पीएच्.डी.चा उमेदवार नाव गोपनीय ठेवून तक्रार करू शकतो ! – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाचा महत्त्वपूर्ण निर्णय

पीएच्.डी. प्रक्रिया सुधारण्यासाठी संकेतस्थळाची निर्मिती

पुणे – पीएच्.डी.चा (विद्यावाचस्पती) प्रबंध सादर करण्यासाठी लाच स्वीकारतांना मार्गदर्शक प्राध्यापकांना पकडल्याचा प्रकार नुकताच घडला. त्या प्रसंगानंतर पीएच्.डी.चे मार्गदर्शक त्रास देत असल्यास संशोधक उमेदवारांना तक्रार नोंदवण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाने पीएच्.डी. प्रक्रिया सुधारणेसाठी संकेतस्थळाची निर्मिती केली असून त्यात संशोधक उमेदवार तक्रार नोंदवू शकणार आहेत, तसेच उमेदवारांना त्यांचे नाव गोपनीयही ठेवता येणार आहे, अशी माहिती विद्यापिठाकडून कळवण्यात आली आहे. (लाच घेणारे पीएच्.डी.चे मार्गदर्शक विद्यार्थ्यांना काय घडवणार ? शिक्षणाचे माहेरघर असणार्‍या पुणे सारख्या शहरात असे प्राध्यापक असणे हे शिक्षणक्षेत्राला लज्जास्पद ! – संपादक)

विद्यापिठाचे प्र-कुलगुरु डॉ. पराग काळकर म्हणाले की, पीएच्.डी. मार्गदर्शक शोषण करत असल्याची एकही अधिकृत तक्रार विद्यापिठाकडे अद्यापही प्रविष्ट (दाखल) झालेली नाही. संशोधक उमेदवारांना जीवनाची काळजी असल्याने ते तक्रार नोंदवत नाहीत, असेही असू शकते. त्यासाठी विद्यापिठाकडून ‘पीएच्.डी. ट्रँकिंग सिस्टीम’ हे संकेतस्थळ निर्माण केले आहे. त्यामध्ये उमेदवार तक्रार नोंदवू शकतात. ती तक्रार प्र-कुलगुरु, उपकुलसचिव, मार्गदर्शक, प्राचार्य यांच्यापर्यंत थेट नोंदवण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. पीएच्.डी. प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी संशोधक उमेदवारांचे सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणातील प्रतिसादांचे विश्लेषण करण्यात येणार आहे. त्यानंतर ‘पीएच्.डी. ट्रँकिंग सिस्टीम’ या संकेतस्थळामध्ये अधिक सुधारणा केल्या जातील.

संपादकीय भूमिका :

शिक्षणाचे पाश्चात्त्यीकरण झाल्याने शिक्षणक्षेत्रही भ्रष्टाचाराने बरबटलेले असणे चिंताजनक आहे ! आतापर्यंत तक्रार करणार्‍यांची नावे का उघड केली जात होती ? याचेही स्पष्टीकरण विद्यापीठ प्रशासनाने द्यायला हवे !