्रसंगाचा सराव केल्याने स्वभावदोष दूर होऊन सर्वांसमोर विषय मांडणे

सौ. वैजयंती विनय कुमार (पूर्वाश्रमीची कु. वृषाली कुंभार) ताईने मला ‘भीती वाटणे’ या दोषावर ‘अ ३’ पद्धतीने सूचना देऊन प्रसंगाचा सराव करण्यास सांगितली. मी तीन वेळा सूचना दिल्यावर माझे भीती वाटणे उणावले. त्यानंतर श्री. संदीप शिंदे दादांनी ‘‘शेवटच्या सत्राची १० मिनिटे बाकी आहेत. कुणाला गुरूंचे मन जिंकायचे आहे, त्यांनी पुढे या’’, असे सांगितल्यावर मी नकळत पुढे आलो आणि राष्ट्र अन् धर्म यासंबंधी विषय मांडला.

४. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे दर्शन झाले. समारोपीय सत्रामध्ये दिवे बंद केल्यावर प.पू. गुरुदेवांचे अस्तित्व जाणवले. त्याच वेळी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळमाता सभागृहात आल्या.

प.पू. गुरुदेवांच्या कृपेने ५ दिवस असलेल्या शिबिरात शिकायला मिळालेली सूत्रे आणि गुरुकृपेने आलेल्या अनुभूती त्यांच्या चरणी अर्पण करतो. गुरुचरणी कृतज्ञता व्यक्त करतो.’

– कु. भावेश प्रकाश सूर्यवंशी (वय १६ वर्षे), सोलापूर सेवाकेंद्र, सोलापूर (१६.१२.२०२३)

  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक