१. बहिणीला वाचवणार्या भावाची गुंडांकडून हत्या !
‘वर्ष २०१२ मध्ये पुण्याच्या निगडी भागामध्ये एक मुलगी तिच्या मैत्रिणींसह महाविद्यालयातून घरी परतत होती. चौकात आल्यानंतर एका आरोपीने तिची छेड काढली. त्यामुळे तिने घाबरून तिच्या आईला याविषयी दूरभाषवरून कळवले. आईने तिच्या मुलासह (पीडित मुलीच्या भावासह) सोसायटीतील अन्य एका व्यक्तीला मुलीच्या साहाय्याला पाठवले. तिसर्या क्रमांकाचा आरोपी विद्यार्थिनीशी बोलत असतांना त्याला तिच्या भावाने समजावले. चौकात लोक गोळा झाल्याने आरोपी पळून गेले; मात्र त्यांनी मुलीच्या भावाला धमकी दिली.
यानंतर काही वेळाने पीडित मुलगी, तिची आई, वडील आणि भाऊ हे सर्व जण दुपारी जेवून घरात बसले होते. तेव्हा ३ जण हातात लोखंडी गज आणि काठ्या घेऊन आले. ते मुलीच्या भावाला मारहाण करू लागले. हा गोंधळ ऐकून सोसायटीतील अन्य लोक बाहेर आले. त्यांनी पीडितेच्या भावाला गुंड मारत असल्याचे पाहिले. त्यांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला; पण गुंडांनी त्यांनाही धमकी दिली, ‘तुमचीही अशीच स्थिती होईल.’ गर्दी वाढल्याचे पाहून आरोपी पळून गेले.
पीडितेच्या भावाला रुग्णालयात भरती करण्यात आले. लोखंडी सळईने मारहाण केल्याने त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाली होती. त्याच्या पायाचाही अस्थीभंग झाला होता. त्याला कृत्रिम श्वासोच्छ्वास द्यावा लागला. साधारणत: ८ दिवस रुग्णालयात उपचार घेऊनही पीडितेच्या भावाचा मृत्यू झाला.
२. आरोपींच्या विरोधात हत्येचा गुन्हा नोंद
पीडितेच्या भावाला मारहाण झाली, त्या दिवशी तिच्या आईने पोलिसांकडे तक्रार केली होती; मात्र पोलिसांनी भारतीय दंड विधानातील कामचलाऊ कलमे लावली. जेव्हा पीडितेचा भाऊ गंभीर अवस्थेत गेला, तेव्हा ‘जिवे मारण्याचा प्रयत्न करण्या’विषयी गुन्हा नोंदवून ३ आरोपींना अटक करण्यात आली. नंतर त्या मुलाचा मृत्यू झाला आणि आरोपींच्या विरुद्ध हत्येचा गुन्हा नोंदवून त्यांना जामीन नाकारण्यात आला.
३. सत्र न्यायालयाकडून तिन्ही आरोपींना जन्मठेप
या प्रकरणाचे अन्वेषण पूर्ण झाल्यानंतर खटला सुनावणीसाठी सत्र न्यायालयाकडे वर्ग करण्यात आला. यात आधुनिक वैद्यांसह एकूण १७ साक्षीदार पडताळण्यात आले. आधुनिक वैद्यांनी ‘डोक्याला झालेली मारहाण हे मृत्यूचे कारण आहे’, असे सांगितले. या घटनेनंतर आरोपींनी पीडिता अन् तिचे नातेवाइक यांना धडा शिकवण्याची धमकी दिली होती. त्याप्रमाणे त्यांनी पीडितेच्या भावावर आक्रमण केले. काहीच दिवसांत त्याचा मृत्यू झाला. यात निरपराध व्यक्तीला स्वतःचे प्राण गमवावे लागल्यामुळे सत्र न्यायालयाने तिन्ही आरोपींना जन्मठेप सुनावली.
४. मुंबई उच्च न्यायालयाकडून आरोपींना १० वर्षे सक्तमजुरी
सत्र न्यायालयाच्या निर्णयाला तीनही आरोपींनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले. तेथे युक्तीवाद करतांना त्यांनी सांगितले, ‘आमचा मृतकाची हत्या करण्याचा हेतू नव्हता. आमच्याकडे लोखंडी सळई आणि लाकडी दंडा असूनही त्याच्या डोक्यावर केवळ एकच घाव घातला होता. त्याच्या डोक्याला झालेली इजा भूमीवर पडल्यानेही होऊ शकते. त्यामुळे आम्हाला निर्दोष सोडावे किंवा शिक्षा न्यून करावी.’ ३ पैकी २ आरोपींना जामीन नाकारण्यात आला होता. त्यामुळे ते वर्ष २०१२ पासून कारागृहात बंद होते. उच्च न्यायालयाने त्याची शिक्षा जन्मठेपेवरून १० वर्षे सक्तमजुरी अशी सुनावली.
आरोपींचे वय, तसेच त्यांनी १०-१० वर्षांची शिक्षा भोगली होती. त्यामुळे उच्च न्यायालयाने त्यांची शिक्षा अल्प केली आणि त्यांना कारागृहाबाहेर सोडण्याचा आदेश केला. ‘तिसरा आरोपी जो जामिनावर सुटला होता, त्याला पोलिसांनी कह्यात घ्यावे’, असा आदेश देण्यात आला. आता तो एकूण १० वर्षे शिक्षा भोगणार आहे.
५. न्यायालयाकडून आरोपींना कठोर शिक्षा मिळणे अपेक्षित !
सुदैवाने उच्च न्यायालयाने ‘इव टीझिंग’, म्हणजे मुली आणि महिला यांच्या छेडण्याचा प्रकार गांभीर्याने घेतला. या प्रकरणी सत्र न्यायालयाने आरोपींना दिलेली आयुष्यभराची जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवायला हवी होती. तसेही न्यायव्यवस्था आरोपींना सौम्य शिक्षा सुनावते. वरच्या न्यायालयात आव्हान दिल्यावर ती आणखीन सौम्य होते. त्यामुळे गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. मुली आणि महिला यांच्यावर आक्रमणे होणे नित्याचे झाले आहे. त्यामुळे आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देणे आवश्यक आहे.’ (२२.३.२०२४)
श्रीकृष्णार्पणमस्तु ।
– (पू.) अधिवक्ता सुरेश कुलकर्णी, मुंबई उच्च न्यायालय